कोरोनामुळे बेघरांचे खाण्याचे हाल
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनामुळे लाॅकडाऊन असताना अनेक गरीब आणि बेघर लोकांच्या खाण्याचे हाल झाले आहेत. अशा लोकांसाठी भारतीय रेल्वे विभाग धावून आला आहे. 'रेल्व किचन' खुले करण्यात आले असून रेल्वे स्थानकांच्या परिसरात गरीब आणि बेघर लोकांना अन्नदान करण्यात येत आहे.
लाॅकडाऊनमुळे बेघर लोकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या लोकांच्या उदरभरणासाठी सामाजिक संस्थांसह सरकारनेही काही केंद्र सुरू केली आहेत. यामध्ये रेल्वे विभागानेही आपले योगदान दिले आहे. रेल्वेचे स्वयंपाकगृह म्हणजे 'रेल्वे किचन' अशा बेघर लोकांसाठी खुले करण्यात आले आहेत. यामाध्यमातून बेघर आणि गरीब लोकांना अन्न पुरविण्याचे काम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी 'सोशल डिस्टन्स'चा अवलंब करुन या लोकांना रांगेत उभे करुन अन्नाचे वाटप सुरू आहे. देशात सर्व ठिकाणी रेल्वे विभागाकडून हे काम करण्यात येेत आहे. देशावरील कोरोनाच्या या संकटात रेल्वे विभाग वेळोवेळी मदत करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या रेल्वे डब्यांचे रुपांतर कोरोना विलगीकरण वाॅडमध्ये केले होते. आठवड्याभरांपासून विशेष रेल्वे गांड्याच्या मदतीने खाद्य आणि औषधांचा पुरवठा देशातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे.