नाते वेदविद्यारूपी मित्राशी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |
ved_1  H x W: 0
 
 
 
 
 
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
‘वेदमित्र’ हा सर्वज्ञानाचे अधिष्ठाता आहे. त्याच्या सान्निध्यात राहिल्याने माणसाची वाणी शद्ध, पवित्र व धाराप्रवाही बनते. पण, या अनंत मित्राचा त्याग केला की, आपली वाणी अपवित्र बनते. माणूस नको ते भलते-सलते बोलू लागतो. व्यर्थ बोलण्यामुळे आपणांवर लोकांचा विश्वास राहत नाही. त्याचे शब्द वाया जातात. मुखदोषवृद्धी बरोबरच मनाचेही दोष वाढीला लागतात. वेदज्ञानाव्यतिरिक्त नको ते अन्य ऐकल्यास जीवनात काहीच अर्थ उरत नाही.
 
यस्तित्याज सचिविदं सखायं,
न तस्य वाच्यपि भागो अस्ति।
यदीं मं श्रृणोत्यलकं श्रृणोति
नहि प्रवेद सुकृतस्य पन्थाम्॥ 
(ऋग्वेद-10.71.6)
 
 
अन्वयार्थ
(य:) जो मानव (सचिविदं) सर्व प्रकारचे ज्ञान प्रदान करणार्‍या (सखायम्) वेदरूपी मित्राला (तित्याज) त्यागतो, सोडून देतो. (तस्य) त्याच्या (वाचि अपि) वाणीमध्येदेखील (भाग:) कोणतेच सारतत्त्व, मूलभूत सत्त्व, (न, अस्ति) राहत नाही. (ईम्) अशी ही व्यक्ती (यद्) वेदज्ञानाव्यतिरिक्त जे काही (श्रुणोति) ऐकते, (अलकम्) ते सर्व व्यर्थच (श्रुणोति)ऐकते. अशा प्रकारचा माणूस (सुकृतस्य) पवित्र पुण्यकार्याच्या(पन्थाम्) मार्गाला (न प्रवेद) कदापी प्राप्त करू शकत नाही.
 
 
 
विवेचन
या जगात अनेक मित्र भेटतात! पण सुख-दु:खाच्या प्रसंगी जो धावून येतो, तोच खरा मित्र असतो. आई-वडिलांनंतर सर्वस्वी हित साधणारा मित्र हाच तर आपला आधार असतो. संकटकाळी जीवाचे रान करणारा व प्रसंगी प्राणदेखील देणारा मित्र हा आपणाकरिता सर्व काही असतो. पण, असे मित्र फारच दुर्लभ दिसतात. स्वार्थाच्या बाजारात काम संपले की मैत्रीचे पवित्र नाते तोडणारे महाभाग या जगात काय कमी नाहीत? जीवनात ज्याला जीवश्च कंठश्च मित्र लाभला, तो मात्र धन्य होय. मित्रासाठी संस्कृत शब्दकोषात ‘सखा’, ‘सुहृद्’, ‘वयस्य’ वगैरे अनेक नावे आली आहेत. या मंत्रात ‘सखा’ शब्द प्रयुक्त झाला आहे. ‘विद्’ या ज्ञानार्थक धातूपासून बनलेला ‘वेद’ हा शब्द ज्ञानाचा आधारभूत घटक असल्याने तोच खरा जगाचा मित्र होय. सर्व शरीरधारी मित्रांपलीकडे ज्ञानरूपी आदर्श एक मित्र म्हणजे ‘वेद’ होय.
 
 
 
वेदरूप ज्ञानसखा हा अनादी काळापासून या सृष्टीमध्ये सर्वांसाठी तत्पर आहे. हा एक असा जीवलग मित्र आहे की जो आम्हा सर्वांना जगण्याची कला शिकवितो. संसाररूपी प्रवाहात मानवाला पैलतीरावर घेऊन जाणारा हा मित्र सतत सत्प्रेरणा देतो. वेदांनाच अनेक विद्यांचे माहेरघर असे म्हटले आहे. म्हणून वेदरूपी विद्यामित्र आमच्या प्रत्येक जन्मामध्ये
नेहमीच काळजी वाहतो. जवळ कोणीही नसेल किंवा भौतिक धनवैभवाचा वा पैशांचाही अभाव असेल, तर हा वेदविद्यारूपी मित्र मदतीला धावून येतो. म्हणूनच तर एका सुभाषितकाराने म्हटले आहे- ‘विद्या मित्रं प्रवासेषु।’ आचार्य भर्तृहरी म्हणतात - ‘विद्या बन्धुजनो विदेशगमने।’ परदेशी गेल्यानंतर विद्या ही बांधव ठरते. हा वेदरूपी मित्र सर्व प्रकारच्या ज्ञानाने ओथंबलेला आहे. कल्पवृक्षाप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक अंगावर ज्ञान वितरण करणार्‍या वेदमित्राला मनू महाराजांनी ‘वेदऽखिलो धर्ममूलम्।’ असे सांगून त्याला समग्र धर्मकर्तव्यांचे मूळ असल्याचे प्रमाणित केले आहे.
 
