...आणि ‘ती’ अभिनयातच रमली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020   
Total Views |
sonal_1  H x W:


कधी जिवाभावाची मैत्रीण ‘रुपाली’ म्हणून, तर कधी दुष्ट ‘चित्रा’ बनून घाडग्यांच्या या सूनेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘फार्मासिस्ट ते अभिनेत्री’ असा प्रवास करत, या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सोनल पवारबद्दल...


मुंबईतल्या एका सरळ साध्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात सोनलचा जन्म झाला. औषधनिर्मितीशास्त्राबद्दल म्हणजेच फार्मसीबद्दल दादाकडून खूप ऐकल्यामुळे आपण याच क्षेत्रात काम करायचं असं लहानग्या सोनलने ठरवून ठेवलेलं. भविष्यात फार्मासिस्ट बनून, छान मोठ्या पगाराची नोकरी मिळवून आई-बाबांना आनंदी ठेवायचं, इतकच उद्दिष्ट समोर ठेवून त्याचप्रमाणे पुढे तयारीही सुरू ठेवली. शाळेत असल्यापासून ती फक्त आणि फक्त अभ्यासच करायची, इतर कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणं म्हणजे तिला अक्षरशः ‘टाईमपास’ वाटायचा. त्यामुळे शाळेत असताना तिने कटाक्षाने या सगळ्या गोष्टी टाळल्या.


शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली. बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिकल्यानंतर आता तिच्या पुढच्या शिक्षणासाठीच्या म्हणजेच बी.फार्मसीसाठीच्या प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या होत्या. ती वाट बघत होती. परंतु, शेवटी कंटाळून तिने मुंबईतच एका महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तीन महिन्यांनी तिला साताऱ्याच्या फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याच कळलं. पण, तोपर्यंत ती इथे रमली होती. तीन महिन्यांमध्ये इथल्या मित्रमैत्रिणींशी चांगलीच गट्टी जमलेली. त्यांना सोडून जाणंही नकोसं वाटत असलं तरी करिअरचा विचार करून तिने साताऱ्याला जाण्याचा निर्णय घेतला.


‘सातारा कॉलेज ऑफ फार्मसी’मध्ये प्रवेश घेतला तेव्हा घरापासून लांब जाताना सगळ्यांप्रमाणेच तिलाही भीती वाटत होती. आई-बाबांशिवाय आपण राहू शकू का, असे अनेक प्रश्न तिला सतावत होते. साताऱ्यात एका मैत्रिणीकडे राहण्याची तिने व्यवस्था केली. मात्र, ती राहत असलेल्या ठिकाणापासून कॉलेजला जाण्यासाठी बसच्या फक्त दोनच फेऱ्या असायच्या. एक सकाळी जाण्यासाठी तर दुसरी संध्याकाळी येण्यासाठी. एके दिवशी तिला कॉलेजला जायला उशीर झाला आणि तो संपूर्ण दिवस, दुसरी बस येईपर्यंत ती वाट पाहात बसस्टॉपवर बसून राहिली. यावेळेस तिला घरापासून लांब असल्याची जाणीव झाली आणि रडूच आलं. पण त्यानंतर मात्र असं कधी घडलं नाही.


साताऱ्याला महाविद्यालयामध्ये असताना ‘युथ फेस्टिव्हल’मध्ये तिने उत्साहाने भाग घेतला. त्या स्पर्धेसाठी झालेल्या ऑडिशनमध्ये तिची निवड झाली. त्यावेळी त्या स्पर्धेत भाग घेणारी पहिल्या वर्षातली ती एकमेव! बाकीचे सगळेच तिचे सिनिअर. याच ग्रुपने कर्जबाजारी शेतकऱ्याच्या बायकोच्या आयुष्यावर आधारित एक एकांकिकाही बसवलेली होती. एकांकिका म्हणजे नक्की काय, ते शिकता यावं म्हणून तिने त्यांना मदत करायला सुरुवात केली. त्यांच्या संवादांची उजळणी घ्यायची, त्यांना लागणाऱ्या गोष्टी आणून द्यायची. एकांकिकेचा दिवस उजाडला आणि नेमकी त्यात काम करणारी मुख्य नायिका काही घरगुती अडचणीमुळे स्पर्धेला येऊ शकली नाही. अशावेळी नायिकेची शोधाशोध सुरू झाली. आयत्यावेळी नायिका शोधणं, तिच्याकडून पाठांतर करून घेणं कठीणच वाटत होतं. तेव्हा नाइलाजाने त्या चमूने तिला त्या भूमिकेसाठी निवडलं. तिचे संवाद तर पाठ होते. परंतु, तिच्याकडे अनुभव नसल्याने त्यांच्या मनातही धाकधूक होतीच. मात्र, या एकांकिकेतल्या तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. यातूनच तिला आत्मविश्वास मिळाला आणि इथूनच तिच्या अभिनयाची सुरुवात झाली. पुढे हळूहळू तिने इतर कॉलेजसाठी कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली. तोवर अभ्यासक्रमही पूर्ण झाला, ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.


