दासबोध अभ्यास फलश्रुती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |


dasbodh_1  H x


दासबोध अभ्यासाची फलश्रुती कितीही चांगली असली तरी हा ग्रंथ ऐकणार्‍यांची, वाचणार्‍यांची जशी मनोवृत्ती असेल, तसेच फळ त्याला प्राप्त होईल. स्वतःला विद्वान समजणारे काही टीकाकार हा ग्रंथ मुळातून न वाचताच त्यावर टीका करतात. त्यांना समर्थांचे सांगणे आहे की, जे मूळ ग्रंथ न वाचता केवळ मत्सर मनात ठेवून टीका करीत असतात, त्यांना मत्सराशिवाय दुसरे काय प्राप्त होणार? गुणांची पारख न करता ज्यांना फक्त दोषच पाहण्याची सवय असते, त्यांना तेच प्राप्त होणार यात संदेह नाही. जशी ज्याची वृत्ती तसे फळ त्याला मिळणार. अर्थात, हीसुद्धा फलश्रुतीच समजावी.


सध्याच्या काळात अमुक पुस्तकाचे, ग्रंथांचे वैशिष्ट्य काय किंवा ते पुस्तक ग्रंथ का वाचावा, यासाठी पुस्तकाच्या मलपृष्ठावर त्यातील आशयासंबंधी थोडक्यात शब्दात माहिती दिलेली असते. पूर्वीच्या काळी ग्रंथ लिहून झाल्यावर शेवटी त्याची फलश्रुती देण्याची पद्धत होती. त्यामुळे त्या ग्रंथाच्या वाचनाने, पठणाने कोणते फळ मिळणार आहे, हे समजत असे. समर्थांनीही ग्रंथाच्या सुरुवातीस दासबोध अभ्यासाचे फळ काय ते सांगून टाकले. परंतु, ते जुनी प्रथा पाळावी यासाठी नसून, या ग्रंथात काय सांगायचे त्याची रोखठोक कल्पना श्रोत्यांना देण्यासाठी. दासबोधाच्या सुरुवातीसच स्वामींनी स्पष्ट केले की, हा गुरुशिष्यांचा संवाद आहे आणि या ग्रंथात भक्तिमार्ग विशद केला आहे. समर्थांचा भक्तिमार्ग हा कसा व्यापक आहे, हे दासबोध अभ्यासाशिवाय कळत नाही. दासबोधातील भक्तिमार्ग भाबडा किंवा भोळसर भक्तिभाव नाही. तो कर्माधिष्ठित ज्ञानाधिष्ठित तर आहेच. पण, प्रयत्नाला महत्त्व देणारा व आळसाचा तिटकारा करणारा आहे. दासबोध ग्रंथ श्रवणाने व अभ्यासाने काय फळ मिळणार ते ठोस शब्दांत समर्थांनी पुढीलप्रमाणे सांगितले आहे.
 


आता श्रवण केलियाचे फळ ।
क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचे मूळ । एकसरा ॥
 

समर्थ सांगतात, ‘दासबोध ग्रंथाच्या अभ्यासाने माणसाचे वागणे एकदम बदलते. त्याच्या मनातील सारे संशय समूळ नाहीसे होतात.’ हे वाचल्यावर या ग्रंथात असे आहे तरी काय, याची उत्सुकता वाचकांच्या मनात उत्पन्न होते. समर्थांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर त्यांना गोड, मधुर आणि चतुर अशी संभाषणकला अवगत होती. आपल्या निराभिमान निःस्वार्थ व गोड वाणीने समर्थांनी लाखो स्त्री-पुरुषांना आपल्यावर निर्व्याज प्रेम करायला भाग पाडले. समर्थांवर आणि समर्थविचारांवर प्रेम करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, समाजात सर्व माणसे समान नसतात. समर्थांच्या संबंधी अत्यंत क्षुल्लक गौण कारणे पुढे करून सामान्यांच्या बुद्धिभेद करणारे महाभागही समाजात आहेत. तथापि समर्थवाङ्मयाचा अभ्यास करणार्‍यांच्या मनावर या महाभागांच्या टीकेचा परिणाम होत नाही. कारण, समर्थांचे अलौकिक चारित्र्य व दासबोधातील कसदार विचार यांच्यापुढे या महाभागांचे हिणकस अभिप्राय प्रभावी ठरत नाहीत. समर्थ अत्यंत बुद्धिमान संत असल्याने सर्व गोष्टीस साधक-बाधक विवेक करण्याची क्षमता त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे दासबोध ग्रंथाची फलश्रुती सांगून झाल्यावर या व्यर्थ टीका करणार्‍यांसाठी एक मार्मिक ओवी त्या समासाच्या शेवटी समर्थांनी लिहिली आणि या टीकाकारांना जाता जाता सौम्य भाषेत फटकारले आहे.

