कुबेर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |
Kuber _1  H x W


 
 

समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कार्यरत असणार्‍या ‘कुबेर फांऊडेशन’च्या सामाजिक कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

 
 

सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला येणारे अनुभव हे त्रासदायकच असतात, असा खूप जणांचा अनुभव असेल हो ना? पण काहीतरी चांगलं सकारात्मक करण्याच्या ध्येयाने झपाटलेला एक अवलिया या सोशल मीडियाचा वापर किती उत्तम रितीने करू शकतो आणि एक अशी संस्था उभारू शकतो, जी सामाजिक भान ठेवून समाजातील प्रत्येक स्तरातील माणसांसाठी मदतीचा हात पुढे करते. संगमनेरमधील असाच एक अवलिया संतोष जगन्नाथ लहामगे. हे एक असे अवलिया आहेत, ज्यांनी जगातील काही लोकांना ज्यांना काहीतरी सकारात्मक सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे, अशांना एकत्र आणले. सुरुवातीला फेसबुकवर त्यांनी ‘कुबेर’ नावाचा एक समूह सुरू केला. जिथे समविचारी, सामाजिक कार्याची आवड असणारे समाजभान असणारे लोक एकत्र आले.

 
 

‘कुबेर’ म्हणजे धनाची देवता. इथे या समूहाचे धन म्हणजे लोकसंग्रह. अगणित सामाजिक काम. छोटसं लावलेलं रोप आता पाच वर्षांचे झाले आणि आता त्याचा वटवृक्ष होतो आहे. ‘कुबेर फाऊंडेशन’ हे त्या वटवृक्षाचे नाव. काय काय करते हे ‘कुबेर फाऊंडेशन’ सुरुवातीला याची काम करण्याची पद्धत समजून घेऊया. या समूहात आहेत, जवळ जवळ १८०० सभासद. हे अगदी कोकण ते कन्याकुमारी. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातीलदेखील आहेत. म्हणून मी अभिमानाने म्हणते, ‘कुबेर ग्लोबल’ आहे, तर हे असे एकत्र असलेले लोक, त्याच्या त्यांच्या विभागानुसार एकत्र केले गेले आहेत. त्यांचे तसे ग्रुप केले गेले आहेत. सामाजिक कार्य हे त्यामुळे संपूर्ण देशातून होत असते, ‘कुबेर’कडून असे म्हटले तर चूक ठरणार नाही.

 
 

राजुरी (जि.उस्मानाबाद) इथे जल संधारणाचे काम पूर्ण केले गेले. तिथे एक किलोमीटर नदी खोलीकरण व साफसफाई करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटवलाच, पण २०० एकर जमीन ओलीता खाली आली.पालघरमध्ये दिव्यांगांचा सामूहिक विवाह ‘कुबेर’तर्फे लावून दिला जातो. कोल्हापूर जवळील शिये येथील ‘करुणालय’ हे एचआयव्हीबाधित मुलांसाठी असलेली संस्था तिथे तीन शौचालये व बाथरूम बांधून देण्याचे काम केले. आता जेव्हा पालघरजवळच्या सफाळे, विलंगी गावात वनवासी महिलांच्या आरोग्याशी निगडित काही गोष्टी तेथील ‘कुबेर’ समूहातील सदस्यांच्या निदर्शनास आल्या की, करणे गरजेचे आहे तेव्हा तेथील ‘कुबेर’नी पुढकार घेऊन या दोन गावातील जवळ जवळ ३०० हून अधिक महिलांना सॅनिटरी पॅड्स आणि मच्छरदाणी असे वाटप केले. त्याच बरोबर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शनदेखील दिले गेले.

 

औरंगाबादमध्ये अपंग मुलांना व्हीलचेअर्स आणि गणवेश वाटप केले गेले. कान्हेफाटा येथील अनाथाश्रमात ९० मुलांना ब्लँकेट आणि शूज वाटप केले गेले. अनंत चतुर्दशीनंतर आपल्याला माहीतच आहे, दादर चौपाटीची अवस्था कशी असते. ‘कुबेर’कडून स्वच्छता अभियानांतर्गत चौपाटीची सफाई मोहीम राबवली गेली‘पाणी फाऊंडेशन’ ‘वॉटरकप’मध्ये धुळे तालुका बिलाडी या गावी श्रमदानात केले गेले. अनेक शाळांमधील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, तर ‘कुबेर’ दरवर्षी करतच असते. वृक्षतोड ही ‘ग्लोबल वार्मिंग’साठी मुख्य कारण आहे, ‘कुबेर’कडून ‘एक घर एक झाड’ हा उपक्रम शहादा इथे राबविण्यात आला. त्याचसोबत वेगळ्या वेगळ्या विभागातदेखील वृक्षारोपण करण्यात आले. आपले किल्ले हे आपला इतिहास आहेत, जो आपण जपला पाहिजे. आपण अभिमानाने किल्ले चढायला पाहायला जातो. पण तिथे कितीतरी प्लास्टिक कचरा करून येतो. तो किल्ला आणि परिसर स्वच्छ करायचं काम ‘कुबेर’कडून केलं जात. नाशिकमधील रामशेज हा किल्ला स्वच्छ करून तिथेदेखील वृक्षारोपण केले गेले.

