तोचि खरा उपदेष्टा...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2020
Total Views |
rigved_1  H x W



यश्चिकेत स सुक्रतुर्देवत्रा स ब्रवीतु न:।
वरुणो यस्य दर्शतो मित्रो वा वनते गिर:॥
(ऋग्वेद -५.६५.१)



अन्वयार्थ

(य:) जो (चिकेत:) ज्ञानी आहे, (यस्य) ज्याचा (वरुण:) सर्वश्रेष्ठ असा परमेश्वर, जो की ज्ञानी विद्वानांकडून निवडला (वरला) जातो, तसेच जो (दर्शन:) आदर्श आहे (वा) किंवा (मित्र:) सर्वांवर स्नेहाचा वर्षाव करणारा सखा, मित्र आहे (यस्य) ज्याच्या (गिर:) वाणीचा बोलण्याचा लोक (वनते) सत्कार करतात, (स:) तोच खरा (सुक्रतु) उत्तम, उत्कृष्ट कार्य करणारा आहे. (स:) त्याच उत्कृष्ट अशा ज्ञानी, श्रेष्ठ कर्म करणार्‍या विद्वानाने (देवत्रा) दिव्य परमेश्वराविषयी, सदाचाराविषयी, दिव्य तत्त्वज्ञानाविषयी (ब्रवीतु) आम्हास उपदेश करावा.




विवेचन

मानव समूहाला चांगल्या गोष्टींचा किंवा सत्यज्ञानाचा समुपदेश केल्याशिवाय समाजात बदल होणार तरी कसा? जग सुधारणार तर कधी? समाजाची व राष्ट्राची नवनिर्मिती होते, ती सत्यज्ञानाच्या प्रबोधनामुळे! पण उपदेश व प्रबोधन करणारे मात्र उत्तम आचरणाचे असावेत. ते ज्ञानी तर असावेतच, पण त्याचबरोबरच ते ज्ञानानुसार आचरण करणारेदेखील असावेत! सोबतच सर्वव्यापक परमेश्वराच्या व्यवस्थेवर श्रद्धा ठेवून त्यांची भक्ती व उपासना करणारे पण असावेत! इतकेच काय तर उपदेशक हे सत्कर्म करणारे सुजन असावेत. अशांनीच उपदेश करावा. कारण, गुण-कर्म-वचनयुक्त जीवन जगणार्‍या संत-सज्जनांच्या मागे सारे जग चालते...! थोडक्यात, ज्ञानदान करणार्‍या उपदेशकाची पात्रता म्हणजे त्यांचे सत्याचरण! याबाबत सदरील मंत्रातून दिशाबोध होतो.


वेदांनी माणसाच्या आचरणावर मोठा भर दिला आहे. जगातील सर्व ग्रंथ सत्य आणि प्रामाणिकतेला अग्रक्रम देतात. सत्य गोष्टींना प्राधान्य देतात. पण वेद हे जगातील असे महानतम ग्रंथ आहेत की, ते सत्याबरोबरच सदाचाराला म्हणजेच उत्तम आचाराला ही तितकेच महत्त्व देतात. सत्य तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरत नसेल, तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. सत्याला प्रत्यक्ष जीवनात आचरले पाहिजे. याचकरिता वेदांनी सत्ययुक्त व ज्ञानयुक्त कर्माला सर्वाधिक महत्त्व दिले आहे.


पुराणवाङ्मयदेखील म्हणते - ‘आचारहीनं न पुनन्ति वेदा:।’ जे आचरणविहीन असतात, अशांना वेददेखील पवित्र करू शकत नाहीत. म्हणूनच वेदमंत्र हे पावमानी: आहेत. ते जगाला पवित्र करणारे आहेत. किती जरी मोठा विद्वान असेल, पण त्याने आपले आचरण शुद्ध व पवित्र शुद्ध ठेवले नसेल, तर काय उपयोग? त्याचा इतरांवर कसा काय प्रभाव पडेल? वेदशास्त्रात मुखोद्गत असणारे किंवा अक्षरी ज्ञानाने पांडित्याची उपाधी ग्रहण करणारे लोक आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर पूर्वी होते व आजही आहेत, पण ज्ञानानुसार जीवन जगणारे यातील कितीजण आहेत? थोडक्यात शब्दार्थांचे ओझे वाहणार्‍या आचारहीन पंडितांपेक्षा त्यातील सत्यांशाला जीवनाचा अंग बनविणारे अल्पशिक्षित असे सत्याचारी, सामान्यजन हे लाखमोलाचे! आज याच वैदिक ज्ञानाच्या आणि संस्कृती व सभ्यतेच्या परंपरा जतन केल्या, त्या वेदांचा सत्याचार हा सद्गुण अंगी बाळगत ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे जीवन जगणार्‍या संत-सुधारकांनी! म्हणूनच संतांनी एक तरी ओवी अनुभवावी, असा जो संदेश दिला आहे, तो याच कारणाने ! संत कबीर म्हणतात - ‘ढाई आखर प्रेम का, पढे सो पण्डित होय!’ मनुस्मृतीदेखील सांगते- ‘आचार: परमो धर्म:।’ म्हणजे आचार हाच सर्वात मोठा धर्म आहे.