 


जयाचा भावार्थ जैसा।
तयास लाभ तैसा।
मत्सर धरीं जो पुंसा।
तयास तेचि प्राप्त॥
 

दासबोध अभ्यासाची फलश्रुती कितीही चांगली असली तरी हा ग्रंथ ऐकणार्‍यांची, वाचणार्‍यांची जशी मनोवृत्ती असेल, तसेच फळ त्याला प्राप्त होईल. स्वतःला विद्वान समजणारे काही टीकाकार हा ग्रंथ मुळातून न वाचताच त्यावर टीका करतात. त्यांना समर्थांचे सांगणे आहे की, जे मूळ ग्रंथ न वाचता केवळ मत्सर मनात ठेवून टीका करीत असतात, त्यांना मत्सराशिवाय दुसरे काय प्राप्त होणार? गुणांची पारख न करता ज्यांना फक्त दोषच पाहण्याची सवय असते, त्यांना तेच प्राप्त होणार यात संदेह नाही. जशी ज्याची वृत्ती तसे फळ त्याला मिळणार. अर्थात, हीसुद्धा फलश्रुतीच समजावी. आता पुढे फलश्रुती सांगताना आणखी काही विचार समर्थ थोडक्यात स्पष्ट करतात. या ग्रंथाच्या वाचनाने -


मार्ग सापडे सुगम।
न लगे साधन दुर्गम।
सायोज्यमुक्तीचे वर्म। ठाइं पडे॥
 

ईश्वरप्राप्तीचा जो सोपा व सुखाचा मार्ग आहे, तो या ग्रंथातील विचारात सापडतो. ईश्वरप्राप्तीसाठी अनेक कठीण कष्टदायक मार्ग व साधने लोकांमध्ये प्रचलित आहेत, पण या ग्रंथाच्या वाचनाने तसल्या कठीण साधनांनी आवश्यकता राहत नाही आणि सायुज्यमुक्तीचे रहस्य सहज दृष्टिपथात येते. आता, मुक्ती म्हणजे काय? प्रा. के. वि. बेलसरे यांनी मुक्तीची सुरेख व्याख्या केली आहे. त्यांच्या मते, “सर्व प्रकारच्या दुःखापासून बंधनापासून आणि अज्ञानापासून सुटण्याची, मोकळे होण्याची जी अवस्था तिला ‘मुक्ती’ म्हणतात.” मुक्तीचे चार प्रकार शास्त्रात सांगितले आहेत. ते असे- सलोकता, समीपता, सरुपता आणि सायुज्यता. यांपैकी ‘सायुज्यतामुक्ती’ ही श्रेष्ठ मानली जाते. या मुक्ती प्रकारात माणसाच्या ठिकाणचा अहंकार ‘मीपणा’ची भावना पूर्णपणे नाश पावून भगवंताशी तदाकार होण्याची स्थिती अनुभवता येते. म्हणून या मुक्ती प्रकाराला ‘सायुज्यमुक्ती’ असे म्हटले आहे. दासबोध ग्रंथात ‘नवविधाभक्ती’ नावाचा जो चौथा दशक आहे, त्याच्या दहाव्या समासाला ‘मुक्तिचतुष्ट्ये नाम’ असे नाव दिलेले आहे. या समासात समर्थकालीन समाजातील रुढ असे भूलोक व स्वर्गलोक यांची माहिती दिली असून पहिल्या तीन मुक्तींचे वर्णन केले आहे. समीपता, सलोकता व सरुपता या मिळणार्‍या तीन मुक्ती पुण्यसंचय असेपर्यंत उपभोगता येतात, पुण्यसंचय संपला की या मुक्तीतील जीव वेगळा होऊन त्याची स्वर्गातून हकालपट्टी होते. त्यामुळे या तिन्ही मुक्तींचे फायदे नष्ट होतात. याचा अर्थ या तीनही मुक्ती नाशवान आहेत. परंतु, सायुज्यमुक्ती ही मात्र शाश्वत आहे. एकदा ती मिळाली की, तेथून पतन नाही. या दशकाचे वैशिष्ट्य असे की, या ‘मुक्तिचतुष्टय’ समासाच्या पूर्वीच्या नऊ समासांतून समर्थांनी भक्तीचे नऊ प्रकार विस्ताराने सांगितले आहेत. या दशकात समर्थांना हे सांगायचे आहे की, मुक्ती ही भगवंताकडून मिळणारी देणगी आहे. ती तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही नवविधा भक्तिप्रकारात पारंगतता मिळवाल. नवविधा भक्तिप्रकारात आपण जीव ओतून जे प्रयत्न करतात, त्यांना मुक्तीची देणगी भगवंताकडून मिळते. आता ‘श्रवण केलियाचे फळ’ पुढे चालू ठेवताना समर्थ सांगतात -
 

