तुझे रुप चित्ती राहो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2020
Total Views |

facewash_1  H x



जे आहे जसे आहे तसे स्वीकारावे आणि पुढे मार्गस्थ व्हावे हेच उत्तम! तरीदेखील आयुर्वेदाने मानवाला नेहमीच मोलाची साथ दिली आहे. ‘सुंदर दिसावं’ या आशेतून विविध क्रिम्स, पावडर चेहर्‍यावर चोपडल्या जातात. ‘विको’ उत्पादनांमध्ये आयुर्वेदिक घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सौंदर्य विशेषत: चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी विचार केला गेला तेव्हा कालसुसंगत ‘फेसवॉश’चा जन्म झाला.


मी जीवनावर भरभरुन प्रेम करणारा आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ मंगेश पाडगावकरांच्या या कवितेतील मर्म मला उमगलेले आहे. मला अनेक विषयांमध्ये रुची आहे. कुतूहल आहे. त्यातही अध्यात्माकडे माझा विशेष कल आहे. जीवनाचा आस्वाद रसिकतेने घ्यावा आणि प्रत्येकाने आपल्या कौटुंबिक, सामाजिक भूमिका यथाशक्ती पार पाडाव्यात या विचारांचा मी आहे. मीदेखील तुमच्यासारखाच मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखासारखा कुटुंबवत्सल. माझं कुटुंब माझा परिवारही विस्तारलेला. ‘विको’ परिवाराशी संलग्न प्रत्येक सदस्य माझा आहे.


कामाच्या व्यापातून वेळ काढून विरंगुळा म्हणून मी नेहमी मराठी-हिंदी जुनी गाणी ऐकत असतो. ‘सागर’ मधल्या एका हिंदी गीताने मला विचारप्रवृत्त केले. ‘चेहरा हैं या चाँद खिला हैं।’ यातील संगीत आणि अर्थपूर्ण शब्द मला विचारप्रवृत्त करुन गेले. चेहरा अर्थात मुख, वदन हा व्यक्तिमत्त्वाचा किती महत्त्वपूर्ण भाग आहे! मराठीत एखाद्या शहराचा/गावाचा/आळीचा/विभागाचा ‘चेहरामोहरा’ असे म्हटले की डोळ्यांपुढे एक चित्र उभे राहते. एखादे नाव डोळ्यापुढे त्या व्यक्तीचा चेहरा घेऊनच मन:पटलावर उभे राहते अगदी ‘तुझे रुप चित्ती राहो’ असे अभंगात म्हटले आहे. निर्गुण निराकार परमेश्वर सगुण रुपात सर्वसामान्यांना भावतो. गणपती म्हटल्यावर शंकर डोळ्यांपुढे येत नाही आणि विठ्ठल म्हटल्यावर दत्तगुरु उभे राहत नाहीत, अशी चेहर्‍याची महती! केवळ स्त्रियाच नाहीत तर पुरुषालादेखील आपण सुंदर, नीटनेटके दिसावे असे वाटते. अगदी घराबाहेर नीटनेटका प्रसन्न चेहरा व्यक्तिमत्वास उठाव देतो. दिवसेंदिवस ‘प्रेझेंटेबल’ राहणे ही लोकांची मानसिक गरज आहे. या सर्वांच्या प्राप्तीसाठी आपल्या दिनचर्येकडे लक्ष द्यावयास हवे. पुरेशी झोप, व्यायाम आणि तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा. तसं पाहायला गेलं तर वैयक्तिक जीवनातील मानसिक ताणतणाव व्यक्तिमत्त्वावर खूप मोठा परिणाम करतात. ताणतणाव हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असला तरी त्यापासून मुक्त राहण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायलाच हवा. स्वच्छ मन आणि सकारात्मक विचार तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर सुपरिणाम घडवून आणतात.


‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ आपण अनुभवतो. त्यात उन्हाळा म्हटलं की आपली त्वचा आणि मन उष्णतेने करपायला लागते. आत्ताच प्रखर ऊन शरीराला भाजून काढत आहे. त्वचा हे संपूर्ण शरीराचे बाह्य आवरण असल्याने सगळे आघात प्रथम तिच्यावर होतात. त्यामुळे नको नकोसे वाटणारे त्वचेचे विकार आपले मन:स्वास्थ्य साफ बिघडवून टाकतात. चेहर्‍यावरील एखादा ‘स्पॉट’, पुटकुळी आली आणि मुक्कम वाढला की कोणत्याही वयोगटातील व्यक्ती अगदी हतबल होते. त्यात आपल्या आजूबाजूचे ‘बिनडिग्रीचे डॉक्टर’ आणि मोफत सल्ला देणार्‍यांची आपल्याला कमतरता नसते. बर्‍याचदा आजार परवडतो, पण आगंतुक सल्ले नकोत, असेही वाटून जाते. या लोकांना आपल्या चेहर्‍याची फार काळजी असते. त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा असतो. मला तर असा सल्ला देणारे भेटले की, तुकोबांचा अभंग आठवतो - ‘तुका म्हणे ऐशी कळवळ्याची जाती। करी लाभावीण प्रीती॥’


असे ‘लाभावीण प्रीती’वाले पावलोपावली भेटतात आणि आपली गोची करून ठेवतात. गोरा रंग आणि नितळ निरोगी त्वचा या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. यात तफावत आढळते. आपल्या देशात जेवढं गोर्‍या रंगाला अवास्तव महत्त्व दिलं जातं, तेवढं महत्त्व जगात अन्यत्र कुठेही नाही. त्यामुळे गोर्‍या रंगाच्या मागे लागू नका त्वचा गोरी नसली तरी निरोगी, सतेज असायला हवी. आपल्याला देवाने जे दिलंय त्याविषयी कोणताही न्यूनगंड बाळगू नये. खरंतर बाह्यत्वचेच्या रंगापेक्षा स्वभावगुण फार महत्त्वपूर्ण ठरतात. अनुवंशिकतेने आपल्याला शरीरसंपदा प्राप्त होते. त्यात समाधान मानले तर तुमचा वेळ, श्रम, पैसा वाया जाणार नाही. हे सर्व आपण आपल्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी वापरू शकता.


प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे ‘श्रेयस’ आणि ‘प्रेयस’ निश्चित केले पाहिजे. समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या व्यक्ती चेहर्‍यानेच वा शरीरानेच सुंदर होत्या असे नाही तर त्यांचे विशाल मन आणि कर्तृत्व अतिशय देखणे होते. ‘काय भुललासी वरलिया रंगा’ असे संतवचन आहे. त्यामुळे कोणत्याही वयात छान दिसण्याचा अतिरेकी अट्टाहास करू नये. जे आहे जसे आहे तसे स्वीकारावे आणि पुढे मार्गस्थ व्हावे हेच उत्तम! तरीदेखील आयुर्वेदाने मानवाला नेहमीच मोलाची साथ दिली आहे. ‘सुंदर दिसावं’ या आशेतून विविध क्रिम्स, पावडर चेहर्‍यावर चोपडल्या जातात. ‘विको’ उत्पादनांमध्ये आयुर्वेदिक घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सौंदर्य विशेषत: चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी विचार केला गेला तेव्हा कालसुसंगत ‘फेसवॉश’चा जन्म झाला. हल्ली ‘फेसवॉश’ हा महत्त्वाचा भाग आहे.


