पाणथळ जागा वाचवायलाच हव्यात ! - सीमा हर्डीकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2020
Total Views |
wetland _1  H x
 
 
मुंबई (प्रतिनिधी) - पाणथळ जागा पाणी साठवण्याचे महत्त्वाचे काम करतात. पाझर तलाव, विहिरीसाठी ते जलस्रोत असतात. इतकंच नाही तर पाणी अडवणे किंवा ते धारण करण्याचे काम या पाणथळ जागा करतात. त्यामुळे अशा पाणथळ जागांचे महत्त्व अनन्यसाधारण असून त्यांचे जतन व्हायलाच हवे, असे कळकळीचे आवाहन सीमा हर्डीकर यांनी केले. त्या ठाण्यातील मंगल शाळेतील सभागृहात पार पडलेल्या 'भटकंती कट्टा, ठाणे' कार्यक्रमात बोलत होत्या.
 
 
 
पाणथळ जागा म्हणजे काय आणि आपल्या परिसरातल्या अशा जागा आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत याबाबत सीमा हर्डीकर यांनी 'भटकंती कट्टा, ठाणे'मध्ये मार्गदर्शन केले. त्या पुढे म्हणाल्या की, कालौघात शहरांचा विकासाच्या नावाखाली झालेल्या बेसुमार कामांमुळे माणसाने शहरातल्या पाणथळ जागांचा ऱ्हास केला आहे. घनकचरा, प्रदूषण, अतिक्रमण यांसारख्या कारणांमुळे या जागा लुप्त होत चालल्या आहेत. हे गेल्या वर्षी केलेल्या पाहणीतून समोर आल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. याबद्दल अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, २०१० साली भारतभर पाणथळ जागांचा सर्व्हे करण्यासाठी एक अधिसूचना आली. राष्ट्रीय पाणथळ जागांचा नकाशा त्याअंतर्गत ठाण्यातील (तेव्हाचे ठाणे म्हणजे आता ठाणे अधिक पालघर) पाणथळ जागांची संख्या १८९५ अशी भरली. यात भातखाचरं असणाऱ्या जागा सुद्धा मोजल्या गेल्या. आपल्या सरकारी कारभारामुळे प्रत्यक्षात हा सर्व्हे जेव्हा २०१९-२० मध्ये झाला तेव्हा १३२ (या आताच्या ठाण्यातल्या. पालघर मिळून आकडा फारतर २०० पर्यंत पोहोचेल) जागा सापडल्या. आणि आता ठाण्याच्या शासकीय अधिकाऱ्यांनी नोंद केली ती फक्त ८ जागांची. आणि एवढं असूनही ठाणे हे तलावांचे शहर म्हणून मिरावले जाते.
 
 
 
या सगळ्याचा परिणाम म्हणजे वातावरण बदलामुळे येणाऱ्या पूरपरिस्थितीशी लढण्याची असमर्थता, अन्य जीवांचा कमी होत जाणारा अधिवास, जमिनीच्या पाणीधारण क्षमतेत घट ज्यांचा थेट संबंध सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी येतो. तेव्हा अशा पाणथळ जागा वाचवण्यासाठी आपण सर्वांनी सजग राहिले पाहिजे. नियम मोडून बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर लढा, लढा देणाऱ्यांना पाठिंबा, वैचारिक आणि माहिती पुराव्यानिशी पाठबळ, सामाजिक जागरूकता अशा मार्गांनी आपण हा ऱ्हास थांबवू शकतो, असे ही त्यांनी आवर्जून नमूद केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@