सदरील मंत्रात उपदेशक समाज प्रबोधकांचे आणि दिशादर्शकांचे चार गुण कथन केले आहे. ‘चिकेत:’, ‘सुक्रतु:’, ‘वरुण-आदर्श’ व ‘ईशमित्र’! उपदेशक किंवा वक्ता हा सर्वप्रथम ज्ञानी असावा. ‘चिति ज्ञाने’ या धातूपासून ‘चिकेत’ हा शब्द बनतो. म्हणजेच सर्व प्रकारच्या ज्ञानाने चैतन्यमय जीवन बनलेला माणूस. त्याचे ज्ञानयुक्त भाषण जनतेला योग्य दिशा देऊ शकते. अज्ञानी वक्ता श्रोत्यांना भ्रमात टाकू शकतो. म्हणून वक्त्याने वेदांना प्रमाण मानत आपल्या व्याख्यानाचे विषय निवडून त्याचे सत्य प्रतिपादन प्रभावीपणे केले पाहिजे. म्हणूनच वक्त्याने बहुश्रुत बनले पाहिजे. त्याच्या जिव्हाग्रावर सरस्वती नृत्य करणारी असावी, त्याचे भाषण सर्व विषयांना स्पर्श करणारे असावे. विद्वान वक्त्याचा सामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय, आध्यात्मिक विषयांवर सखोल अभ्यास असावा. दुसरी गोष्ट म्हणजे उपदेष्टा हा ‘सुक्रतु:’ म्हणजेच श्रेष्ठ कर्म करणारा असावा. त्याचे जीवन सत्कर्माने उजळले पाहिजे. ज्ञानाबरोबरच त्याने आपली नाळ कर्माशी जोडली पाहिजे. तसेच विद्वान व ज्ञानी मंडळीकरिता तिसरी बाब कथन केली आहे. ती म्हणजे ईश्वरांप्रति आश्वस्त होण्याची! प्रभू परमेश्वर हा वरुण आहे. तो सद्गुणांनुसार आपल्या भक्तांचे वरण करतो. अशा वरुणदेवतेला जो आदर्श मानतो, तोच खरा ‘उपदेशक वक्ता’ होय. म्हणूनच तर विद्वानांनी ईश्वराचे परमभक्त व्हावे, तसेच ईश्वरीय शक्तीला नेहमी समोर ठेवूनच कार्य करीत राहावे. त्यांचा भगवंतावर पूर्ण विश्वास असावा.


शेवटी म्हटले आहे ‘मित्रो वा वनते गिर:।’ परमेश्वरदेखील ज्याच्या विचारांचा सन्मान करू शकतो, असे वक्त्याचे बोलणे असावे. म्हणजेच वक्ता परमेश्वर मित्र असावा. सर्वांशी त्याने मित्रवत् नाते ठेवावे. अशा चार गोष्टींनी परिपूर्ण ज्याचे शुद्ध व पवित्र आचरण असेल, तोच इतरांचा मार्गदर्शक होऊ शकतो. अन्यथा केवळ बोलणारा, पण काहीच आचरण करणारा वक्ता कोरडा पाषाण काहीच कामाचा नाही. त्याची गती ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान...’ प्रमाणे होते. यासाठीच तर योगश्वर कृष्ण गीतेत म्हणतात -



यद्यदाचरति श्रेष्ठ: तत्तदेवेतरो जन:।
स यत्प्रमाणं कुरुते लेाकस्तदनुवर्तते॥


म्हणजेच श्रेष्ठ विद्वान व नेतेमंडळी जे-जे आचरण करतात, त्यांचे अनुसरण इतर सामान्य लोक करतात. ते जे काही प्रमाण देतात, सारा मानवसमाज त्यांनुसारच चालतो. म्हणूनच विद्वान, महापुरुष व थोरा-मोठ्यांनी शुद्ध व पवित्र आचरण करणेच महत्त्वाचे...!

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@