 
आज आपण पाहतो, माणसाची वाईट वृत्ती हीच त्याच्या दु:खाचे कारण आहे. चांगले मित्र आपल्या सान्निध्यात आले, तर आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. याच दुर्वृत्तीमुळे जवळ आलेले मित्रसुद्धा दूर-दूर जातात. त्यामुळे नुकसान मात्र आपलेच होते. प्रस्तुत मंत्रात खूपच सोपा आशय व्यक्त केला आहे. सत्य ज्ञानरुपी वेदमित्रापासून जे दूर जातात, त्यांची काय दुर्दशा होते? त्याला चांगल्या प्रकारे बोलता येत नाही. त्याच्या वाणीमध्ये शुद्धता नसते. तो जे काही बोलतो, त्याच्या शब्दात सत्याचा अंश नसतो. त्याचे व्यर्थची बडबडणे हे त्याच्या नाशासाठी कारणीभूत ठरते. आज सार्‍या जगाची अवस्था फारच दयनीय झाली आहे ती वाणीच्या दोषांमुळे! जगातील जेवढे अनर्थ घडले ते वाणीच्या दुरुपयोगानेच! कारण, त्यांनी आपल्या वाणीला सुसंस्कारित कधी केलेच नाही. त्याचे कारण म्हणजे सर्वांनी वेदरूप मित्राचा केलेला त्याग. वेदांचे वाचन थांबले म्हणूनच आमची शारीरिक, मानसिक, आत्मिक प्रगती थांबली! परिणामी, व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरचा विकास खुंटला.
 
 
सर्वांना सर्व प्रकारचे ज्ञानधन वितरण करणार्‍या वेदमित्राचे किंवा वेद-आधारित सत्य ग्रंथांचे अध्ययन खंडित झाले आणि भौतिक जडविद्यांचे व केवळ अर्थार्जन मिळवून देणारे अर्धवट (अपूर्ण) बाह्यज्ञानाचे साहित्य भरमसाठ वाढले! असे साहित्यग्रंथ काय खरे मित्र बनू शकतील काय? कदापि नव्हेत! हे साहित्यमित्र पूर्णांशाने दिशा देऊच शकत नाही. आजचे शिक्षणक्षेत्र घ्या! काय शिकविले जाते? साहित्य व वाङ्मय क्षेत्र घ्या. प्रचंड प्रमाणात पुस्तकांची छपाई होतेय. पण, अशा ग्रंथांच्या प्रकाशनामुळे समाज व राष्ट्राचे नवनिर्माण किती प्रमाणात झाले? हा संशोधनाचा विषय होय. म्हणूनच वेदमंत्र म्हणतो, ज्याने वेदविद्यारूपी मित्राला दूर ठेवले, तो वाचकदृष्ट्या दरिद्रच! एवढेच नव्हे तर तो जे काही ऐकतो, तेदेखील व्यर्थच! अशा प्रकारचे श्रुती ज्ञानापासून दुरावलेले लोक कधीच पुण्याईला प्राप्त करू शकत नाहीत. आजकाल वाचनसंस्कृती मोठ्या प्रमाणात रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. ‘वाचाल तर वाचाल!’ असे घोषवाक्यदेखील प्रसिद्ध होते. पण काय वाचल्यावर माणूस वाचेल? यावर कोणाचेही चिंतन नाही. अनार्ष व वाईट ग्रंथांच्या वाचनामुळे माणसाची सर्वांगिण प्रगती कधीच होत नाही. तो जीवंत असूनही मेल्यासारखाच! आज वाचणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण ते अज्ञानात व अविद्येत लीन आहेत. शरीराने व मनाने ते मृत्युमुखीच होत. म्हणून ‘वाचाल तर वाचाल!’ ही म्हण केवळ वेद-स्वाध्यायालाच लागू पडे. कारण, वेदांच्या विविध मंत्रांचे वाचन, मनन व आचरण केल्यास माणसांची सर्वार्थाने प्रगती साधते.
 
 
 
‘वेदमित्र’ हा सर्वज्ञानाचे अधिष्ठाता आहे. त्याच्या सान्निध्यात राहिल्याने माणसाची वाणी शद्ध, पवित्र व धाराप्रवाही बनते. पण, या अनंत मित्राचा त्याग केला की, आपली वाणी अपवित्र बनते. माणूस नको ते भलते-सलते बोलू लागतो. व्यर्थ बोलण्यामुळे आपणांवर लोकांचा विश्वास राहत नाही. त्याचे शब्द वाया जातात. मुखदोषवृद्धी बरोबरच मनाचेही दोष वाढीला लागतात. वेदज्ञानाव्यतिरिक्त नको ते अन्य ऐकल्यास जीवनात काहीच अर्थ उरत नाही. म्हणूनच तर महर्षी दयानंदांनी समस्त मानवांकरिता एक मोलाचा संदेश दिला की, “वेद हे सर्व विद्यांचे मूळ ग्रंथ आहेत. वेदांचे शिकणे-शिकविणे आणि ऐकणे-ऐकविणे हा मानवांचा महान धर्म आहे.”
 
 
केवळ बोलणे किंवा ऐकणेच नव्हे, तर वेदांसारख्या अमर मित्राचा त्याग केल्यास मानव सत्कर्मे करण्यास प्रवृत्त होत नाही. त्यामुळेच तो पुण्य पंथांपासून वंचित राहतो. एवढे अनर्थ ओढवतात ते अशा सन्मित्रांपासून दुरावल्याने! म्हणून वेदमित्राशी सदैव घनिष्ठ नाते जोडू या आणि जीवन सफल बनवू या!
 
 
@@AUTHORINFO_V1@@