 

खरेतर पुस्तकं माणसाचे खरे मित्र असतात, असं म्हणतात. ‘वाचाल तर वाचाल’ हेदेखील आपण ऐकलेलं आहे. तुम्ही वाचनाने समृद्ध होता, तुमच्या विचारांना चालना मिळते. हे सगळ जाणून ‘कुबेर’कडून संपूर्ण महाराष्ट्रात फिरते वाचनालय सुरू आहे. प्रत्येक विभागवार ते सुरळीत सुरू आहे. वाचन-लिखाण स्वनिर्मितीचा आनंद हा काही वेगळाच असतो. त्याची बरोबरी कशाही बरोबर तुम्ही करू शकत नाही. समूहात अनेक उत्तम लिहिणारे हात आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कुबेर’कडून ‘साहित्यिक कट्टा’ हा उपक्रम प्रत्येक विभागात राबवला जातो. जिथे तुमच्या कलागुणांना वाव दिला जातो. प्रोत्साहन दिले जाते. याचीच पुढची पायरी म्हणजे या फाऊंडेशनकडून दोन कथासंग्रह प्रकाशित केले गेले, ‘आरंभ’ आणि ‘संवादिनी’ आणि मराठी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या दिवाळीच्या फराळासोबत हातात हवाच, असा दिवाळी अंकदेखील गेले तीन वर्षे प्रकशित केला जातो.

 

राज्यातील मानाचे पुरस्कारदेखील या अंकाला मिळतात. कारण, यात असते दर्जेदार साहित्य. समाजातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या घरातले वृद्ध. काहीवेळा या लोकांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. कारणं प्रत्येकाची वेगळी असतील, पण ‘कुबेर’ समूह मात्र या सर्वांना योग्य तो मान देतो आणि त्याच्यासाठी शक्य असेल ते सर्व काही करतो. वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम करणे, त्यांच्यासोबत एक दिवस घालवणे, मुख्य म्हणजे त्यांना वेळ देणे. ‘तुम्हीसुद्धा महत्त्वाचे आहात आमच्यासाठी’ ही भावना त्यांना उभारी देणारी असते, तेच काम ‘कुबेर’ करते. त्यांना वेळ देते.

 

खरंतर कामाची यादी खूप मोठी आहे, पण अगदी आताचे ताजे उदाहरण द्यायचे तर गेल्या वर्षी वरुण राजाने उडवलेली दाणादाण आपण कोणीच विसरू शकत नाही. त्यावेळीदेखील ‘कुबेर’कडून मदतीचा हात लगेचच पुढे केला गेला. याची विशेषतः म्हणजे ‘कुबेर’ समूहाकडून जवळ जवळ ११ लाखांचा निधी पूरग्रस्तांसाठी जमा झाला आणि त्यांना लागणार्‍या जीवनावश्यक वस्तू जसे की, औषधे, कपडे, भांडी हेदेखील पुरवण्यात आले. आता हा ११ लाखांचा जमा झालेला निधी ‘कुबेर’ समूह वापरणार आहे. सातारा जिल्ह्यातील नरफदेव नावच पुरात पूर्णपणे वाहून गेलेली गाव दत्तक घेऊन त्याचा पुनर्विकास करण्यासाठी. सरकारकडून योग्य त्या परवानगी मिळण्याचे काम सुरू असून लवकरच ते काम पूर्ण होईल.

 

आज जगभर कोरोनाचे थैमान सुरू आहे. पुणे हे शहर विद्येचे माहेरघर आहे. अनेक शहरांतून देशातून अनेक मुले इथे शिकण्यासाठी येतात. आज सगळीकडे बंद हॉटेल्स, खानावळी बंद. साधा वडापावदेखील त्या मुलांना मिळू शकत नाही. अशा वेळी मुलांची जेवणाची गरज लक्षात घेऊन ‘कुबेर’कडून अशा मुलांना दुपार आणि रात्रीचा जेवणाचा डबा देण्याची सोय केली गेली. पुण्यातील ‘कुबेर’करांनी हे काम आनंदाने पार पाडले आहे.

 

या समूहाला जोडले गेले आहेत, अनेक उच्चपदस्थ अधिकारी, चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार, संगीतकार, निष्णात डॉक्टर्स, लेखक, कवी, समीक्षक, सर्वांचे ध्येय एकच. समाजाप्रति असलेले देणे योग्यरीतीने देणे. आता या १८०० लोकांचे स्वप्न आहे एक शाळा सुरू करण्याचे आणि त्या दिशेने ठोस पावलंदेखील पडली आहेत. ५ जानेवारी रोजी संगमनेरपासून साधारण १० किमींवर ‘कुबेर फाऊंडेशन’च्या शाळेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. लवकरच तिथे सरस्वतीचे मंदिर उभे राहील. हा ध्यास आहे हे स्वप्न आहे. ज्याच्या जवळ लोकसंग्रहाचे धन आहे, अशा ‘कुबेर’ला या स्वप्नपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा...! कितीतरी गोष्टी अजूनही लिहिण्यासारख्या आहेत. पण शब्दमर्यादा येतेच. जाताना शेवटी एकच म्हणावंस वाटतं, हा वटवृक्ष असाच बहरत राहू दे. अनेकांची सेवा गरजूंना मदत, तुमचे हात करत राहू देत.


- तनुजा इनामदार 

९०४९७४५९९९

@@AUTHORINFO_V1@@