सततचा प्रवास, धूळ, प्रखर सूर्यप्रकाश यामुळे प्रफुल्लित चेहरा काही तासांमध्ये तेलकट, निस्तेज वाटू लागतो. तो स्वच्छ करण्याची घराबाहेरची गरज म्हणून ‘फेसवॉश’ उपयुक्त आहे. नव्या पिढीची आणि बदलत्या काळाची ही गरज आहे. अनेक रिसर्च करून ‘विको’ने ‘फोमबेस फेसवॉश’ जनसामान्यांसाठी आणला आहे. प्रत्येक व्यक्तीची त्वचा अमूल्य आहे. आयुर्वेदाने तुमच्या आरोग्याची काळजी नेहमीच वाहिली आहे. ‘हळद’ ही सर्वगुणसंपन्न आहे.


‘विको’च्या ‘फोमबेस फेसवॉश’मध्ये प्रामुख्याने हळदीचा वापर केला गेला. ‘हळद’ ही जंतुघ्न असल्याने तिचे फायदे अनेक आहेत. आहारातून ‘हळद’ पोटात जाते, पण बाह्यत्वचेचे पोषणदेखील हळदीमुळे होऊ शकते.


‘फेसवॉश’ तयार करताना ‘विको’ परिवाराने सर्वसाकल्याने विचार केला आहे. असं म्हणतात, ‘जगात सर्व सोंगं घेता येतात, पण पैशाचं सोंग घेता येत नाही.’ त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावायची नाही, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकाला द्यायचं, हाच विचार या उत्पादनामागे होता. या फेसवॉशची छोटी ट्युब सकाळी एकदा आणि रात्री झोपताना एकदा वापरली तरी एका महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकते, अशी ग्राहकांची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे ‘मनीसेव्हर फेसवॉश’ असे म्हटल्यास वावगे ठरू नये. चेहर्‍यावर पाणी मारून मटार दाण्याएवढाच फेसवॉश घेऊन चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करावे. १५ सेकंदांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाकावा. प्रवासात सोबत नेण्यास सुटसुटीत असा फेसवॉश पर्समध्ये कसाही ठेवला तरी घट्ट झाकणामुळे पाझरत नाही. इतर वस्तू खराब होत नाहीत, ही काळजी घेतली आहे. याचे ‘पॅकेजिंग’ आकर्षक आहे. ग्राहकाला येणार्‍या समस्या आधीच विचारात घेऊन त्याची साईझ आणि डिझाईन केलेले आहे. ग्राहकाच्या श्रमाच्या पैशाचा पुरेपूर वापर/मोबदला त्याला मिळायला हवा हेच आमचे ध्येय आहे.


‘विको फोमबेस फेसवॉश’ हा सर्व प्रकारच्या त्वचेला उपयुक्त आहे. त्यातही ज्यांची त्वचा (ऑईली) तेलकट असते, त्यांना जास्त फायदा होतो. इतर ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात ‘ऑइली स्कीन’ समस्या निर्माण करते. अशावेळेस मधासारखा दिसणारा सुवासिक फेसवॉश चेहर्‍याला लावल्यावर चित्तवृत्ती उल्हसित होतात आणि मेंदूला ताजेतवाने वाटते. फेसवॉशच्या गुणधर्मामुळे चेहर्‍यावरील जंतूंचा नाश होतो आणि त्वचेला संरक्षक कवच प्राप्त होते.


याच्या नियमित वापराने मुरमं, पुटकुळ्या, काळपट डाग, जखमा बर्‍या होण्यास मदत होते. हे एक प्रकारचे आयुर्वेदिक मेडिसीन आहे. तुमच्या नाजूक सुंदर त्वचेला हे एक प्रकारचे वरदानच आहे. कोणत्याही गोष्टीची आधी प्रचिती घ्यावी, त्यानंतर आपले मत बनवावे. जगात सर्वात मौल्यवान काय तर ते आपले शरीर आणि त्यावरील त्वचा याची निगराणी ठेवण्यासाठी आपला ‘चॉईस’ ही तसाच हवा. चोखंदळ ग्राहक हे नेहमी नैसर्गिक तत्त्वांवर भर देतात आणि म्हणूनच निसर्गही त्यांना भरभरून देत असतो.

- संजीव पेंढरकर
@@AUTHORINFO_V1@@