‘कोरोना’ निवारण लढा - काही निरीक्षणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020
Total Views |
modi_1  H x W:


मोदींच्या नेतृत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वतः आघाडीवर राहून या लढ्याचे नेतृत्व करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते या विषाणूच्या वाटचालीचे निरीक्षण करीत होते. तो भारतात पोचू शकतो, याची जाणीव असल्यानेच ते संभाव्य परिणाम आणि उपाययोजना यांचा विचार करीत होते. त्यामुळेच या विषाणूचे भारतात आगमन होताच ते त्याचा तडकाफडकी बंदोबस्तही करू शकत आहेत.


‘कोरोना’ या विश्वव्यापी विषाणूशी भारतात सुरू असलेल्या लढ्याला आता उणेपुरे पंधरा दिवस झाले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक लढ्यांबरोबरच या लढ्यालाही बसवावे लागेल व त्याचे यथार्थ मूल्यमापनही करावे लागेल. त्याचे मोदींचे नेतृत्व व भारतीय जनतेचा निर्धार या दोन अंगांनी मी मूल्यमापन करू इच्छितो. अर्थात, हा विषयच इतका व्यापक आहे की, हे मूल्यमापन अपुरे असेल, पण सुरुवात इथूनच करावी लागेल. हे मूल्यमापन या दोन मुद्द्यांपुरतेच आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


नरेंद्र मोदी गेल्या सहा वर्षांपासून भारताच्या पंतप्रधानपदी आहेत. या काळात त्यांना अनेकदा एकापेक्षा एक कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले, पण कोरोना निवारण लढा हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण व कठोर परीक्षा घेणारा लढा म्हणावा लागेल. अद्याप तो संपलेला नाही, पण आतापर्यंत त्यांनी या लढ्याचे केलेले नेतृत्व पाहता अंततोगत्वा ते विजयी ठरतील, असे वाटते. त्याची खूण राजकीय स्वरूपाची आहे, पण विषय समजण्यासाठी मला तिचाच वापर करावा लागत आहे.


मोदींनी पंतप्रधानपद स्वीकारल्याच्या गेल्या सहा वर्षांच्या काळात यावेळी पहिलाच प्रसंग असेल, जेव्हा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यानी प्रथमच मोदींच्या धोरणाला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी नोटाबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईक हे असे प्रसंग निर्माण झाले होते की, त्यांनी त्या-त्यावेळी मोदींच्या धोरणांना पाठिंबा दिला असता, तर त्यांचे वा पक्षाचे कोणतेही नुकसान झाले नसते. पण, शेवटी पक्ष त्यांचा आहे व त्याचे बरेवाईट त्यांना अधिक कळते, हे मान्य करावे लागेल. त्यांनी उशिरा का होईना, या लढ्याला पाठिंबा दिला, ही स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल. त्याबद्दल लगेच शंका व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. कोरोनाविरोधी हा लढा जेव्हा संपेल, तेव्हा संपेल, पण त्यातील मोदींच्या नेतृत्वाचे हे मोठे यश समजावे लागेल. त्याबरोबरच भाजपेतर पक्षांच्या राज्य सरकारांनीही या लढ्याला सक्रिय सहकार्य दिले, हेही उल्लेखनीयच आहे. विशेषतः प. बंगालमधील ममता सरकार, केरळमधील माकप सरकार, दिल्लीतील आप सरकार, पंजाब, छत्तीसगढ, राजस्थानमधील काँग्रेस सरकारे, महाराष्ट्रातील मविआ सरकार कोणताही विवाद निर्माण न करता केंद्राला सहकार्य देत आहेत. ही बाब ‘वयं पंचाधिकं शतम’ या उक्तीचा प्रत्यय आणून देत आहे. भारताची लोकशाही, संघराज्य प्रणाली मजबूत असल्याचीच ही ग्वाही आहे, असे मी मानतो.


मोदींच्या नेतृत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वतः आघाडीवर राहून या लढ्याचे नेतृत्व करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते या विषाणूच्या वाटचालीचे निरीक्षण करीत होते. तो भारतात पोचू शकतो, याची जाणीव असल्यानेच ते संभाव्य परिणाम आणि उपाययोजना यांचा विचार करीत होते. त्यामुळेच या विषाणूचे भारतात आगमन होताच ते त्याचा तडकाफडकी बंदोबस्तही करू शकत आहेत. त्यामुळेच इतर देशांतील मृतांची संख्या हजारोंमध्ये मोजली जात असताना भारतातील त्या संख्येला अद्याप शतकही ओलांडता आले नाही. अर्थात एक मृत्यूही तेवढाच गंभीर आहे, याबद्दल वाद होऊ शकत नाही. शिवाय अद्याप बराच लांबचा पल्लाही गाठायचा आहेच.


त्यांनी ज्या प्रकारे एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ आयोजित केला व जनतेने ज्या उत्स्फूर्तपणे त्यांना प्रतिसाद दिला, त्यामुळेच ते २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ जाहीर करू शकले. त्यातून त्यांचा जनतेवरील विश्वास अधोरेखित झाला ते वेगळेच. रविवारच्या सायंकाळी ५ वाजता सामूहिक टाळ्या व घंटानाद करून कोरोनाविरोधी लढ्यातील सैनिकांचे आभारप्रदर्शन करण्याचा प्रकार तर अफलातूनच.


हा लढा लढताना जनतेचे सहकार्य घेणे, या प्रकाराबरोबरच लोकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजीही ते घेतच आहेत. पण त्यांचे प्राण वाचणे, हा आपला अग्रक्रम त्यांनी ढिला होऊ दिला नाही, हे उल्लेखनीय आहे. म्हणूनच त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडणार नाही, याची काळजी घेतानाच लोकांनी घरातच राहायला हवे, या आग्रहात कुठेही शिथिलता येऊ दिलेली नाही. तळहातावरचे जिणे जगणार्याचीही त्यांनी आवर्जून आठवण ठेवून त्यांच्यासाठी काही सवलती जाहीर केल्या आहेत. पण, तात्पुरत्या योजना करूनच ते थांबलेही नाहीत. या निमित्ताने आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. आपली आरोग्यव्यवस्था अधिक मजबूत कशी होईल, याच्या हालचालीही ते सोबतच करीत आहेत. अन्य देशांतील नेते कोरोनापुढे हतबल होत असताना भारताचा हा नेता त्या विषाणूसमोर दंड थोपटून उभा आहे, हा आपणा भारतीयांसाठी अभिमानाचाच विषय होऊ शकतो.


कोणताही लढा एखाद्या व्यक्तीच्या बळावर यशस्वी होऊ शकत नाही, हे खरेच. आतापर्यंतच्या या लढ्यातील यशाचे श्रेय जेवढे मोदींच्या नेतृत्वाकडे जाते तेवढेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक भारतीय जनतेकडे आणि या देशाच्या अंगभूत सक्षमतेकडे जाते, हेही नाकारता येणार नाही. त्याचा परामर्षही पाठोपाठ वाचायला मिळेलच.



- ल. त्र्यं. जोशी
@@AUTHORINFO_V1@@