प. बंगालच्या लोकसाहित्याचा ‘विश्वास’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020   
Total Views |


Bishwas _1  H x

 


जातीच्या पलीकडे माणूसपणाची संस्कृती असते. जी जगा आणि जगू द्या सांगते. भारतीय लोककला आणि लोकसंस्कृतीतून हा वारसा आपल्यापर्यंत आला आहे, तो वारसा जपणारे अजिंतो विश्वास...

पश्चिम बंगालला सुसंस्कृत आणि सुजाणतेच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे. पण, महाराष्ट्रात हिंदुत्वाचे तेज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, तसा इथे कोणी राजा झाला नाही. त्यामुळेच प. बंगालमध्ये हे आज जे चालले आहे, ते राजरोस चालले आहे,” असे मत प. बंगालचे एक नामांकित साहित्यिक आणि विचारवंत अजिंतो विश्वास यांनी व्यक्त केले. अजिंतो हे जादवपूर विद्यापीठामध्ये बंगाली साहित्य विषयाचे विभाग प्रमुख होते.

तसेच गौर बंगाल विद्यापीठ, मालदाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. प. बंगालच्या साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. आजपर्यंत त्यांनी ३० पुस्तके लिहिली असून बंगालच्या साहित्यविश्वात या पुस्तकांना विशेष स्थान आहे. बंगालच्या लोककला आणि लोकसाहित्याचे ते संशोधक आहेत. प. बंगालच्या लोककला आणि लोकसाहित्यावर त्यांची पुस्तके, संशोधनपर लेख प्रसिद्ध आहेत. प. बंगालमध्ये पूर्वी कम्युनिस्ट आणि आता तृणमूल काँग्रेसचे राज्य आहे. या दोन्ही सत्तेमध्ये प. बंगालच्या संस्कृतीवर काय परिणाम झाला, याबाबत अजिंतो यांची मतं अतिशय अभ्यासपूर्ण आहेत. साम्यवाद किंवा आता तृणमूल काँग्रेसच्या विरोधात बोलणार्‍यांना इथे भयंकर त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर अजिंतो यांचे निर्भीड सांस्कृतिक देशनिष्ठ विचारांचे महत्त्व वेगळे आहे.

विश्वास परिवार तसा मूळ असनसोलचा. अनंतकुमार आणि पुष्पो या दाम्पत्याला सहा अपत्ये. त्यापैकी एक अजिंतो. अनंतकुमार दहावी शिकलेले, पण आरोग्यसेवेबाबत त्यांचा दांडगा अभ्यास. ते आयुर्वेदिक औषधे बनवत. ते बुद्धिमानच होते. पुष्पो या चारचौघ्या बंगाली गृहिणीसारख्याच. मात्र, आपल्या मुलांनी शिकावे याचा त्यांना प्रचंड ध्यास. घरची तशी गरिबीच. या गरिबीमध्ये कधीही नवेकोरे कपडे किंवा पुस्तके मुलांना मिळाली नाहीत. मात्र, विश्वास कुटुंबाने मुलांना संस्कार मात्र भरभरून दिले. अजिंतो महाविद्यालयात शिकू लागले. तेव्हा गणित आणि भूमिती या विषयाची खाजगी शिकवणी सर्व विद्यार्थी लावत. मात्र, गरिबीमुळे अजिंतो यांना शिकवणी लावणे शक्यच नव्हते. यावर उपाय म्हणून अनंतकुमार यांनी गणित आणि इतर विषयांची सेकंड हॅण्ड पुस्तके बाजारातून विकत आणली. त्या पुस्तकांचा अभ्यास केला. स्वत: अभ्यास करून ते अजिंतोची याच विषयाची शिकवणी घेऊ लागले. आश्चर्याचीच गोष्ट आहे, पण खरी आहे. अजिंतो या शिकवणीवर एम.ए. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. त्यांनी पुढे प. बंगालचे मध्ययुगीन संत लोचन दास यांच्यावर पीएच.डी केली.

