अन्न हे पूर्णब्रह्म... (भाग-१)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |
food _1  H x W:
 
 
 
आपल्या जीवनाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतं ते आपण ग्रहण केलेले अन्न. तेव्हा, या अन्नसेवनाशी संबंधित विविध पैलूंवर आपण पुढील काही भागांमधून प्रकाश टाकणार आहोत.
 
 
 
वैद्य कीर्ती देव - आयुर्वेदीय चिकित्सा पद्धतीमध्ये जेवढे औषधाला महत्त्व आहे, तेवढेच पथ्यालाही आहे. पथ्य हे आहार आणि विहार या दोन्हीचे असते. आहाराचे पथ्य केल्याने जो आजार आहे, तो लवकर आटोक्यात येतो. तसेच परत उद्भवू नये म्हणून ‘अपूनर्भव चिकित्से’तही मदत होते. हे झाले रुग्णावस्थेतील पथ्य, पण स्वस्थ-निरोगी व्यक्तींसाठीही पथ्यपालन आवश्यक आहे. पथ्यपालनामुळे निरोगी अवस्था अधिक काळ टिकवता येते. म्हणजेच रोगप्रतिकार समत्व वाढविता येते. शारीरिक-मानासिक बळ वाढविण्यासही हातभार लागतो. ‘जसा देश तसा वेश’ अशी एक म्हण आहे. त्याचप्रमाणे ‘जशी व्यक्ती तिची प्रकृती, तसे तिचे पथ्यपालन.’ उदाहरणार्थ - वारंवार सर्दी होणार्‍या मुलांची चिकित्सा करतेवेळी पथ्यपालन केले, तर लवकर बरे वाटते. चिकित्सेचा अवधी कमी होतो. पुन्हा उद्भवणे कमी करता येते. तसेच त्यानंतर काही ठराविक पथ्यपालन केले. (काहींना थंड बर्फ, आईस्क्रीम खाऊ नये सांगावे लागते, तर काहींना क्रिम बिस्किटे आणि वेफर्स टाळा असे सांगणे गरजेचे होते. अन्य रुग्णांमध्ये केळे, सीताफळ, पेरु इ. फळं टाळा, असे सांगावे लागते. काहींना नस्य तर काहींना जेवणानंतर लगेच झोपू नका, खूप पाणी पिऊ नका इ. पथ्य सांगावे लागते.) याचे जर पालन झाले, तर पुन्हा व्याधी उत्पन्न होत नाही. त्या अवयवाची, त्या संस्थेची सिस्टिम आणि एकूण शरीराची क्षमता उत्तम करता येते, राखता येते.
 
 
जसे ऋतू बदलतात, तसा हवामानातही बदल होतो. वातावरण बदलते. त्याप्रमाणे शरीरातील त्रिदोषांची स्थितीही बदलते. जसे वसंत ऋतूमध्ये (मार्च-एप्रिल) कफाचे त्रास वाढतात. जसे उष्मांक वाढल्याने बर्फ वितळू लागतो, तसेच शरीरातील कफदोष जर साठलेला असेल तर वितळून वाहू लागतो. अशा कफामुळे विविध त्रास उद्भवतात. सर्दी-पडसं, अंगाला खाज, जखमेतून चिकट स्राव येणे, जखम चिघळणे इ. अशा वेळेस लागणारे पथ्य हे पावसाळ्यातील पथ्यापेक्षा भिन्न असते, हे काही वेगळे सांगायला नको. पावसाळ्याच्या सुरुवातीस/ वर्षा ऋतूमध्ये वात वाहतो. जसे बदल वातावरणात होतात, तसेच बदल शरीरातही होतात. सृष्टीत वादळ येतं, वारा घोंघावतो, शरीरात हे कार्य वाताने घडून येते. ते नियंत्रणात आणण्यासाठीचे पथ्यपालन हे कफाला आळा घालताना लागणार्‍या गोष्टींपेक्षा वेगळे असणे स्वाभाविकच आहे. म्हणजे व्यक्ती तीच, तिची प्रकृतीही तीच, पण ऋतुमानातील बदलांनुसार तिच्या शरीरात भिन्न-भिन्न बदल होतात आणि आजारही वेगवेगळे होतात. म्हणजेच, पथ्यही ऋतुसापेक्ष बदलावे लागते. पथ्य जर आहाराचे असेल, तर मला सांगा - तेच जेवण तेवढाच आहार बारा महिने घेऊन चालेल का? आणि जर घेतला, तर त्याचे नीट पचन होऊन शारीरिक सर्व घटक उत्तम उत्पन्न होतील का? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.
 
