ओवेसींची गरळओक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2020
Total Views |
agralekh_1  H x


आपल्यामागे फिरणारे समर्थक जसेच्या तसे सांभाळून ठेवायचे तर त्यांच्या मना-मेंदूत प्रामुख्याने हिंदूंबद्दल द्वेष भिनवणे, हे एमआयएमचे नि त्याच्या म्होरक्यांचे पहिले व एकमेव काम! जेणेकरून मुस्लीम समाज केवळ धार्मिक विद्वेषातच आकंठ बुडालेला राहावा, विकासाची दारे त्याच्यासाठी कधीही उघडली जाऊ नये नि त्यातूनच तो आपल्यामागे गुलामासारखा फिरत राहावा, ही यांची मानसिकता.


“आम्ही पॅड आणि ग्लोव्हज घालून तयारच आहोत. कॅप्टनने इशारा केला की मैदानात उतरू, तत्पूर्वी कॅप्टनने सलामीवीराच्या नात्याने डावाला सुरुवात केलीच आहे. परंतु, डावाचा शेवट नाईट वॉचमनच्या रूपात आपण करू,” असे चिथावणीखोर वक्तव्य एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले.

मुस्लीम महिला, पुरुष, तरुण, तरुणींना आधुनिक जगाची तर सोडाच पण संविधानातील अधिकार आणि कर्तव्यांची जाणीवही होऊ नये, म्हणून त्या धर्मांतील मुल्ला-मौलवी, धर्ममार्तंड सदैव तत्पर असतात. हमीद दलवाईंसारख्या व्यक्तीने मात्र ५० वर्षांपूर्वी आपल्या धर्मबांधवांना शतकानुशतकांच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी, मानवी मूल्यांची रुजवात करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. दुर्दैवाने हमीद दलवाईंनी लवकरच जगाचा निरोप घेतला नि अशावेळी स्वतःला मुस्लीमहितैषी पक्ष म्हणवून घेणार्‍यांची दलवाईंच्या समाजसुधारणा चळवळीला पुढे नेण्याची जबाबदारी होती. परंतु, तत्कालीन काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष वगैरेंनी हे काम केले नाही नि आताही एमआयएमसारखा पक्ष त्या दिशेने एक पाऊलही उचलायला तयार नसल्याचे स्पष्ट होते. उलट देशभरातील मुस्लिमांचा मसिहा होण्यासाठी एमआयएमने धार्मिक कट्टरतेचा आधार घेत तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांत हात-पाय पसरवायला सुरुवात केली. आपल्यामागे फिरणारे समर्थक, पाठीराखे, अनुयायी जसेच्या तसे सांभाळून ठेवायचे तर त्यांच्या मना-मेंदूत प्रामुख्याने हिंदूंबद्दल द्वेष भिनवणे, हे त्या पक्षाचे नि त्याच्या म्होरक्यांचे पहिले व एकमेव काम झाले. असदुद्दीन ओवेसी किंवा अकबरुद्दीन ओवेसी यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्ये त्या कामाचाच एक भाग आणि त्यांचे आताचे विधानही त्यातलेच. जेणेकरून मुस्लीम समाज केवळ धार्मिक विद्वेषातच आकंठ बुडालेला राहावा, विकासाची, प्रगतीची दारे त्याच्यासाठी कधीही उघडली जाऊ नये नि त्यातूनच हा सगळा समाज आपल्या पाठीमागे गुलामासारखा फिरत राहावा, ही यांची मानसिकता.

हैदराबादेतील दोन्हीही ओवेसी बंधू संधी मिळेल तेव्हा समाजात विष कालवताना दिसतात. आपले विखारी वक्तव्य किती घातक सिद्ध होऊ शकते, त्याचा किती वाईट प्रभाव पडू शकतो, याची त्यांना अजिबात फिकीर नसते. म्हणूनच आज दिल्लीतील हिंसाचाराची आग शांत झाली नाही, तोच ओवेसींनी भडकाऊ विधान करत त्यात तेल ओतण्याचे काम केले. अकबरुद्दीन ओवेसींनी हा प्रकार आताच केलेला नाही, तर याआधीही २०१३ साली १५ मिनिटांसाठी पोलीस हटवल्यास हिंदूंना संपवण्याची भाषा त्यांनी केली होती. २०१९ सालीही ओवेसींनी आपल्या सहा वर्षांपूर्वीच्या विधानाची आठवण काढत हिंदूंना धमकी दिलीच होती. म्हणजेच मुस्लिमांनी डोक्यात राख घालून हिंदूंविरोधात दंगल पेटवावी नि त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजली जावी, हा त्यांचा मतलब! इथूनच देशात, समाजात शांतता कोणाला नको, हे अधोरेखित होते तसेच अराजकता माजवण्यासाठी कोण हपापलेले आहे, तेही कळते.

