प्रदूषणविरोधी लढ्यात ‘जिद्दी’ मुलांचा सहभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2020
Total Views |
dahanu_1  H x W



समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत २०० किलो कचरा जमा


डहाणू : प्लास्टिकची समस्या दिवसागणिक उग्र रूप धारण करत असून या विरोधात सर्वजण एकत्रपणे लढत आहेत. समुद्रात आणि किनाऱ्यावर जमा होणारा प्लास्टिकचा कचरा जमा करण्याऱ्या मोहिमा ठिकठिकाणी राबवण्यात येतात. अशा मोहिमांतसजग नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. अशीच एक मोहीम डहाणू येथील समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी (ता.२८ फेब्रुवारी) राबवण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेत ठाण्यातील ‘जिद्द विशेष’ शाळेतील मुले त्यांचे पालक आणि शिक्षकांसह सहभागी झाले होती. यावेळी या मुलांनी समुद्र किनाऱ्यावरून २०० किलो प्लास्टिकचा कचरा जमा केला.


‘ड्रॉप्लेज’ सामाजिक संस्थेने आयोजित मोहिमेला ‘ओशन हिरोज’ असे आगळेवेगळे नाव दिले होते. या मोहिमेला वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन अँड अनिमल वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूसीएडब्ल्यूए)यांचे सहकार्य होते. पशुतज्ज्ञ आणि कासवांच्या संवर्धनाचे काम करणारे डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी उपस्थितांना प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण, त्याचा समुद्रजीवांवर होणारा विपरीत परिणाम यांची माहिती दिली. या मोहिमेद्वारे समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाविरोधात सजगता निर्माण करणे हे होतेच शिवाय पुढच्या पिढीचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित रहावे आणि पृथ्वीच्या संरक्षणाबाबत त्यांच्यात संवेदनशीलता निर्माण करणे या हेतूने आयोजित केली होती.


डहाणूच्या समुद्रकिनारी शुक्रवारी सकाळी दहा वाजता स्वच्छता मोहीम डॉ.विन्हेरकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. स्वच्छता मोहिमेत या विशेष मुलांसोबत त्यांचे शिक्षक आणि पालकही सहभागी झाले होते. भरतीवेळी लाटांमधून समुद्र किनाऱ्यावर आलेला प्लास्टिकचा २०० किलो कचरामुलांनी जमा केला. यातून आम्ही ही प्रदूषणाच्या विरोधातील या युद्धात सहभागी झालो आहोत, असा संदेशच या मुलांनी दिला.


या मोहिमेबद्दल ड्रॉप्लेजच्या सोनिया डिसुझा-भावसार यांनी सांगितले की, पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी अनेकजण विविध पातळ्यांवर अविरतपणे काम करत आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या या खऱ्या हिरोंना आणि त्यांच्या अमूल्य कामाला जगासमोर आणण्याचे काम आम्ही करत आहोत. जेणे करून नवीन पिढी त्यांच्यापासून प्रेरणा घेईल. आजच्या या मोहिमेत जिद्द शाळेतील विशेष मुले सहभागी झाली असून त्यांच्यातही प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत जागृकता निर्माण झाली आहे, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.


समुद्र किनाऱ्याची स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या जिद्द शाळेतील मुलांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी भरभरून कौतुक केले. ते म्हणाले,अशा मोहिमांमधून प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्याबाबत लोकांमध्येविशेष करून लहान मुलांमध्ये ही जागरूकता नक्कीच येईल. समुद्र किनाऱ्याची स्वच्छता झाल्यानंतर कासव आणि इतर समुद्र जीवांबद्दल, त्यांच्यावर प्रदूषणामुळे होणारे विपरीत परिणाम, ते रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. तसेच या समुद्र जीवांचे त्यांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी डहाणूमध्ये सुरू असलेल्या कामाची ही माहिती डॉ. विन्हेरकर यांनी दिली.



dahanu _1  H x


धर्मवीर आनंद दिघे, जिद्द विशेष शाळेतील मुलांनी आपल्या कमतरतेवर मात करत या मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्ये यांनी सांगितले की, डॉ.विन्हेरकर यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत आमची विशेष मुले, त्यांचे पालक आणि शिक्षक उत्साहात सहभागी झाले होते. प्रदूषण रोखण्याच्या कामात आमच्या विशेष मुलांनी त्यांचा खारीचा वाटा उचलत प्रदूषण समस्येबद्दल ते ही किती संवेदनशील आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांना सहभागी करून घेतल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी मनापासून आभार मानले. आता आम्ही देखील कुठेही कचरा टाकणार नाही. आणि लोकांनाही कचरा टाकू नका असे आवाहन करू, असे मनोगत जिद्द शाळेतील यश भगत या विद्यार्थाने व्यक्त केले.


ड्रॉप्लेजबद्दल...
ड्रॉप्लेज ही सामाजिक विषयांवर काम करणारी संस्था आहे. सामाजिक कार्य करताना त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे कल्पकतेने वापरून त्यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी कसे करून घेता येईल, यावर संस्थेचा विशेष भर आहे. एखादे चांगले काम करताना माणसाने मनापासून प्रयत्न करणे गरजेचे असते. हे प्रयत्न होण्यासाठी त्याच्या मनात त्याबद्दल महत्त्व जागृत करून त्याच्या आचारणातून ते काम कसे करता येईल, यासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर कसा करता येईल, यावर ही संस्था काम करत आहे.समुद्रात प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता यावी याहेतूने 'ओशनहिरो'या माहितीपर गेमची निर्मिती केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@