 
 
सृष्टीतील बदल सगळीकडे सारखे नसतात. भारताचा भौगोलिक विस्तार लक्षात घेतल्यास कुठे बर्फाळ प्रदेश आहे, तर कुठे वाळवंट, कुठे समुद्र किनारा आहे, तर कुठे डोंगर-दर्‍या! सगळीकडे तापमान भिन्न आहे. सगळीकडचे पर्यावरण वेगळे आहे. जे काश्मीरमध्ये उगवते ते कन्याकुमारीमध्ये नाही उगवत. तसेच जो राजस्थान-कच्छ येथील लोकांचा आहार, पेहराव आहे, त्यापेक्षा बंगाल, आसाम येथील पेहराव व आहार पूर्णपणे भिन्न आहे. म्हणजेच, पथ्याचा विचार करताना त्या व्यक्तीचे केवळ वर्तमान लक्षणे विचारात घेणे पुरेसे होत नाही. त्याचा जन्म देश, जन्म ऋतू, तेथील पारंपरिक खानपानाची सवय, रुढी इ. सगळ्यांचा विचार करून पथ्य सांगणे गरजेचे आहे.
 
 
 
तसेच, जे एका विशिष्ट प्रदेशात उगवते, ते तिथे पचते. पण, नोकरी-शिक्षणानिमित्त स्थलांतर केल्यावर तसेच आहार, त्याच पद्धतीचे खाल्ल्यास त्याचा त्रास होतो. अनेक रुग्णांमध्ये असे दिसून आलेले आहे. रुक्ष वातावरणात तेलाचा आणि तिखट चवीचा वापर अधिक असतो. पण, तोच आहार जर दमट वातावरणात खाल्ला, तर तो आरोग्यावर न ठरता व्याधिकारक ठरतो. काहींना लगेच त्रास होतो, तर काहींना कालांतराने. हे वरील नियम केवळ घन आहारापुरते मर्यादित नाहीत. पाणी बदलल्यानेही आरोग्यावर परिणाम होतो. दूध-फळं इ. चाही परिणाम दिसतो.
 
 
हे झाले आपल्या रोजच्या, ताज्या आहाराबद्दलचे! पण, जर दूषित अन्न, शिळं अन्न, फ्रोजन फूड, रेडी टू इट पाकिटे इ. सर्व गोष्टींचा जर विचार केला, तर ते अजून अपायकारक होऊ शकते. आपले ध्येय जर आरोग्यप्राप्ती आणि निरोगी आयुष्य असेल, तर त्यासाठी हे आहार नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. औषधावर जगणे म्हणजे निरोगी आयुष्य होत नाही. हल्ली तिशीतच डायबिटीस आणि ब्लडप्रेशरसारखे त्रास रुग्णांना होऊ लागले आहे. लग्नापूर्वीच खूप पुरुषांमध्ये केस गळणे, टक्कल पडणे इ. दिसू लागले आहे. शाळकरी मुलांमध्ये पित्ताचा त्रास, ताण दिसू लागला आहे. दहाव्या वर्षी मासिक पाळी सुरू होऊ लागली आहे. थोडक्यात, सगळेच ‘फास्ट फॉरवर्ड’ झाले आहेत. वृद्धापकाळातील आजार तारुण्यात आणि तारुण्यातील आजार कुमारावस्थेतच दिसू लागले आहे. ‘बायोलॉजिकल एजिंग’ आणि ‘क्रोनॉलॉजिकल एजिंग’ यात तफावत मोठ्या प्रमाणात दिसते. या सगळ्यांचा सारासार विचार होणे गरजेचे आहे. औषध घेऊन आयुष्य रेटणे असे असावे की निरोगी आयुष्य जगावे, हे प्रत्येकाने स्वतःसाठी ठरवावे आणि जर निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असेल, तर ते नियमबद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. उदा. रेल्वेने जर वेळापत्रक पाळले नाही, तर काही जागी अपघात होतील आणि काही जागी रेल्वे येणारच नाही. नियमबद्ध, शिस्तबद्ध, ठरलेल्या रुळावरून, ठरलेल्या वेळी, ठराविक दिशेने आगेकूच केली, तर आपले नियोजित ठिकाण गाठणे शक्य आहे.
 
तसेच, निरोगी आयुष्यासाठी शिस्तबद्ध वागणे, वेळेत झोपणे, वेळेत उठणे, व्यायाम करणे, आहार घेणे, मन प्रसन्न ठेवणे आणि सदसद्विवेकबुद्धीने वागणे गरजेचे आहे. आहार नियम आणि आपली प्रकृती याचा विचार आपण या लेखमालेतून करणार आहोत. काय खावे एवढेच नाही, तर कोणी खावे, कसे खावे आणि किती खावे, याबद्दलही जाणणे महत्त्वाचे आहे. मधुमेह असताना साखर खाऊ नये असे असले, तर मग गोड फळं खावीत का? कधी आणि किती? इ. गोष्टीही गरजेच्या आहेत. निरोगी असतानाचा आहार आणि रुग्णांमधला आहार हेदेखील वेगवेगळे असते. अशा सगळ्या गोष्टींबद्दल या लेखमालेतून आपण जाणून घेऊया. (क्रमश:)
 
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@