जरा दमाने घ्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020   
Total Views |
police_1  H x W

पोलिसांनी दंडुका उगारण्याआधी किमान संबंधितांना विचारपूस करण्याचे सौजन्य दाखवले, तर जनमानसाला वर्दीची सकारात्मक प्रतिमा या कठीण समयी निश्चितच स्मरणात राहील.


‘लॉकडाऊन’च्या काळात रस्त्यावर विनाकारण लोक भटकणार नाहीत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही नागरिकांबरोबर पोलिसांचीही. मात्र, आपल्याला दिलेले कार्य हे जबाबदारीचे असल्याचा विसरच काही पोलीसदादांना पडला आहे की काय, असा प्रश्न पडावा, असे चित्र राज्याच्या कानाकोपर्‍यात दिसून आले. काही ठिकाणी जणू पोलीस आपल्या हाती निरंकुश सत्ताच आली आहे, अशा आविर्भावात वावरताना दिसून आले आणि खासकरुन नाशिक नगरीत प्रत्यक्ष त्याचा अनुभवही आला.


घराबाहेर पडलेली व्यक्ती कोणत्या कारणासाठी बाहेर आली आहे, याची साधी विचारपूस करण्याची तसदीदेखील काही पोलीस घेताना दिसत नाहीत. समोरील व्यक्तीचे वय, शिक्षण, काहीही लक्षात न घेता अत्यंत अपमानास्पद शब्दांत, आरेकारेच्या भाषेत काही पोलीस नागरिकांना विचारणा करताना दिसून आले. तसेच, कर्तव्यार्थ बाहेर पडणारे पत्रकार यांनी गळ्यात ओळखपत्र घातले असतानादेखील त्यांना हटकण्याचे प्रकार घडले. त्यामुळे पोलिसांप्रती असणार्‍या आत्मीयतेच्या भावनेला काही पोलिसांच्या अशा वागण्याने कुठेतरी तडा जाण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.


रस्त्यावर गर्दी होऊ नये, संचारबंदीचे पालन व्हावे हे अत्यावश्यक आहेच. त्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणेदेखील आवश्यक आहे. मात्र, एकच भाषा सर्वांना कशी लागू होऊ शकेल? व्यक्ती बाहेर का आली आहे, याची सौम्य आणि आदराच्या भाषेत आधी विचारणा करून ते कारण अयोग्य असेल तर त्यास घरी पाठवणे आणि या उपरांत व्यक्तीने ऐकले नाही तर मग आपला खाक्या दाखविणे, हे पोलीस दलाकडून अशा काळात आवश्यक आहे आणि याच कार्याची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. मात्र, चौकशी न करता दंडुक्याचा प्रसाद देणे, उठाबशा काढायला लावणे, गुन्हेगार असल्याची प्रतिमा मनी बाळगून कठोर शब्दांचा वापर करणे, असे कार्य काही पोलीस करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंबंधी पोलिसांना सहानुभूतीपूर्वक वर्तणुकीच्या सूचना केल्याही आहेत. तेव्हा, पोलिसांनी दंडुका उगारण्याआधी किमान संबंधितांना विचारपूस करण्याचे सौजन्य दाखवले, तर जनमानसाला वर्दीची सकारात्मक प्रतिमा या कठीण समयी निश्चितच स्मरणात राहील.

महावितरणचा सुखद धक्का


कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध संस्था विविध निर्णय घेत आहेत. अशातच वीज वितरण कंपनीनेही काही निर्णय घेतले असून, मार्च महिन्याच्या वीजबिलाची आकारणी ही सरासरी करण्यात येणार आहे. यावेळी वीज वितरण कंपनीच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ३१ मार्चपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे मीटर वाचन करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीज बिल आकरण्यात येणार आहे. तसेच, वीजदेयक ऑनलाईन स्वरूपात पाहण्याचे आवाहनदेखील ग्राहकांना करण्यात आले आहे. देयक भरण्यासाठी व इतर सेवांसाठी महावितरणच्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.


दरम्यान, असा जरी निर्णय घेण्यात आला असला तरी, सरासरी काढताना काही ग्राहकांना हकनाक जास्तीचे वीजबिल येणार काय? असाही प्रश्न समोर येत आहे. मात्र, असे असले तरी, महावितरणच्या वतीने पूर्वसूचना देण्यात आल्याने सरासरी वीजबिलामुळे अनेक ग्राहकांना वीजबिलाचे योग्य नियोजन करणे सोयीचे होणार आहे, हेही महत्त्वाचे आहे; अन्यथा मागील महिन्याचे व चालू महिन्याचे वीज बिल एकत्रित भरण्याचा प्रस्ताव जर समोर आला असता तर, नक्कीच मोठा असंतोष पाहावयास मिळाला असता. हेही येथे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असताना रस्त्यावर महावितरणचे कर्मचारी दाखल तक्रारींचे निराकरण करताना दिसत आहेत. अशा स्थितीतदेखील आपले कर्तव्य बजाविणारी महावितरणची खाकी वर्दी निश्चितच कौतुकास पात्र ठरत आहे.


मात्र, घरोघरी जाऊन मीटर वाचन करणे शक्य नसल्याने महावितरणच्या वतीने सरासरी वीजबिलाचा प्रस्ताव अमलात आणण्यात आला आहे. यासाठी मागील काही महिन्यांच्या वीजबिलाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनादेखील अंदाज बांधणे आता सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे महावितरणचा हा निर्णय एकार्थाने ग्राहकांसाठी सुखद धक्काच म्हटला तर वावगे ठरणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@