मुंबईतील इमारती व आगीचा धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2020   
Total Views |
mumbai fire _1  



अवाढव्य मुंबानगरीत अनेक इमारतींना अशा आगी लागतात. अशा कठीण प्रसंगात अग्निशमन दलाच्या अग्निवीरांना वा अलीकडे नेमलेल्या अग्निवीरबालांना धैर्य दाखवून संकटात सापडलेल्यांची सुटका करण्यासाठी मोठे काम करावे लागते. सरकारने व पालिकेने अशा वीरांना सहकार्य व मदत करून उत्तेजन द्यावे.


अग्निशमनचे नियम तोडून अनेक अनिवासी इमारती मुंबईत आगीचा धोका वाढवित आहेत. मुंबई अग्निशमन दलाला २०१८-१९ मध्ये फार कटू अनुभव आला. एकूण छोट्या-मोठ्या लागलेल्या ५ हजार ४२७ आगी विझविण्याच्या कामांपैकी ९५ मोठ्या आगी विझवाव्या लागल्या. २०१७-१८ मध्ये एकूण ४ हजार ८०५ पैकी ८० व २०१६-१७ मध्ये एकूण ४ हजार ९०७ पैकी फक्त ४६ मोठ्या आगी विझवाव्या लागल्या होत्या. मुंबई अग्निशमन दलाने २०१६मध्ये आगीच्या तीव्रतेच्या लहान-मोठ्या प्रमाणानुसार आगीची वर्गवारी ठरवून प्रणाली ठरविली.


अग्निशमन दलाची आगींची वर्गवारी व लागणारी अग्निइंजिन्स, पाण्याच्या टाक्या व इतर सामग्री आगींच्या तीव्रतेच्या दर्जाप्रमाणे फायर इंजिन्स अग्निस्थानावर नेली जातात.


(१) छोटी आग - एक फायर इंजिन स्थानावर जाणे पुरेसे
(२) मध्यम आग - पाच ते सहा इंजिन्स स्थानावर नेणे गरजेचे
(३) गंभीर आग - स्थानावर ८ ते १२ इंजिन्स गरजेची
(४) अतिगंभीर आग - १६ फायर इंजिन्स आवश्यक.
(५) फार अतिगंभीर आग - अग्निशमनला २२ इंजिन्स लागणार.


कमला मिल हद्दीतील आग

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील कमला मिल्स हद्दीमधील दोन विलासी सोयींनी युक्त अशा वन अबॉव्ह व मोजो बिस्ट्रो हॉटेलमध्ये २९ डिसेंबर, २०१७च्या रात्री १२.३० वाजता मोठ्या आगी लागल्या. १४ माणसे मृत्युमुखी पडली व ५५ जण जखमी झाले. या आगी बेकायदेशीर पद्धतीने इमारती बांधल्यामुळे, हुक्का वापरण्यामुळे व इमारतींमध्ये अनेक जळावू वस्तूंचा साठा केल्यामुळे लागल्या असाव्यात, असे अग्निशमन अधिकार्‍यांच्या लक्षात आले. आग लागल्यावर वन अबॉव्हचे निर्गमन द्वार बंदच असल्यामुळे तेथील १५० जण आगीत अडकून पडले होते. सुदैवाने जगलेल्या ४९ वर्षांच्या केदार गाठांचे शरीर आगीत २५ टक्के भाजून निघाले होते व १३ महिने ते अंथरुणाला खिळून होते. दुसर्‍या जखमींपैकी जगलेल्या व्यक्ती सरोजिनी शर्मांचे शरीर १८ टक्के भाजले होते व त्यांना रीतसर चालत्या-बोलत्या होण्यासाठी एक वर्षांहून जास्त काळ लागला. अशीच गंभीर स्थिती कित्येक जखमींच्या वाट्याला आली.


या आगीच्या घटनेनंतर त्याच इमारतीमध्ये ८३ टक्के कार्यलये आयटी कामाकरिता होती, पण ३० टक्के कार्यालये कुलुपबंद आढळल्यामुळे फक्त ५४ टक्के कामांची तपासणी करता आली. जी माणसे इमारतीत भेटली त्यांनी इमारतींची माहिती देण्यास सहकार्य दिले नाही. नंतर समजले की, इमारतीच्या मालकाने बांधीव क्षेत्रात (FSI) २.४ लाख चौ.फुटांचे बांधकाम नियमबाह्य केले होते.


