स्वकष्टाने कमावलेल्या पैशासारखं वापरा पाणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2020
Total Views |
save water _1  



मावशी धो-धो नळ सोडून भांडी घासत होत्या. काही कामानिमित्त मी तिथे येताच, त्यांनी पटकन नळ बंद केला. मला हसू आले. मी बोलेन म्हणून किंवा सांगितलेले आठवून त्यांनी नळ बंद केला होता. त्या स्वतः मराठवाड्यातून आलेल्या. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या गावातल्या. त्यामुळे माझे ’बादली भरली की नळ बंद करून काम करा, पाणी फेकू नका, फिल्टरचं बाहेर पडणारे पाणी झाडांना घालूया’ हे म्हणणे कटकट न वाटता त्यांनाही पटत होतं. ‘इथं एक दिवस नळाचं पाणी गेलं, तरी तोंडचं पाणी पळतं. आमच्या गावाला दुरून डोक्यावरून पाणी आणायला लागतं, कुठं कुठं आठवड्यातून एकदा पाणी येतं,’ असं त्या स्वतःच सांगायला लागतात. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असलं, तरी अजूनही ९० टक्के लोकांना पाण्याचे महत्त्व कळलेलं नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भरमसाठ वापरलं जातं. निदान वर्षातील आठ महिने पाण्याची काळजी कोणाला नसते. अनावश्यक वाहणारे पाणी, उघडे नळ, स्वच्छतेच्या नावाखाली पाईप लावून गाड्या, अंगण धुणे, रोजच्या रोज ’जुने’ पाणी फेकून ’नवे’ पाणी भरणे सुरू असतं. उन्हाळ्याच्या झळा लागायला लागल्या की, अचानक रंग खेळू नका, तरणतलाव बंद करा अशा मागण्या सुरू होतात.


शहरांमध्ये लोकसंख्या वाढतेय, मोठमोठ्या इमारती वाढत आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये आधुनिक शौचालयं असतात, त्यात दर माणशी दिवसातून अनेकदा एका वेळी निदान १०-१२ लिटर बहुदा पिण्याचं पाणी काही सेकंदात फ्लश केलं जातं. शिवाय प्रत्येक घराची स्वच्छता, कपडे धुण्याचे मशीन अशा सुविधा यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी खर्च केलं जातं. घरोघरी काम करणार्‍या ताई, मावशी यांना आणि घरातल्यांनाही बहुदा नळ वाहता ठेवूनच काम करायची सवय असते. ठिबकणार्‍या, वाहणार्‍या पाण्याच्या आवाजानं बेचैन होणारं कुणी नसतं. सकाळी रस्त्यानं फिरायला जाताना दिसतं की, बंगले-सोसायट्यांमध्ये झाडू न वापरता पाण्याचा पाईप लावून अंगण, गाड्या, गेट, समोरचा रस्ता यांची स्वच्छता होत असते. अशांना हटकले तर ‘तुम्हाला काय करायचंय, बोअरिंगचं पाणी आहे’ किंवा ‘साबने बोला है’ अशी उत्तरं दिली जातात. घरोघरी एक जरी माणूस याबाबत जागरूक झालं तर पाण्याची खूपच बचत होईल.


कुठल्याही शुभकार्यात पाण्याच्या कलशाची पूजा, नदीची पूजा करणारी आपली संस्कृती, पण निसर्गात मुक्त हस्ताने मिळणार्‍या पाण्याचा आपण गैरवापर सुरू केला ते दूषित करायला सुरुवात केली. जगभरातच पाण्याविषयीचा निष्काळजीपणा वाढीस लागला. वाढती लोकसंख्या, पाण्याची भूगर्भातील घटणारी पातळी यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे आणि त्यासाठी जलसाक्षरतेची गरज आहे, हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९९३ पासून ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली. स्वच्छ पेयजलाची उपलब्धता, पाण्याचे संरक्षण असे हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्देश आहेत. दरवर्षी यादृष्टीने विविध कार्यक्रम, उपक्रमाद्वारे जलसाक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्न होतो. दरवर्षी एक घोष वाक्यही ठरवलं जातं. या वर्षीचा उद्देश अथवा घोषवाक्य आहे ’पाणी आणि हवामानातील बदल.’


वाढत्या प्रदूषणाचा पाण्याच्या साठ्यावरही परिणाम होतो. पाण्याचे संकट कमतरता आणि अशुद्धता अशा दोन्ही प्रकारचे आहे. पुरेसा पाऊस पडला तरी नियोजनाअभावी आणि काटकसरीने न वापरल्यामुळे कमतरता नेहमीच जाणवते. गाळांनी भरलेली धरणे, पावसाच्या पाण्याची साठवणूक, पुनर्भरण न करणे, जमिनीतील पाण्याचा उपसा जास्त होतो, पण जंगलतोडीमुळे पाणी जमिनीत जिरण्याचं प्रमाण कमी होत आहे. विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडत आहेत. पाणीप्रश्न हा फक्त शासनानं सोडवायचा असं अनेकांना वाटतं, पण आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपण जलसंकट दूर करून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि मुबलक जल उपलब्ध करून देऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवं. पाणी बचतीच्या योजना व प्रकल्पांमध्ये सहभागी व्हायला हवं. जलसाक्षरता वाढवायला हवी. पाणी जपून वापरायला किंवा ते स्वतः कमावलेल्या पैशासारखे वापरायला शिकलं पाहिजे. पावसाच्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर, पाण्याचं प्रदूषण टाळणं, पुनर्वापर हे स्वत:पुरतं प्रत्येकानं ठरवलं आणि केलं तरी ‘अबके बरस भी रह गये प्यासे’ म्हणण्याची वेळ येणार नाही.

- राधिका गोडबोले
@@AUTHORINFO_V1@@