अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2020
Total Views |

mumbai_1  H x W
मुंबई : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत असताना लॉकडाऊनच्या काळात गंमत म्हणून रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळतो आहेच, पण आता त्यांच्या गाड्यांच्या चाव्याच पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगण्यात येत आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी काही महाभाग दुकानासमोर गाड्यांची गर्दी करत असल्याने त्यांना गाड्या पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश देण्यात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार देण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी ओळखपत्रे देण्यासही पोलीस ठाण्यांना सांगण्यात आले आहे.
 
 
संचारबंदी लागू झाल्यानंतर लोकांनी चार किंवा अधिकच्या गटाने फिरू नये, वाहन रस्त्यावर दिसू नये, घरातील एकच व्यक्ती जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडावी, असे अपेक्षित असते. मात्र याचे गांभीर्य नसणारे अनेकजण गंमत म्हणून फेरफटका मारण्यासाठी बाहेर जात आहेत. त्यांना पोलीस लाठीचा प्रसाद देत आहेत. मात्र काही जण पोलिसांच्या संयमाची परीक्षा पाहत आहेत. अशा वाळखोरांच्या गाड्यांच्या चाव्या पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश देण्याचे फर्मावण्यात येत आहे. त्याच प्रमाणे काही जण खरेदीसाठी गाडी घेऊन येत असून संचारबंदीचा भंग करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या गाड्या जप्त करण्याचे आदेशही बिनतारी यंत्रणेवरून सुटले आहेत.
 
 
फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने २४ तास उघडी राहणार आहेत. नागरिकांनी आवश्यक तेवढय़ाच वस्तूंची खरेदी करावी, असे आदेश असतानाही नागरिकांकडून मोठा साठा खरेदी केला जात आहे. दुकानदारही त्यांना त्याबाबत समजावत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गाड्याच जप्त केल्या तर संबंधितांकडून खरेदीही माफक केली जाईल, यासाठी त्यांच्या गाड्या ताब्यात घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या किंवा त्यांच्या गाड्यांवर काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय किराणा माल, औषधाची दुकाने, दूध, अंडी, पशुखाद्य पुरविणारी दुकाने आदींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्रे देण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना पोलिसांचा त्रास सहन करावा लागणार नाही. संचारबंदीच्या काळात एकही वाहन दिसता कामा नये, असे आदेशही सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. अन्यथा अशा वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@