शिक्षण पूर्ण झाल्यांनतर मुंबईला येऊन ‘लोटस हॉस्पिटल’मध्ये नोकरीला सुरुवात केली. नोकरी करत असताना या सगळ्या गोष्टी मात्र मागे पडत गेल्या. साधारण सहा एक महिन्यांनी तिला तिचा एक जुना मित्र भेटला. त्यावेळी त्यांच्या नाटकाच्या गप्पा रंगल्या. तो एक नवी एकांकिका करतोय हे कळल्यावर सोनलने त्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. वेश्येच्या आयुष्यावर भाष्य करणारी कथा, ‘एका रात्रीतली गोष्ट’ असं तिचं नाव होतं. त्या एकांकिकेतून अभिनयाचे बारकावे शिकायला मिळाल्याचं ती नेहमी सांगते. हे सगळं सुरू असतानाच तिला एका मालिकेसाठी बोलावणं आलं. मालिकेत अभिनय करायला मिळणार हा एक वेगळाच आनंद होता. त्यामुळे ती लगेच ‘हो’ म्हणाली. फोटो पाठवले, तिथून ‘ओके’ही आले. मात्र, ऑफिसमध्ये काय सांगावं हा प्रश्नही होता. ऑफिसमध्ये सबबी देऊन केलेलं हे चित्रीकरण खूप छान पार पडलं. त्यानंतर तिने अशाच अनेक लहान-लहान भूमिका केल्या. अभिनय आणि नोकरी सांभाळताना मात्र तारेवरची कसरत व्हायची. नेहमी खोटं बोलून, कारणं देऊन ती चित्रीकरणासाठी वेळ काढायची. मालिकांमधून दिसल्यावर मात्र तिचं पितळ उघडं पडायचं. त्यावेळी तिने फक्त एकच गोष्ट करायची असं ठरवलं आणि अभिनयाकडे वळली.


अभिनयाची कुठलीच पार्श्वभूमी नाही. वडील ‘बेस्ट’मध्ये नोकरीला, आई घरीच सगळं सांभाळत होती. त्यामुळे पूर्णपणे अभिनयाकडे वळल्यानंतर तिला खूप संघर्ष करावा लागला. बऱ्याच ठिकाणी निवड व्हायची, एखादा एपिसोड चित्रित व्हायचा आणि नंतर तिथले सगळे फोन बंद व्हायचे. त्यावेळी नोकरीही सोडली होती. “मला एक वर्ष द्या. जर मी या क्षेत्रात काहीच करू शकले नाही, तर मी पुन्हा नोकरी करेन,” असं वचनही तिने आई-बाबांना दिलं होतं. मात्र, त्यांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळेच माझ्या संघर्षाला बळ मिळाल्याचं सोनल सांगते.


लहानसहान भूमिका करताना तिने ठरवलं की, आता आपल्याला लक्षवेधी भूमिका करायची आहे. त्यावेळी एका मालिकेत तिला मुख्य नायिकेच्या बहिणीची भूमिका मिळाली. ती भूमिका साकारणारी सोनल ही तिसरी अभिनेत्री होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढलेल्या होत्या. मात्र, या भूमिकेमुळे सोनल लोकांना रोज दिसू लागली. आईबाबाही खूश झाले. त्याच वेळी एका एकांकिकेसाठी तिला प्रथम पारितोषिकही मिळालं. त्याच काळात तिने काही ऑडिशन दिल्या होत्या, ज्यांचा तिला विसरच पडला होता. असंच एके दिवशी तिला एक फोन आला आणि या फोनमुळेच तिला खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. हा फोन होता ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘तुला पाहते रे’ मालिकेमधल्या ‘रुपाली’ या व्यक्तिरेखेसाठी निवड झाल्याचा. ‘रुपाली’ने सोनलला अभिनेत्री म्हणून नाव मिळवून दिलं. यानंतर तिचा अभिनय क्षेत्रातला प्रवास अगदी जोरदार सुरु झाला. ‘रुपाली’नंतर सोनल ‘कलर्स मराठी’च्या ‘घाडगे आणि सून’ या मालिकेतील ‘चित्रा’ या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली. सध्या सोनल तिच्या नवनवीन फोटोंमुळेही चर्चेत असते. आपल्यामुळे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हसू येणं हीच सगळ्यात मोठी कमाई असल्याचं ती नेहमी म्हणते.


‘पासिंग करणार साईड करेक्टर ते एका मालिकेची नायिका’ असा प्रवास करणारी अभिनेत्री सोनल पवार हिला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!


@@AUTHORINFO_V1@@