'योशी' पोहून गेली ३७ हजार किलोमीटर; आफ्रिका ते ऑस्ट्रेलिया दरम्यान प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2020   
Total Views |
sea turtle_1  H

’योशी’ टॅग लावलेली जगातील सर्वाधिक प्रवास करणारी प्राणी

 
 
'योशी’ नावाच्या मादी सागरी कासवाने सागरी आणि वन्यजीव संशोधन क्षेत्रात इतिहास घडवला आहे. डिसेंबर, २०१७ मध्ये २५ वर्ष वय आणि १८३ वजनाच्या ’योशी’ला आफ्रिकेतील हाऊट बंदरावरून समुद्रात सोडण्यात आले होते. आता २६ महिन्यांनंतर ’योशी’ ऑस्ट्रेलियाच्या सागरी परिक्षेत्रात आढळून आली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये तिने आफ्रिका ते ऑस्ट्रेलिया दरम्यान ३७ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. समुद्रात सोडण्यापूर्वी तिच्या कवचावर लावलेल्या ’रेडिओ टॅग’मुळे हा संपूर्ण प्रवास उलगडण्यात मदत झाली. महत्त्वाचे म्हणजे, या नोंदीमुळे ’योशी’ ही टॅग लावलेली जगातील सर्वाधिक प्रवास करणारी प्राणी ठरली आहे. परंतु, ’योशी’चा हा प्रवास खडतर आहे. ’योशी’ ही मादी समुद्री कासवामधील ’लॉगरहेड’ प्रजातीमधील आहे. १९९७ साली ती आफ्रिकेतील केप टाऊन येथील समुद्रात जपानी मासेमारीच्या बोटीत जखमी अवस्थेत आढळली होती. त्यावेळी तिचे वजन केवळ दोन किलो होते. केपटाऊनमधील ’टू ओशन अॅक्वेरियम’मध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. ती ज्या जपानी बोटीमध्ये सापडली, तिचे नाव ’योशितारो’ होते. त्यामुळे अॅक्वेरियममधील कर्मचार्यांनी तिचे नाव ’योशी’ असे ठेवले. २०१६ पर्यंत कर्मचार्यांनी तिचा सांभाळ केला. ’योशी’ साधारण २५ वर्ष आणि १८० किलोची झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तिच्या प्रजोत्पादनाचा विचार करून तिला समुद्रात सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु, इतके वर्ष पिंजराबंद अधिवासात राहिलेली योशी समुद्रात तग धरू शकेल का? याबाबत कर्मचारी साशंक होते. त्यासाठी १८ महिने तिचा विविध मार्गांनी व्यायाम घेऊन फिटनेस वाढविण्यात आला. अखेरीस २०१७ मध्ये तिला समुद्रात सोडण्यात आले आणि ’योशी’ने इतिहास घडवला. आफ्रिका ते ऑस्ट्रेलियापर्यंतच्या प्रवासात ’योशी’ प्रतिदिवस ४८ किमीचा प्रवास करत होती. ही घटना सागरी संशोधन क्षेत्रासाठी आत्यंतिक महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सागरी संशोधन करण्यामध्ये भारत अजूनही पिछाडीवर आहे. आपल्याकडे तज्ज्ञ सागरी संशोधकांची फौज असूनही केवळ सरकारी परवानग्यांच्या गुंतागुंतीमुळे आपण मागे राहिलो आहोत.
 
 

sea turtle_1  H 
 
 
 
परवानग्यांचा गुंता
 
 
'योशी’च्या अनुषंगाने भारताचा विचार केल्यास सागरी संशोधन क्षेत्रात आपण आजही पिछाडीवर आहोत. भारताच्या सागरी परिक्षेत्रात सागरी कासवांमधील पाच प्रजातींचा अधिवास आहे. त्यातही महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि तामिळनाडू राज्यात ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या विणीसाठी येतात, तर ’ग्रीन सी’ प्रजातीच्या माद्या गुजरात आणि जगातील सर्वात मोठे सागरी कासव असणार्या ’लेदरबॅक’ प्रजातीच्या माद्या लक्षद्वीप बेटांवरील किनार्यांवर अंडी घालतात. जैविकदृष्ट्या अनुकूल असणार्या या परिस्थितीत आपण समुद्री कासवांच्या संशोधनामध्ये जगाच्या बरेच मागे आहोत. महाराष्ट्राचा विचार केल्यास कोकण किनारपट्टीवर दरवर्षी सागरी कासवाची वीण होते. गेल्या दोन दशकांपासून आपण त्यांचे संवर्धन करत आहोत. मात्र, आजतागायत या सागरी कासवांवर शास्त्रीय संशोधन करण्याचा प्रयत्नही झालेला नाही. ’दक्षिण फाऊंडेशन’ नामक संस्थेने दोन दशकांपूर्वी ओडिशा राज्यात सागरी कासवांचा ’रेडिओ टॅग’ लावून अभ्यास केला होता. त्यावेळी त्यामधील मादी ऑस्ट्रेलिया खंडाला वळसा घालून पुन्हा ओडिशाच्या किनार्यावर विणीसाठी आल्याची महत्त्वपूर्ण नोंद करण्यात आली होती. मात्र, हा अभ्यास भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आढळून येणार्या कासवांबाबत मर्यादित होता. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर अशा प्रकारचा अभ्यास अजूनही झालेला नाही. तो होणे महत्त्वाचा आहे. कारण, पश्चिम सागरी परिक्षेत्रात आढळणारी कासवे कुठपर्यंत प्रवास करतात, याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. नुकतेच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ’लेदरबॅक’ कासवही आढळून आले आहे. आपल्याकडे या विषयातील तज्ज्ञांची कमतरतादेखील नाही. परंतु, सरकारी परवानगीच्या प्रक्रियांमध्ये ही संशोधनकार्ये बरीच वर्ष जखडून राहिली आहेत. सागरी कासवांवर संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र वनविभागाकडेही एक संशोधन प्रकल्प खितपत पडला आहे. त्यासही अजूनही परवानगी मिळालेली नाही. आपल्याकडे ’वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत वन्यजीवांना संरक्षण देण्यात आलेले असल्याने सरकारी परवानगीच्या अनेक पातळ्या संशोधकांना पूर्ण कराव्या लागतात. मात्र, या संपूर्ण प्रक्रियांमध्ये बरेच महत्त्वाचे प्रकल्प अडकून राहतात. त्यामुळे सरकारी परवानगीची ही संपूर्ण प्रक्रिया कुठेतरी सुकर होणे आवश्यक आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@