नासे अज्ञान दु:ख भ्रांती।
शीघ्रचि येथे ज्ञानाप्राप्ती ॥
ऐसी आहे फलश्रुती । इथे ग्रंथी॥
 

अशा रीतीने अत्यंत मोजक्या शब्दामध्ये दासबोध अभ्यासाने काय साधते, ते स्वामींनी सांगितले आहे. मानवी जीवन अज्ञान, दु:ख, भ्रम यांनी भ्रष्ट झालेले आहे. अज्ञान, दु:ख हे सर्वांना माहीत आहे. भ्रम म्हणजे वस्तू आहे तशी न दिसता वेगळी भासणे. जीवाला त्या भ्रष्ट अवस्थेतून सोडवले की जीवाची मूळ आनंदी समाधानी अवस्था त्याला प्राप्त होते. माणसाच्या ठिकाणी अज्ञान ओतप्रोत भरलेले आहे. ते घालवण्यासाठी समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य माणसाच्या पातळीला उतरुन अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. समर्थ आत्मसाक्षात्कारी, क्रांतदर्शी व स्वानुभवसंपन्न ब्रह्मज्ञानी पुरुष असल्याने कोणताही विषय प्रतिपादन करताना स्वामी आत्मप्रचितीला महत्त्वाचे स्थान देतात. दासबोध अभ्यासताना हे लक्षात येते की, समर्थ तपशीलवार विवरण करतात. एखाद्या विषयावर भाष्य करताना श्रोत्यांच्या मनात ज्या शंका-कुशंका उपस्थित होण्याची आहे असे वाटते, त्या स्वत:च उपस्थित करून मग समर्थ त्यांचे निराकरण करतात. काही वेळा माणसे सिद्धांताला भलताच. तर्क लावून तो भलतीकडेच नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे श्रोते मूळ सिद्धांतापासून भरकटले जातात.
 
अशावेळी समर्थ स्वत:च असे तर्क-वितर्क निवेदनात सांगून त्यांचे खंडन करतात व त्या सिद्धांताचा खरा अर्थ स्पष्ट करतात. समर्थ हे खरे लोकशिक्षक! ते लोकातील अज्ञान, दु:ख व भ्रांती दूर करतात. दासबोध अभ्यासकाला ‘नासे दु:ख अज्ञान भ्रांती’ हा लाभ होतो. अज्ञान दु:ख भ्रम नाहीसे झाल्यावर ज्ञानप्राप्तीसाठी आणखी थांबावे लागत नाही. माणसाची देहबुद्धी तीव्र असते. देह म्हणजेच मीअसा त्याचा पक्का समज असतो. त्यातून दु:ख निर्माण होते. त्यातून वाचवण्यासाठी समर्थ सांगतात, ‘देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी.आत्मबुद्धी बाणली की मग आणखी ज्ञान ते काय असणार! ते मिळणारच. दासबोध अभ्यासाने संशयातून निर्माण झालेले भ्रम नाहीसे होतात. प्रपंचातील दु:खाचे निराशेचे निवारण होऊन मनाला विश्रांती व समाधान मिळते,
 


नाना धोकें देहबुद्धीचे ।
नाना किंत संदेहाचे॥
नाना उद्वेग संसाराचे। नासती श्रवणे।
ऐसी याची फलश्रुती।
श्रवणे चुके अधोगती॥
मनास होय विश्रांती । समाधान॥
 

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@