कमला मिलच्या आगीच्या घटनेनंतर मुंबई पालिकेला बांधीव क्षेत्रात ९५८१.२७ चौ. मीटर क्षेत्राचे मंजूर आराखडे मिळाले व त्यापैकी २२६५८.६७ चौ.मीटरचे-२३.२४ टक्के काम अनधिकृत मिळाले व त्यापैकी ११३६२.६३ चौ.मीटरचे काम अग्निशमन दलाच्या नियमबाह्य कामाचे मिळाले. हे एवढे अनधिकृत काम नियमित करण्याकरिता मुंबई पालिकेने १०० कोटी रुपये वसूल केले. चौकशी अहवालात कमला मिलच्या इमारतीत १९ बदल बांधीव क्षेत्राचे गुन्हापात्र ठरून, १२ बदल हे जिन्यांची जागा बदलणे व १३ बदल हे शौचालयाच्या जागेत केले आहेत. इमारतीतल्या जाण्या-येण्याच्या रस्त्यांची रुंदी कमी करून ती विक्रीतील बांधीव क्षेत्राला जोडली. ‘रिफ्युज’ क्षेत्र विक्रीत गेले.


या खोलवर चौकशीत पालिकेचे १२ अधिकारी दोषी आढळले व त्यापैकी तिघांना कामावरून काढले व बाकीच्यांना कठोर शिक्षा झाली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार २०१८मधील जानेवारी ते २०१९ डिसेंबर यामध्ये अग्निदलाच्या अधिकार्‍यांनी मुंबईतील इतर १० हजार, ८०० रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, मॉल्स, दारुचे अड्डे इत्यादींची अग्निशमनांचे सुरक्षेचे नियम डोळ्यापुढे ठेवून अचानकपणे कसून तपासणी केली तेव्हा त्यांना ५८.१६ टक्के ठिकाणी अग्निसुरक्षेचे नियम तोडलेले आढळले. ८.३६ टक्के म्हणजे २ हजार ४८६ ठिकाणी अग्निसुरक्षेची साधने वापरली नव्हती. गेल्या दोन वर्षांमध्ये अग्निसुरक्षा दलांनी अनेक सुधारणा घडविल्या. अग्निशमनाकरिता उपयुक्त धोरण आखले व महत्त्वाची साधनेसुद्धा खरेदी केली.


अग्निशमनासाठी गट पद्धतीने सर्व मुंबईतील २४ प्रभागांकरिता ३४ समुदाय पथके स्थापली व त्यांच्याकडून विविध इमारतींची अग्निशमनाच्या मुद्द्यावरून यापुढे अचानक तपासणी करण्यात येते. ज्या इमारतीमध्ये अनधिकृत काम आढळते, त्यांना हे तपासणारे पथक नियमाप्रमाणे अग्निसुरक्षा साधने बसवायला सांगतात. परंतु, त्यांच्याकडून काहीच घडले नाही तर कायद्याद्वारे इमारती मालकाविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदविला जातो.


अग्निशमन दलाकडे आता १६ छोटी अग्निकेंद्रे बांधलेली आहेत. त्यांचा वापर अग्निदल प्रथम करते. कारण, ही वाहने छोटी असल्याने इच्छित स्थळाच्या ठिकाणी आग विझविण्यास छोट्या गल्ल्यांमधून झटकन पोहोचता येते व आग विझवणे एक ते दोन मिनिटे लवकर शक्य होते. छोट्या गल्लीचा सुधारित नकाशा पण पालिकेने बनविला आहे. भायखळ्याच्या मुख्य केंद्रावर अग्निशमनाला बोलावणे आल्यावर कुठल्या स्थानावर कोणती वाहने व अग्निशमनवीर कोठे पाठवायचे ते तत्काळपणे ठरविले जाते.


गेल्या वर्षीच्या १५१ कोटी बजेटमध्ये ६४ मीटर लांब टर्नटेबल, ५० मीटरचा हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, डिजिटल रेडिओ मोबाईल प्रणाली, ५५ मीटरचा वॉटर टॉवर (यांच्या साहाय्याने वाकड्या गल्ल्या असल्या तरी जलवहन करता येऊ शकते), फायर रोबो इत्यादी साहित्य घेतले. अग्निशमन दलाकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त नवीन वाहने खरेदी केल्यावर १५० मीटरपर्यंत (५० माळ्यांपर्यंत) आग विझविणे शक्य होईल.


सध्या मुंबईत ३४ मोठी अग्निकेंद्रे आहेत. १६ छोटी केंद्रे तयार झाली आहेत. विकास आराखड्यात दाखविल्याप्रमाणे आणखी २४ अग्निकेंद्रे बांधली जाणार आहेत. यापैकी दहिसरच्या कांदारपाड्यामध्ये एक बांधले आहे. कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये भूखंड मिळवायचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईच्या वाढत्या इमारतींकरिता पुढील सहा वर्षांमध्ये ही जास्तीची १६ केंद्रे तयार होतील. मुंबई अग्निशमन दलाने अलीकडे हायटेक १४ टनाचे ७.५ कोटींचे हझमत व्हॅन खरेदी केले. त्यावर कसे काम करावयाचे याकरिता ३० जणांच्या पथकाकरिता प्रशिक्षण दिले गेले. यातून नेहमीच्या आगीशिवाय नवीन विकासांमुळे रासायनिक, जैविक, किरणोत्सरी व आण्विक आगी (CBRN) लागल्या, तर या हझमत वाहनाचा व प्रशिक्षणाचा उपयोग खात्रीने होईल.


