कोरोना : दहशत नको, जनजागृती आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2020   
Total Views |
corona_1  H x W


समाजातील ही जागृती फार चांगली गोष्ट आहे. कारण, या जागृतीमुळेच लोक प्रतिबंधक उपाय अनुसरू लागतात आणि उपचारांपेक्षा प्रतिबंधन केव्हाही हिताचे असते. परंतु, ही जनजागृती किंवा सावधगिरी हळूहळू दहशतीत परिवर्तित होत आहे.


दि. २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसर्‍यांदा देशाला संबोधित करताना म्हणाले की, ’‘जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येतं, तेव्हा संपूर्ण देश एकजूट होतो. कोरोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधनं नाहीत असं नाही. पण, हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश ‘लॉकडाऊन’मध्ये जात आहे.”


या वैश्विक महामारीत एकच पर्याय आहे तो म्हणजे ‘सोशल डिस्टन्सिंग.’ ‘सोशल डिस्टन्सिंग’ हे छोट्याशा गावापासून सर्वांनीच अंगीकारायचं आहे. काही लोकांना वाटतंय की हे केवळ आजारी लोकांसाठीच गरजेचं आहे. मात्र, हे सर्व नागरिकांना, प्रत्येक कुटुंबाला त्यातील प्रत्येक सदस्यासाठी आवश्यक आहे. काही लोकांच्या चुकीच्या विचारामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी याचा मोठा धोका आहे. जर असाच बेजबाबदारपणा सुरू राहिला, तर भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. भारतात कोरोना व्हायरसची लागण ४०० हून अधिक जणांना झाली आहे, तर पाकिस्तानकरिता ही संख्या एक हजारच्या आसपास, म्हणजेच फार जास्त आहे.


पाकिस्तानमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून पाकिस्तानने इतर देशांसमोर हात पसरण्यास सुरुवात केली. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याची मागणी पंतप्रधान इमरान खान यांनी श्रीमंत देशांना केली आहे. इमरान खान यांनी म्हटले की, “कोरोनाचा संसर्ग वाढल्यास गरीब देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा ताण पडणार आहे. वैद्यकीय व्यवस्थाही कोलमडून पडणार आहे.” श्रीमंत देशांनी लहान, गरीब राष्ट्रांना मदत करणे आवश्यक असल्याचे खान यांनी सांगितले. इराणवर कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.


युरोप खंड कोरोनाचे नवे केंद्र

चीननंतर आता युरोप खंड कोरोनाचे नवे केंद्र झाले आहे. इटली, स्पेनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. युरोपमधील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी युरोपियन देशांनी महिनाभरासाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. युरोपमधील महत्त्वांच्या देशातील जनजीवन ठप्प असून आता जगाचीही वाटचाल ‘लॉकडाऊन’कडे सुरू झाली आहे. जगभरात दीड लाखांहून अधिकजणांना कोरोनाची लागण झालेली आहे. सात हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. चीनपासून सुरू झालेला कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत सुमारे १४० हून अधिक देशांना ग्रासले आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आखण्यात येत आहेत.


भारतात कोरोनाची दहशत

सध्या सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरती कोरोनाची दहशत पसरली आहे. कुठल्यातरी देशांमध्ये कुठल्यातरी भारतीयाने तिथली परिस्थिती किती गंभीर आहे, यावरती तयार केलेले व्हिडिओज हे आपल्या टीव्ही चॅनल्सवर आणि सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. प्रत्येक टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावरती असलेले तथाकथित तज्ज्ञ अजून परिस्थिती अतिशय गंभीर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ही दहशत इतकी जास्त पसरली आहे की सरकारने ‘१४४ कलम’ लावल्यानंतरसुद्धा भाज्या, किराणा, औषधे खरेदीकरिता नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यमागचे मुख्य कारण सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने तयार केलेले भीतीचे वातावरण.


समाजातील ही जागृती फार चांगली गोष्ट आहे. कारण, या जागृतीमुळेच लोक प्रतिबंधक उपाय अनुसरू लागतात आणि उपचारांपेक्षा प्रतिबंधन केव्हाही हिताचे असते. परंतु, ही जनजागृती किंवा सावधगिरी हळूहळू दहशतीत परिवर्तित होत आहे. यात मीडियाचा फार मोठा हात आहे. आज ज्याप्रकारे आणि ज्या प्रमाणात कोरोना विषाणूबाबत मीडियामध्ये बातम्या आणि संबंधित मजकूर प्रसिद्ध होत आहे ते पाहता, याची खरेच आवश्यकता आहे का? असा प्रश्न मनात येतो. जनजागरण करणे आणि दहशत पसरविणे यातील फरक मीडिया विसरला आहे.


अफवा विरुद्ध वास्तव

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोशल मीडियावर याविषयीच्या विविध अफवाही पसरू लागल्या आहेत. पण, यातील चुकीच्या माहितीमुळे लोकांची चिंताही वाढत आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या प्रत्येकच मेसेजवर विश्वास ठेवायला पाहिजे असं नाही. सरकारने दिलेली माहिती हिच आधारभूत आहे आणि तिच्यावरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे.


