कमलनाथ यांचे दिवास्वप्न!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020   
Total Views |
kamalnath_1  H



मध्य प्रदेशमध्ये जे राजकीय संकट निर्माण झाले त्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी वेळीच लक्ष न दिल्याने सरकार गमवावे लागले, असा आरोप मध्य प्रदेशातील काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे. या नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींनी ज्या प्रकारे भूमिका घेतली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.



मध्य प्रदेशामध्ये झालेल्या पक्षांतर्गत बंडाळीमुळे तेथील काँग्रेसचे सरकार कोसळले. कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे नेते असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने आणि त्यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामे दिल्याने सत्तात्याग करण्याशिवाय कमलनाथ यांच्यापुढे अन्य काही पर्यायच राहिला नाही. आता त्या राज्यात आगामी काही दिवसांत पुढील राजकीय प्रक्रिया गतिमान होऊन तेथे पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येईल.


काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी असलेले आणि प्रदीर्घ काळ त्या पक्षात काम केलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना, आपणास डावलले जात असल्याचे लक्षात आल्यानेच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला हे उघड आहे. त्यानंतर लगेचच ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा विश्वासघात केला, अशी कोल्हेकुई काँग्रेसच्या नेत्यांनी सुरु केली. त्यामध्ये राहुल गांधी, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह आदी नेत्यांपासून कोणाचाही अपवाद नव्हता. आज ना उद्या ज्योतिरादित्य शिंदे यांना आपल्या कृतीचा पश्चाताप होईल, अशी भाबडी आशा राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.


मध्य प्रदेशमध्ये जे राजकीय संकट निर्माण झाले त्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी वेळीच लक्ष न दिल्याने सरकार गमवावे लागले, असा आरोप मध्य प्रदेशातील काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे. या नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींनी ज्या प्रकारे भूमिका घेतली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस श्रेष्ठी राज्यातील दोन नेत्यांवर विसंबून राहिले. या संकटावर ‘मात’ करण्यासाठी त्यांनी गुलाम नबी आझाद, ए. के . अॅन्थनी आणि अहमद पटेल यांच्यासारख्या नेत्यांना पाठविले असते तर अशी परिस्थिती ओढविली नसती, असे राज्यातील या नेत्यांचे म्हणणे होते. पण आता या सर्व जर तरच्या गोष्टी झाल्या आहेत.


नेहमीप्रमाणे, पक्ष सोडून जाणाऱ्यांवर काँग्रेसकडून टीका केली जात आहे. ज्योतिरादित्य जो पर्यंत पक्षात होते तो पर्यंत ते ‘महाराजा’ होते पण त्यांनी पक्षत्याग केला की लगेच त्यांना ‘गद्दार’ अशी विशेषणे लावली गेली. मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या नेत्यांनी तर, शिंदे घराण्याने ब्रिटिशांना कशी साथ दिली हे दाखवून त्या घराण्याची निंदानालस्ती करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचा तो स्वभाव असल्याने बिचारे मणिशंकर अय्यर तरी त्यास कसे अपवाद असतील! मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर ‘सत्तालोलुप महाराज’ अशी टीका केली. तसेच आपल्या पक्षातील अंतर्गत संघर्ष मिटवता न आल्याने, या राजकीय संकटास भाजप जबाबदार असल्याचे आरोपही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आले. कमलनाथ यांनी, या घडामोडींमागील सत्य लवकरच बाहेर येईल, असे म्हटले आहे. पण त्यामागील सत्य एकच आहे आणि ते म्हणजे काँग्रेसला आपल्या पक्षातील अंतर्गत बंडाळी रोखता आली नाही हेच! आपल्या पक्षाच्या आमदारांची ‘समजूत’ काढण्यासाठी काँग्रेसचे नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह जातीने बंगळूरूला धावले होते पण त्यांना तेथे काय अनुभवायला मिळाले हे सर्व जाणून आहेतच!


या घडामोडी घडत असतानाच मध्य प्रदेश काँग्रेसने गेल्या शुक्रवारी समाज माध्यमावर एक संदेश प्रसृत केला आहे. त्यामध्ये, “हे ट्वीट सांभाळून ठेवा. १५ ऑगस्ट २०२० या दिवशी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री या नात्याने कमलनाथ हे ध्वजारोहण करतील आणि सलामी स्वीकारतील”, असे म्हटले आहे. काँग्रेस कशाच्या जोरावर हे म्हणत आहे? ज्यांनी आपला पक्ष सोडला आहे ते पुन्हा पक्षात परततील, असे काँग्रेसला वाटत आहे का? की ‘विविध मार्ग’ हाताळून सत्ता मिळविण्याचे वा टिकविण्याचे जे प्रयत्न काँग्रेसने केले त्या मार्गांचा हा पक्ष या कालावधीत पुन्हा अवलंब करणार?


ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला लोकशाहीचे स्मरण झाले. लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार पाडण्यात आल्याचे आरोप करण्यात आले. पण काँग्रेसला लोकशाहीचे भरते आपल्या सोयीनुसार येते. महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पक्षास सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या आणि ज्या शिवसेनेसमवेत निवडणूक लढविली होती त्यांचे सरकार सत्तेवर यावयास हवे होते. पण ते येऊ शकले नाही. पण जो काँग्रेस पक्ष लोकशाहीचे दाखले देतो त्या पक्षाने सर्व संकेत धाब्याबर बसवून केवळ सत्तेसाठी आपल्या विरोधकांशी केलेली युती कोणत्या लोकशाही संकेतात बसते? आपल्या सोयीनुसार काँग्रेस पक्ष, या बोटावरची थुंकी त्या बोटावर सहजपणे फिरवू शकतो, हा त्या पक्षाचा इतिहास आहे त्यामुळे त्या पक्षाने लोकशाहीच्या गप्पा न मारलेल्याच बऱ्या!


काँग्रेसमधील अंतर्गतवाद, संघर्ष यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांचे सरकार कोसळले. तेथे भाजपचे सरकार येईल हे उघडच आहे. काँग्रेसने समाज माध्यमांवर जो संदेश प्रसृत केला आहे त्याचा अर्थ, सत्तेवर येणारे सरकार ‘येन केन प्रकारेण’ पाडण्याचा काँग्रेसचा मानस आहे, हा आहे. आहे. पण त्यामध्ये तो पक्ष सफल होणार नाही, ते स्पष्ट आहे. १९८४ मधील दिल्लीतील शीखविरोधी दंगलीसंदर्भात ज्या कमलनाथ यांच्याकडे संशयाची सुई रोखली गेली आहे त्या कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्याने अनेकांना नक्कीच हायसे वाटले असेल.


ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर एक वेगळी ताकद भाजपला मिळणार आहे. भाजप नेत्या वसुंधरा राजे, यशोधरा राजे यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. काँग्रेसचे नेते त्या पक्षाची अवस्था आणि मिळत असलेली वागणूक लक्षात घेऊन तो पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. असे असताना १५ ऑगस्ट २०२० रोजी कमलनाथ हे मुख्यमंत्री नात्याने ध्वजारोहण करणार हे कशाच्या आधारावर काँग्रेस पक्ष म्हणत आहे?


@@AUTHORINFO_V1@@