डॉ. अजय चंदनवाले यांचे प्रांजळ मत
मुंबई : “वैद्यकीय व्यवसायाला समाजात मानाचे स्थान आहे. रुग्णालयात येणारी व्यक्ती ही आरोग्यविषयक तक्रारींनी पीडित असते, आर्थिक चणचणीला तोंड देत असते, मनाने पिचलेली असते, अशा वेळी डॉक्टरांसह या क्षेत्रातील प्रत्येकानेच त्या माणसाशी माणसासारखे वागणे ही वैद्यकीय क्षेत्राची गरज आहे. आपल्याइतकीच त्या व्यक्तीच्या वेळेलाही किंमत असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे,” असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी येथे केले.
नाना पालकर स्मृती समितीच्यावतीने रविवार, दि. १ मार्च रोजी सेवाभावी मान्यवरांना नाना पालकर स्मृती रूग्णसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर समितीचे कार्याध्यक्ष रवींद्र कर्वे व सचिव अविनाश खरे उपस्थित होते. यंदा हा पुरस्कार नायर रुग्णालयाच्या पद्मजा कानिटकर यांना प्रदान करण्यात आला. पद्मजा कानिटकर या नायर रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते विभागाच्या प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे राजहंस प्रतिष्ठानचे संस्थापक सुहास कबरे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते व श्री साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त नटुभाई पारेख यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. चंदनवाले म्हणाले की, “नाना पालकर यांनी अवघ्या ४९ वर्षांच्या आयुष्यात केलेले अफाट कार्य आणि रुग्णसेवेचे त्यांनी रुजविलेले रोप आज नाना पालकर स्मृती समितीच्या दहा मजली इमारतीच्या रूपात उभे आहे. अशी संस्था वर्षाचे ३६५ दिवस चोवीस तास, सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहिल्यास राज्यातील अनेक आरोग्यविषयक प्रश्न सुटतील. आज अनेक कॉर्पोरेट कंपन्या, शासनाच्या आरोग्यविषयक योजना यांच्या माध्यमातून संस्थांना मदत मिळणे शक्य आहे. अनेक संस्था स्वतःहून मदत करण्यास उत्सुक असतात. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. त्या मदतीचा योग्य कारणांसाठी वापर करून रुग्णालये, वैद्यकीय मदत पुरविणाऱ्या संस्था अधिकाधिक अद्ययावत केल्या पाहिजेत. त्यासाठी प्रसंगी स्वतःचे मान-अपमान पचवून मदत मागितली पाहिजे,” असेही ते म्हणाले. रवींद्र कर्वे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचा गेल्या ५० वर्षांचा प्रवास उलगडून दाखवला. रुग्ण सेवा पुरस्काराच्या पुरस्कारार्थींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. नाना पालकर स्मृती समिती या संस्थेकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अकोला येथे व गोवा राज्यात वैद्यकीय सुविधा पुरविणारी संस्था येत्या काळात सुरू होणार असल्याची माहिती अविनाश खरे यांनी यावेळी दिली.