चीननंतर सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत आहे. चीनला लागून आहे आणि व्यापारी संबंधांमुळे भारत-चीन प्रवासी वाहतूकही चांगलीच आहे. असे असतानाही भारतात कोरोनाग्रस्तांची इतकी कमी संख्या आहे. सावधगिरीचे उपाय काटेकोरपणे अंमलात आणणे आणि भीतीने पळत सुटणे यात फरक आहे. आतापर्यंत, १३० कोटींच्या भारतात कोरोनाग्रस्तांची इतकी कमी संख्या दिसणे, याचे श्रेय केंद्र सरकारला दिले पाहिजे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या सर्वच विभागांनी समन्वयाने सावधगिरीच्या उपाययोजना तत्काळ प्रभावीपणे अंमलात आणल्या. त्यामुळेच ही संख्या इतकी कमी राहू शकली. परंतु, मीडिया आपले दररोज पानेच्या पाने कोरोनावर मजकूर प्रकाशित करीत बसले आहेत. याचा परिणाम म्हणून आज बाजारातून हॅण्डवॉश, सॅनिटायझर इत्यादी वस्तू दिसेनाशा झाल्या आहेत. मिळाल्याच तर प्रचंड महाग मिळत आहेत.


प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक

कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी जे प्रतिबंधक उपाय आहेत, त्यात स्वच्छता हा फार मोठा घटक आहे. एकूणच आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छता पाळली तर या विषाणूचा प्रसार प्रभावीपणे रोखता येतो. तसेही भारतीयांच्या जीवनात स्वच्छतेला फार महत्त्व होते. होते, यासाठी की आता तसे राहिले नाही.


आपणच ठरविले पाहिजे की, मी प्रतिबंधात्मक उपाययोजना अवश्य करीन. परंतु, कोरोनामुळे घाबरून पिसाळल्यासारखे करणार नाही. तसेही आपल्या भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. असे अनेक विषाणू आपण पचविले आहेत. आपल्याकडील वातावरणही इतर देशांप्रमाणे विषाणूंना पोषक नाही. उन्हाळ्यातील तापमानाचा कडाका बघून डासदेखील दिसेनासे होतात.


आता चीनने दिलेल्या या भेटीमुळे जगभराला तीव्र मंदी आणि प्रचंड महागाईला सामोरे जावे लागणार यात शंका नाही. अर्थातच यातून भारताची आणि महाराष्ट्राचीही सुटका नाही. कोरोनामुळे फक्त शारीरिक हानीच झाली असे नाही, तर महासत्ता असणार्‍या चीनला अक्षरश: नामोहरम करण्याचे काम या व्हायरसने केले आहे.


मानसिक आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता

कोरोनाच्या ‘सोशल’ भीतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगण्याची आणि कोणत्याही कारणाने आपल्यालाही कोरोना होऊ शकेल अशी प्रचंड भीती निर्माण झाली आहे. समाजमाध्यमांमधून अजूनही कोरोनाच्या प्रसाराला आळा बसत नाही, आपल्याकडे असलेली माहिती अधिकाधिक जणांकडे पोहोचवण्याची जणू चढाओढ सुरू झाली आहे.


यातूनच गैरसमजच अधिक पसरत चालले आहेत. समाजमाध्यमांमधील स्वयंभू तज्ज्ञांमुळे नागरिकांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गृहिणी, शाळकरी मुले वा नोकरदारांना छोट्याशा कारणाने जरी शारीरिक अस्वस्थता जाणवू लागली तरी आपल्याला आजाराची लागण झाली की काय, अशी भीती वाटू लागली आहे. अनेक डॉक्टरांनी मोफत मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. शासन पातळीवर सार्वजनिक बंदची घोषणा दिली असली तरी अजूनही जनजागृतीसाठी पुरेशी काळजी घेतलेली दिसत नाही. सामान्यांमधील कोरोनाची भीती, तो पसरण्याची नेमकी कारणे आणि नेमक्या उपाययोजना याबाबत एक-दोन जाहिरात आणि फलक लावून जनजागृती होणार नाही.


आवश्यक औषधे, सर्दी खोकल्याचे सिरप आणि सॅनिटायझरचा तुटवडा जाणवण्याची शक्यता उद्भवते आहे. या परिस्थितीत सरकारकडून काय प्रयत्न केले जाणार आहेत, याबाबत अनिश्चितताच आहे.


सरकारकडून कोरोनाच्या मानसिक दहशतीखाली असणार्‍या मानसिक रुग्णांना समुपदेशनाची व्यवस्था ठिकठिकाणी करण्याची गरज निर्माण होते आहे.


अशा विषाणूंवर मात करण्यासाठी सकस आहार, आरोग्यविषयक काळजी, योग्य झोप, रोजचा व्यायाम, शुद्ध हवेत चालणे, चांगले तेच खाणे, निसर्ग आणि पशुपक्ष्यांना बाधा येणार नाही, असे वर्तन ठेवणे आदी नियम पाळले, तर कोणत्याच प्रकारचे विषाणू मानवाचे आयुष्य पोखरू शकत नाहीत. आपण थोडेसे शहाणे बनूयात. कोरोनाची प्रत्येकाच्या मनात असणारी भीती बाजूला करण्यासाठी प्रयत्न करूयात.


@@AUTHORINFO_V1@@