‘बीसीसीआय’चा निर्णय योग्यच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2020
Total Views |

BCCI_1  H x W:



न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला
‘व्हाईटवॉश’च्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागल्याच्या घटनेची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गंभीर दखल घेतली आहे. या मानहानीकारक पराभवाची चौकशी करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयचा निर्णय योग्यच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. न्यूझीलंड दौर्‍यात भारतीय संघाने टी-२० मालिकेत उत्तम प्रदर्शन केले. - ने टी-२० मालिका जिंकत भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यांना ‘व्हाईटवॉश’ देत इतिहासाला गवसणी घातली. टी-२० मालिकेतील यशानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतही भारतीय संघाचा हा विजयी धडाका कायम राहील, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली. या दोन्ही मालिकांमध्ये नेमके घडले उलटेच. प्रतिस्पर्धी संघानेच भारताला ‘व्हाईटवॉश’ दिला. ‘टी-२०’ मालिकेत चमकदार कामगिरी करणारे अनेक खेळाडू कसोटी आणि एकदिवसीय संघातही होते. ज्या पद्धतीने ‘टी-२०’ मालिकेत त्यांनी कामगिरी केली, तशी दमदार कामगिरी त्यांना एकदिवसीय आणि कसोटी मालिकेदरम्यान करता आली नाही. यामागे नेमके कारण काय? ‘टी-२०’ मालिकेत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविल्यानंतर भारतीय खेळाडूंची कामगिरी लौकिकाला साजेशी का झाली नाही? आदी सर्व प्रकारांची चौकशी करण्याकरिता बीसीसीआयने हा निर्णय घेतला असून अनेक माजी क्रिकेटपटू आणि समीक्षकांनी त्याला पाठिंबाही दर्शवला आहे. बीसीसीआयचा हा धाडसी निर्णय असल्याचे क्रिकेट समीक्षकांचे मत आहे. १९९० च्या दशकात ‘मॅच फिक्सिंग’चे प्रकरण उजेडात आल्यानंतर बीसीसीआयने सर्वात आधी खेळाडूंच्या चौकशीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २००७ साली विश्वचषकात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतरही बीसीसीआयने खेळाडूंची चौकशी केली होती. ‘आयपीएल’मधील ‘स्पॉट फिक्सिंग’ प्रकरण, हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांची वादग्रस्त विधाने आदी प्रकरणांमध्येही बीसीसीआयने चौकशीचा निर्णय घेतल्याचा इतिहास आहे. यात दोषी आढळल्यानंतर खेळाडूंवर कारवाईही झाली आहे. त्यामुळे बीसीसीआयचा हा निर्णय योग्य म्हटले तर वावगे ठरणार नाही.




नाम बडे और दर्शन छोटे

सलग पाच ‘टी-२०’ सामने जिंकत न्यूझीलंडला ‘व्हाईटवॉश’ देणार्‍या भारतीय क्रिकेट संघाला एकदिवसीय मालिकेनंतर आता पुन्हा कसोटी मालिकेतही हाराकिरीचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या दौर्‍यावर सलग दुसर्‍या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवातून धडा घेतल्यानंतर आपल्या चुका सुधारत भारतीय संघ किमान दुसर्‍या सामन्यात तरी योग्य कामगिरी करेल, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आदी सर्व बाबींमध्ये भारतीय खेळाडूंपेक्षा प्रतिस्पर्धी संघाचे पारडे अधिक जड असल्याचे दिसून आले. या पराभवास नक्की जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला असून याबाबत क्रिकेट समीक्षकांकडून विविध मत-मतांतरे व्यक्त करण्यात येत आहे. रोहित शर्मा, शिखर धवन यांसारखे अनुभवी सलामीवीर फलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल या सलामीवीरांना त्या जागी संधी मिळाली. मात्र, उत्तम फलंदाजी करून ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाही. चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनाही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात असणार्‍या हनुमा विहारी, रवींद्र जडेजा यांनाही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संघातील एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता न आल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांनाही प्रभावी मारा करता आला नाही. परिणामी, भारताला हाराकिरीचा सामना करावा लागला. कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर परदेशी धरतीवर भारतीय फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे क्रिकेट समीक्षकांकडून चर्चिण्यात येत आहे. कसोटी क्रिकेटच्या प्रकारात भारतीय संघ सध्या अव्वल स्थानी आहे, तर न्यूझीलंड दुसर्‍या स्थानी विराजमान आहे. पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाचे संघ असणार्‍या या दोन्ही संघांत रंगतदार लढत होईल, असे अपेक्षित होते. मात्र, तसे काही झाले नाही. भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांपुढे आव्हानच निर्माण करू शकला नाही. दिग्गज फलंदाजांची फौज असणारे खेळाडू असतानाही भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे नाम बडे और दर्शन खोटे, अशीच काहीशी भारताची परिस्थिती झाली आहे.


- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@