सध्या देशातल्या निवडक ठिकाणी मूठभर लोकांकडून नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोधाच्या नावाखाली अफवा पसरविण्याचे काम जोरात सुरू असल्याचे दिसते. सीएएविरोधकांना कसेही करून देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची असून मुस्लिमांना हिंदूंविरोधात रस्त्यावर उतरविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. दिल्लीत त्याचा केवळ एक नमुना पाहायला मिळाला, पण ते सर्वत्र व्हावे, असे त्यांच्या मनात आहेच. त्यासाठी मोदी-शाह वा भाजपविरोधी नव्हे तर देशविरोधी पिलावळीही कामाला लागलेल्या आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांत शरजिल इमाम, सोनिया गांधी, उमर खालिद, अमानातुल्ला खान, ताहीर हुसैन वगैरेंनी केलेली विधाने व कृत्ये हा त्या व्यापक कटाचाच एक भाग होता. एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १६ फेब्रुवारीला केलेले, “१५ कोटी मुस्लीम १०० कोटी हिंदूंवर भारी पडतील,” हे विधानही त्याच मालिकेतले. एकूणच देशातील बहुसंख्य हिंदूंविरोधात गरळ ओकायची आणि मुस्लिमांत असुरक्षिततेची भावना निर्माण करायची, या सर्वांची खेळी असल्याचे दिसते. परंतु, देशातील तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी, उदारमतवादी, लोकशाहीचे रक्षणकर्ते आदी लेबल लावलेले लोक याविरोधात एक शब्दही उच्चारताना दिसत नाहीत. आसामला भारतापासून तोडण्याची मनिषा बाळगणारा शरजिल इमाम, दंगलीत पिस्तूलातून गोळ्या झाडणारा शाहरुख मोहम्मद आणि अकबरुद्दीन ओवेसींसारखे राजकारणी त्यांच्या दृष्टीने निरपराध आणि मासूम किंवा वाट चुकलेली माणसे असतात. पण ज्यांच्या आंदोलनामुळे राजधानीतील असंख्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला, ते आंदोलन बंद करण्याची मागणी करणारे या लोकांच्या नजरेत अट्टल गुन्हेगार असतात. हा दुटप्पीपणाच ओवेसी, वारिस पठाणसारख्यांना द्वेषाची पेरणी करण्यासाठी प्रोत्साहन देणारा असतो, तसेच या क्रियेवर प्रतिक्रियाही उमटतच असते.

विशेष म्हणजे यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश करावा लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘भारतमाता की जय’ या घोषणेवर आक्षेप घेत त्याचा वापर अतिरेकी राष्ट्रवाद, उग्रवाद पसरवण्यासाठी केला जात असल्याचे म्हटले होते. मनमोहन सिंग यांच्या विधानाचा रोख भाजपसह राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे होता, कारण ‘भारतमाता की जय’ ही घोषणा भाजप व इतर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी संघटनांकडूनच दिली जाते, काँग्रेसला तर ‘सोनियामाता की जय’शिवाय दुसरे काही सुचतच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या वरील विधानांनाच प्रत्युत्तर दिले. मनमोहन सिंग यांचे नाव न घेता ‘भारतमाता की जय’ ही घोषणा देण्यात कोणाला अडचण कशी वाटू शकते?, असा सवाल मोदींनी केला. सोबतच काही पक्ष देशापेक्षास्वतःच्या पक्षाचा फायदा आधी पाहतात आणि म्हणूनच ते ‘भारतमाता की जय’ला विरोध करत असल्याचेही ते म्हणाले. असाच प्रकार फाळणीवेळी ‘वंदे मातरम’ गीताला राष्ट्रगीताचा दर्जा न देऊन काँग्रेसने केला होता, त्याचाही उल्लेख मोदींनी केला. काँग्रेसला ‘भारतमाता की जय’ किंवा ‘वंदे मातरम’ का नको? तर इस्लाम अल्लाहशिवाय दुसर्‍या कोणाहीपुढे झुकायची परवानगी देत नाही म्हणून! मनमोहन सिंग यांनी त्यामुळेच वरील घोषणेवर आक्षेप घेतला, पण त्यांनी कधीही मुस्लीम नेत्यांनी केलेल्या गरळओकीवर भाष्य केलेले नाही. त्यांना ओवेसी वा वारिस पठाणला सुनावण्याची हिंमत होत नाही. शरजिल इमाम, उमर खालिदच्या देशाचे तुकडे-तुकडे करण्याच्या भाषेवर मनमोहन सिंग कधी बोलत नाहीत. म्हणूनच भारत विखंडन शक्तींशी काँग्रेसनेही हातमिळवणी केली की काय, असे वाटते. तथापि, काँग्रेसने कोणासोबत जायचे हा त्या पक्षाचा मुद्दा आहे, पण त्या पक्षाच्या कठपुतळ्यांनी राष्ट्रवादी-हिंदुत्ववादी व्यक्ती, संघटना वा ‘भारतमाता की जय’ सारख्या घोषणांवर आक्षेप घेऊ नये आणि त्यांनी तसे काही केलेच तर काँग्रेसचे विसर्जन करायला देशातील जनता सज्ज आहेच, हे पुरते लक्षात ठेवावे.

@@AUTHORINFO_V1@@