घरी बसाल तर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |

corona_1  H x W 


आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला एक माणूस म्हणून आवाक्याच्या बाहेर असतात. आपली बुद्धी, आपली ऊर्जा, आपली ताकद कशाकशालासुद्धा या गोष्टी दाद देत नाहीत. साहजिकच या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी घातक असतात.

 

बहुतेक वेळा या अशा संपूर्ण मानवजातीच्या कह्यात न येणार्‍या गोष्टी त्या काळासाठी तरी अमानवी असतात. त्या जणू विश्वाच्या विनाशासाठी असतात. मानवी ताकदीच्या, मर्यादेबाहेरच्या असतात. या गोष्टी निसर्गाशी संबंधित असतात. सामान्यतः आपण निसर्ग प्राणिमात्रावर कोपला आहे, असे अशा कठीण प्रसंगी समजतो. यात ज्वालामुखी आला, भूकंप आला वा अमर्याद पूर आला. पण, जेव्हा कोरोनासारखी संसर्गजन्य महामारी जगात येते, तेव्हा आपण पूर्ण हवालदिल होतो.

 

आज जगामध्ये सगळ्यात श्रीमंत देश याच्या क्रूर विळख्यात आले आहेत. त्यांची डोळ्यांना चक्रावणारी संपत्ती, आपल्या बुद्धीला ठेंगू ठरविणारी शास्त्रीय बुद्धिमत्ता, आरोग्याचा ऐषोराम, त्याची तांत्रिक बुद्धी सगळ्या क्षमतेने कोरोनासमोर लोटांगण घातले आहे. आज शास्त्र काही काळापुरते का होईना, या सर्व ताकदीसमोर खुजे पडले आहे. काय करावे वा काय करू नये, हे कुणालाच काही सुचत नाही. जग जवळजवळ कोरोनाने पादाक्रांत केल्यातच जमा आहे. शत्रू जेव्हा क्षमतेने भारी असतो, तेव्हा आपल्याला त्याला रोखण्याची बौद्धिक आणि मानसिक क्लृप्ती वापरण्यात शहाणपणा आहे.

 

तसाही, हा शत्रू आपल्या शास्त्राच्या चौकटीतून आपल्याला समजलेला आहे. तो काही अगदीच अपरिचित नाही. कोरोना आपल्याला स्पर्शनीतीतून नामोहरम करतो. म्हणून त्याच्या स्पर्शाच्या ब्रह्मास्त्राच्या त्या विघातकशक्तीला आपण कसे पराभूत करूशकतो वा आपण स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना कसे त्यापासून वाचवू शकतो, हे शास्त्रीय विवेचन महत्त्वाचे आहे. त्यासाठी ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांचे विलगीकरण करतात. आपल्याला मात्र आज-काल दुसर्‍यापासून दूर राहा, असे वारंवार सांगितले जाते. माणसाच्या दुनियेत राहायचे, पण लांबूनच संवाद साधायचा किती कठीण गोष्ट आहे माणसासाठी! माणसात राहायचे, पण माणसापासून दूर राहिले, तरच आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. हे करायचे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन अत्यंत महत्त्वाचे शब्द सांगितलेत आणि ते म्हणजे ‘संकल्प’ आणि ‘संयम.’ यातील संकल्पाबद्दल आपण थोडे समजून घेऊया.

 

संकल्प म्हणजे अशी संकल्पना आहे की, एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याचे नियोजन कसे करायचे आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःला पूरक आणि पोषक असे निर्णय कसे घ्यायचे, हे प्रत्यक्षपणे समजले पाहिजे. संकल्प किंवा दृढनिश्चय हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. संकल्प हा आपल्या आयुष्यातील अनेक प्रांतात महत्त्वाचा आहे. उदा. शिक्षण, काम, व्यायाम, प्रोफेशन, पालकत्व आणि आरोग्य संबंधी असे दिसून आले आहे की, आपला दृढनिश्चय आपल्याला यशस्वी करू शकतो. किंबहुना, संयमातच यशाची गुरुकिल्ली आहे. संयमाची थिअरी सूचित करते की, सामान्यतः कठीण परिस्थितीतसुद्धा व्यक्ती आपल्याला जे हवे आहे ते मिळविण्याचा जीवापाड प्रयत्न करते. त्यासाठी ती सर्वप्रकारच्या तडजोडी करते. सगळी बंधने पाळायला प्रवृत्त होते. आत्मसंयमामुळे व्यक्ती आपल्या अंतर्गत प्रेरणेमुळे वा बाह्य गोष्टींच्या गरजांमुळे जिथे आवश्यक आहे, तिथे जरूरी आहे तिथे बिनदिक्कतपणे स्वतःला बदलू शकते. माणूस दृढनिश्चयामुळे वा संयमामुळे ज्या गोष्टी आपल्या हिताला आवश्यक आहेत, ज्या आपल्याला कल्याणकारी आहेत, त्या गोष्टी निश्चित करतो. इतकेच नाही, तर ज्या गोष्टी आपले वाईट करतात, आपला र्‍हास करतात, त्या गोष्टी माणूस संयमानेच टाळतो.

 

अंतर्गत प्रेरणा व ज्यामुळे आपले हित सामावलेले आहे, ती संकल्पना म्हणजेच संयम. आज एकमेकांपासून दूर राहण्यामध्येच आपले आणि मानवजातीचे हित सामावलेले आहे. आपला संकल्प आज अत्यंत महत्त्वाचा आहे.

घरी बसाल तर

आयुष्य जगाल...

आयुष्य जगाल तर

जगाला बघाल...

डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@