महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सत्कर्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2020
Total Views |
health camp _1  

‘सत्कर्म बालक आश्रम, बदलापूर’ आणि ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट, घाटकोपर’ यांच्या संयुक्त सहभागाने पार पडले, महाआरोग्य शिबीर! ज्यात पाचशेहून जास्त गरजूंनी लाभ घेतला.


‘सत्कर्म आश्रम’ ही संस्था बदलापूर येथे २३ अनाथ मुलांचे संगोपन करण्याचे कार्य करते, या संस्थेचे सचिव मकरंद वढवेकर यांच्या डोक्यात कल्पना आली की, बदलापूर, अंबरनाथ परिसरात बर्‍याच वीटभट्ट्या, वनवासी पाडे आणि गरीब वस्त्या आहेत. त्यामुळे या भागात ‘आरोग्य’ या विषयावर करण्यासारखे खूप काही कार्य आहे. संस्थेच्या इतर सदस्यांच्या सामाईक विचाराने आश्रमात आरोग्य शिबीर पार पडण्याचा निर्धार पक्का झाला. म्हणतात ना, विचार चांगला असला आणि भावना नि:स्वार्थ असेल तर कार्यात कोणतेच अडथळे येत नाहीत. अगदी तसेच या कल्पनेला ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट’ संस्थेची साथ मिळाली आणि आरोग्य शिबीर या छोट्याशा कल्पनेचे रूपांतर महाआरोग्य शिबिरात झाले आणि त्याचा लाभ ५०८ गरजूंनी घेतला. या शिबिरात इतर दोन संस्था प्रत्यक्ष स्वयंसेवक म्हणून उपस्थित होत्या, ज्याची नावे ‘हॅप्पीवाली फीलिंग’ आणि ‘सारथी फाऊंडेशन’ अशी आहेत, तसंच ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट’ संस्थेच्या २५, तर स्थानिक तीन डॉक्टरांचा सहभाग होता.


शिबिरांतर्गत सामान्य आरोग्य तपासणी, कर्करोग तपासणी, एचआयव्ही तपासणी, डोळे, दात तसेच कर्णतपासणी, त्वचा रोगतज्ज्ञ यांच्याकडून तपासणी, जरूर तो सल्ला आणि नंतर औषधांचे मोफत वाटप या गोष्टीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वीटभट्ट्या तसेच वनवासी पाड्यावरून गरजूंना ने-आण करण्यासाठी खास बस आणि चारचाकीची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. आरोग्य शिबिरासोबतच एक नावीन्यपूर्ण उपक्रम संस्थेने हाताळला, ज्याला नाव दिलं गेलं ‘क्लॉथ बँक.’ आजवर ब्लड बँक, मनी बँक ऐकून होतो, पण मनात विचार आला असेल की नक्की कसली बँक आहे! तर या ‘प्रोजेक्ट’अंतर्गत ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट’ संस्थेकडून लग्नाच्या कपड्यांची भरलेली दोन कपाटे आश्रमाला दान करण्यात आली. हे कपडे लग्नात जोडप्यांनी एक-दोन वेळा वापरून चांगले धुऊन इस्त्री करून ठेवलेले होते. जवळ जवळ ते कपडे नवीनच वाटत होते. गोरगरिबांना महागडे कपडे घेणे परवडत नाहीत, खास अशा गरजूंना त्यांच्या शुभकार्यात विनामूल्य चांगले कपडे वापरता यावेत, या सद्भावनेने या ‘क्लॉथ बँक’चे नियोजन केले आहे. संस्थेच्या नावातच ‘सत्कर्म’ आहे म्हटल्यावर कार्यात गोडवा असणारच, तर याच गोडव्याने बदलापूर भागात गरजू रुग्णांना हे आरोग्य शिबीर आणि मोफत वाटलेली औषधे लाखमोलाची मदत ठरली.
या शिबिरात प्रत्यक्ष सहभागी काही निवडक सदस्यांच्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे नमूद केलेल्या आहेत :



“गरजू व अनाथ मुलांसाठी काम करता करता त्यांच्यासारख्याच इतर गरिबांनाही मदतीची व आरोग्य तपासणीची गरज आहे हे जाणवले. वीटभट्टी कामगार, झोपडीत राहणारे व रिक्षाचालक हे स्वत:च्या आरोग्यावर मात्र लक्ष देऊ शकत नसतात. आरोग्याकडे जरा हेळसांडच करतात. त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यासंबंधी डॉ. भावना कुचेरिया सहकुटुंब व इतर काही सहकारी डॉक्टरांना विचारले तर त्यांनी पण उत्साह दाखवला आणि मग शेवटी सुरुवात मुख्य! म्हणजे आमचे कार्यकारी मंडळसुद्धा पाठीशी उभे राहिले.