पुढे ते महाविद्यालयात शिकवू लागले. त्याचकाळात प. बंगाल राज्यातून त्यांचे नाव ‘आंबेडकर फेलोशिप’साठी निवडले गेले. त्यांना फार आश्चर्य वाटले की, आपण तर काहीच निवेदन अर्ज दिले नाही. मग आपले नामांकन कसे. मात्र, या फेलोशिपमुळे त्यांची ओळख देशभरातील विद्रोही साहित्यिकांशी झाली. महाराष्ट्रातील अर्जुन डांगळे, दया पवार, नामदेव ढसाळ, ज्योती लांजेवर, यशवंत मनोहर यांच्याशीदेखील भेट-संवाद आणि थोडीफार मैत्रीदेखील झाली. पण, या वर्तुळात शिरल्यावर त्यांना जाणवले की हे काहीतरी वेगळेच आहे. यावर अजिंतो म्हणतात, “दलित म्हणजे केवळ पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्धच असतात का? बंगालमध्ये १८ टक्के राजवंशी आहेत, १७ टक्के नामशुद्र आहेत.

१४ टक्के बागदी आहेत आणि पोगोखत्री १२.६ टक्के आहेत. हे सगळे मागासवर्गीय. पण, आमचा धर्म हिंदूच आणि संस्कृतीही हिंदूच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलकात्यामधून निवडून आले. त्यावेळी नामशुद्र समाजातील जोगेंद्रनाथ मंडल यांनी खूप मेहनत घेतली होती. बंगालच्या राजकारणामध्ये मागासवर्गीय समाजाचे योगदान आजही मोठे आहे. पण, कम्युनिस्ट आणि तृणमूलमध्ये या समाजातील नेतृत्वच नाही. आता बंगालमध्ये नव्याने उदय होणार्‍या भाजपने या समाजाला नेतृत्व बहाल केले आहे. महाराष्ट्रात ‘अस्मिता दर्शन’ वगैरे पत्रिका निघतात ना? या इथेही निघतात, पण माझ्यासोबत एक घटना घडली आणि माझे डोळे उघडले.”

प्रा. अजिंतो यांनी सांगितले की, ते आणि महाराष्ट्रातील काही विद्रोही लेखक पंजाबला भेटले होते. तिथे दलित सॉलिडिटरी संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता. तिथेच त्यांना या संस्थेचे जेम्स मेसी भेटले. सगळ्या दलित विचारवंतांशी-साहित्यिकांशी त्यांनी चांगली मैत्री केली. देशभरातल्या दलित विचारवंत साहित्यिकांचे ऐक्य व्हावे, दलितांचे हित व्हावे यासाठी काम करायचे, असे त्याने ध्येय सांगितले. मेसीने यासाठी वाट्टेल तितका पैसा देण्याचे कबूल केले, आंतरराष्ट्रीय स्तरावर वैचारिक पाठबळ देण्याचेही कबूल केले. त्यावेळी अजिंतो भारावून गेले. पण, या सार्‍यासाठी मेसीने अट ठेवली की, ‘अजिंतोने बंगालमधील त्यांच्या नामशुद्र समाजाचे येनकेनप्रकारे धर्मांतर करावे. त्यांनी समाजबांधवांसोबत हिंदू धर्म त्यागून ख्रिस्ती धर्म स्वीकारावा.’ स्वतंत्र विचारांच्या अजिंतोंनी दलित कल्याणाच्या आणि विचारवंतांच्या नावाने चालणारे षड्यंत्र ओळखले आणि या सार्‍याला रामराम ठोकला.

तेव्हापासून अजिंतो हे बंगालमधील अत्यंजांच्या वैचारिक, सामाजिक उत्थानासाठी कार्य करतात. अजिंतो म्हणतात, “जात विसरणे हे महत्त्वाचे आहे. मात्र, आज अत्यंज समाजामध्येही आरक्षण तत्त्वानुसार जातगट प्रबळ झाले आहेत. जातीच्या पलीकडे प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठीची परिस्थिती आणि संस्कृती आवश्यक आहे. ती सर्वांना मिळायला हवी. जातिभेदाविरुद्ध लढताना आपण जातीच्या भिंती तर खंबीर करत नाही ना? याचा विचार करायला हवा. ती जबाबदारी सर्व भारतीयांची आहे.”

@@AUTHORINFO_V1@@