खळबळजनक! नगरमध्ये मशिदींत कोरोनाग्रस्त विदेशी नागरिकांचे वास्तव्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |

Jamkhed _1  H x

 
 
नगर : नगर जिल्ह्यातील मशिदीत पुन्हा एकदा विदेशी नागरिक सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी जामखेड शहरातील काझी मशिदीत दहा विदेशी नागरिक नमाज पठण करताना आढळले होते व त्यापैकी दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. हे दोन्ही नागरिक फ्रान्स आणि आयव्हरी कोस्टचे रहिवासी होते. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ व १३ अशा ३१ जणांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
 
जामखेडमधील मशिदीत सापडलेले नागरिक आयव्हरी कोस्ट, इराण, टांझानिया, फ्रान्स या देशांचे रहिवासी असून ते जामखेडच्या काझी गल्लीतील मशिदींत १२ दिवस वास्तव्यास होते. मात्र, असे असून मशिदीच्या विश्वस्तांनी यासंबंधीची माहिती पोलिस प्रशासनाला दिली नाही. जमावबंदी असूनही अशाप्रकारे नमाज पठण वा अन्य कारणांसाठी नागरिकांचा घोळका जमल्याने पोलिस प्रशासनाने पुढे मशिदीच्या विश्वस्तांवर गुन्हादेखील नोंदवला.
 
दरम्यान, शहरातील मशिदींत कोरोनाग्रस्त परदेशी नागरिक नमाज पठण करत असल्याचे निदर्शनास आल्याने महसूल प्रशासनाने तालुक्यातील राजुरी, लोणी, सांगवी (मुसलमानवाडी), बावी, हळगाव, दिघोळ, पाटोदा, धनेगाव, फक्राबाद व पिंपळगाव आळवासह काझी गल्ली व खर्डा चौकातील मशिदी सील केल्या आहेत. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी ही माहिती दिली आहे.
 
जामखेडमधील मशिदीत कोरोनाग्रस्त परदेशी नागरिक नमाज पठण करताना आढळल्याला दोन दिवस उलटत नाही तोच नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातही मशिदींत परदेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे समोर आले. कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिसांकडून शासकीय दिशा-निर्देशांचे पालन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पाचपेक्षा अधिक जण एका ठिकाणी जमा झाल्यास कारवाई करण्यात येत असून गस्तही घातली जात आहे.
 
सोमवारीदेखील नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे, पोलिस उपनिरीक्षक बी. एस. दाते, व्ही. यू. गायकवाड, टी. बी. गिते, ए. एस. कुदळे, एम. एल. मुस्तफा, एस. बी. गुंजाळ हे पोलिस कर्मचारी नेवासा शहरात गस्त घालत असताना एका मशिदीत विदेशी नागरिक थांबले असल्याची माहिती त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शहरातील मरकस मशिदीवर छापा टाकला असता  दहा विदेशी नागरिक आढळून आले.
 
 
जिबुतीमधील पाच, बेनिन येथील एक, डेकॉर्ट येथील तीन व घाना येथील एका नागरिकाचा यांत समावेश आहे. धक्कादायक म्हणजे या विदेशी नागरिकांनी नगर, जामखेड, संगमनेर व नेवासा अशा चार तालुक्यांत धर्मप्रसाराचे काम केल्याचेही समजते. यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोकाही वाढला आहे. दरम्यान, जमावबंदीचा आदेश माहिती असूनही मशिदीत दहा विदेशी नागरिक आढळल्याने पोलिसांकडून भालदार (मरकस) मशिद ट्रस्टचे पठाण जुम्माखान नवाबखान व सलीम बाबुलाल पठाण यांच्याविरोधात पोलिस कॉन्स्टेबल प्रतापसिंह दहिफळे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच या दहा विदेशी नागरिकांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@