अग्निशमन दलाच्या कामाकरिता त्रुटी

मुंबईत अनेक ठिकाणी अजून जुनी वस्ती व बाजार आहे व त्याकरिता अग्निनळखांबांची गरज भासते. परंतु, पालिकेने जागोजागी जलवाहिन्यांवर उभ्या केलेल्या १० हजार ४७० अग्निखांबांपैकी ९ हजार ३३९ अग्निखांब नादुरुस्त आहेत. ते सर्व पालिकेने चालू स्थितीत आणायला हवेत.


मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांकडून कांदिवलीच्या हॉटेल्सना परवानगी मिळालेली नसतानाही अग्निशमन दलाकडून त्या हॉटेलला आरोग्य विभागाची मान्यता नसताना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र कसे दिले गेले. यावरून उच्च न्यायालयाने या विभागांचे अक्षरश: वाभाडे काढले.


माझगाव येथील जीएसटी भवनाला लागलेल्या आगीनंतर मुंबईतील शासकीय, निमशासकीय इमारतींच्या सुरक्षेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा इमारतींचे ‘फायर ऑडिट’ करण्याचे अधिकार पालिकेच्या अग्निशमन दलाला नाहीत, हे अग्निदलाचे मुख्य अधिकारी प्रभात रहांगदाळे यांनी स्पष्ट केले.



अलीकडच्या काही अनिवासीइमारतींच्या उल्लेखनीय आगी



१४.१०.२०१९

पाच माळ्यांच्या ग्रॅण्टरोडच्या व्यापारी इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात २२ वर्षांची व्यक्ती दगावली होती. सहापैकी तीन जण अग्निशमनचे अधिकारी जखमी झाले. १६ इंजिन्स लागली.


१५.१०.२०१९

२२ माळ्याच्या अंधेरी (प) येथील पेनिन्शुला पार्कमधील व्यापारविषयक इमारतीच्या मोठ्या आगीतून एक हजार माणसांची सुटका केली. सुदैवाने कोणी दगावले नाही.


२९.१२.२०१९

खैरानी रोड साकी नाका : आशापुरा इंडस्ट्रिअल कंपाऊंडमधील मोठ्या आगीत दोन मजुरांचा मृत्यू झाला व एक मजूर हरवला आहे. तीन माळ्यांच्या इमारतीतील ३० ते ३५ पैकी १५-२० रासायनिक व प्लास्टिकची गोदामे जळून खाक झाली.


१४.२.२०२०

अंधेरी पूर्वच्या मरोळ येथील ‘रोल्टा’ कंपनीच्या काचा बसविलेल्या व्यापारी इमारतीला मोठी आग लागली. काचा असल्यामुळे आग विझविण्यास वेळ लागला. धूर बाहेर जात नाही व संकटातील लोकांना गुदमरायला झाले. इमारतीतील सामानाचे नुकसान झाले, पण कोणी दगावले नाही. काचा बसवल्यामुळे धोका वाढतो म्हणून यापुढे त्यावर उपाय शोधायला हवेत.


१५.१.२०२०

चेंबूरच्या माहुल परिसरातील भारत पेट्रोलियम रिफायनरी येथील एका एअर कॉम्प्रेसरला दुपारी १२.३० वाजता आग लागली. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. संपूर्ण चेंबूर परिसरात धुराचे लोट पसरले होते.


१८.२.२०२०

माझगावमध्ये दहा मजली जीएसटी भवनला आग लागली. कागदपत्रे जळून खाक झाली व मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.



या अवाढव्य मुंबानगरीत अनेक इमारतींना अशा आगी लागतात. त्या इमारती जुन्या झाल्यावर कधी कोसळतात वा काही ठिकाणी रस्ते खचतात. अशा कठीण प्रसंगात अग्निशमन दलाच्या अग्निवीरांना वा अलीकडे नेमलेल्या अग्निवीरबालांना धैर्य दाखवून संकटात सापडलेल्यांची सुटका करण्यासाठी मोठे काम करावे लागते. सरकारने व पालिकेने अशा वीरांना सहकार्य व मदत करून उत्तेजन द्यावे.
@@AUTHORINFO_V1@@