आजूबाजूस असलेल्या वनवासी पाड्यावर पदयात्रा केली. सगळ्या वस्त्यांवर फिरलो, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांमध्ये गेलो आणि मोफत तरी तपासणी करा, असे आवाहन केले. नागरिकांकडून जुने कपडे गोळा केले आणि ‘माणुसकीची भिंत’ उभी केली. जवळ जवळ ३०० पेक्षा जास्त कपडे गरिबांना वाटले. देशविदेशांतून काहींनी पाठवलेले महाग पोशाख वनवासी बांधव आणि वस्त्यांवर राहणार्‍या गरिबांसाठी लग्न व सण समारंभात घालता यावे, अशी लायब्ररीच सुरू केली आहे.”
- मकरंद वढवेकर
(सत्कर्म बालक आश्रम, सचिव)



“रश्मीज स्माईल ट्रस्ट’ यशस्वीरीत्या पाचशेहून जास्त गरजूंपर्यंत या शिबिराच्या माध्यमातून पोहोचू शकली, याचा खूप अभिमान वाटतो आहे. आरोग्य तपासणी सारांश खालीलप्रमाणे : मधुमेह - ७ रुग्ण, डोळे तपासणी - २३६ चष्मे वाटप, १२ अंध मुलांना ऊन आणि धुळीचा त्रास होऊ नये यासाठी खास चष्मे वाटप. मोतिबिंदूचे पाच रुग्ण सापडले, ज्यांचे मोफत ऑपरेशन पार पडावे यासाठी प्रयत्न चालू आहेत.थायरॉईड रक्त तपासणी - ११ रुग्णांना अतिथायरॉईड आढळला. अतिरक्तदाब आणि कमी रक्तदाबाचे बरेच रुग्ण सापडले आणि त्यांना योग्य ती औषधे देण्यात आली. सर्व रुग्णांना योग्य त्या पद्धतीने तपासून प्रत्येकाला औषध देण्यात आले.”
- डॉ. भावना कुचेरिया
(रश्मीज स्माईल ट्रस्ट, सचिव )


“हा ’संडे फंडे’ आमच्या ‘हॅप्पीवाली फीलिंग’साठी खूप मोठा दिवस ठरला. कारण, निमित्त होते ‘सत्कर्म बालकाश्रम’ येथे गरीब, गरजू, वनवासी पाडा व वीटभट्टीवरील कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबीर व औषधे वाटप यांचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा फायदा जवळ जवळ ५०० गरजू लोकांना झाला.”
- चित्रा व्यवहारे
(हॅप्पीवाली फीलिंग, प्रतिनिधी)


“मेडिकल कॅम्पमुळे ‘सत्कर्म बालक आश्रम’ आणि ‘रश्मीज ट्रस्ट’मधील डॉक्टर मंडळींसोबत कार्य करण्याची संधी मिळाली.आम्ही ‘सारथी फाऊंडेशन’मधून या मेडिकल कॅम्पला मदत केली. इथे आलेल्या सर्व सामान्य लोकांना या शिबिरातून मोफत चेकअप आणि औषध देण्यात आली. ”
- अमित पाटील
(सारथी ट्रस्ट, प्रतिनिधी)



“खूप छान नियोजन आणि तितकेच छान डॉक्टर आणि स्वयंसेवकांकडून हाताळणी. मनापासून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे दूर वनवासी पाड्यावर राहणार्‍या गरजूंसाठी संस्थेने विनामूल्य वाहतुकीची सेवासुद्धा उपलब्ध करून दिली होती. खूप सारे कौतुक प्रत्येक एका व्यक्तीचे आणि संस्थेचे ज्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवला.”
- कोमल सणस
(शिबिराचा लाभ घेतलेले लाभार्थी )





- विजय माने 
@@AUTHORINFO_V1@@