व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रवेशाचे महत्त्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2020
Total Views |


MBA_1  H x W: 0


व्यवस्थापन क्षेत्रात देशभरात करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध असून त्यासाठी व्यवस्थापन विषयात शिक्षण घेणेही क्रमप्राप्त ठरते. त्या अनुषंगाने व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रवेशाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...


‘व्यवस्थापन
विषयातील शैक्षणिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी संबंधित संस्थेची प्रवेश परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्या दृष्टीने संबंधित विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक ठरते. या प्रवेश पात्रता परीक्षांची पूर्वसूचना संस्थांद्वारा आपापल्या अभ्यासक्रमांच्या जाहिराती प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित जाहिरातींद्वारा दिली जाते व या जाहिराती विद्यार्थी व पालक या उभयतांसाठी मार्गदर्शक ठरतात. या प्रवेश पात्रता परीक्षांच्या जाहिरातींमध्ये संबंधित संस्थेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप व तपशील, प्रवेश परीक्षा देण्यासाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, प्रत्यक्ष प्रवेश पात्रता परीक्षेची व त्यातील विषय आणि त्यांच्या तपासणीचा तपशील, देण्यात येणारे गुणांक , प्रवेश परीक्षा देणार्यांची प्रत्यक्ष प्रवेश देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येणारी गुणवत्ता यादी व या सार्‍यावर आधारित प्रत्यक्षात देण्यात येणारा प्रवेश या सार्‍याचा समावेश असतो.



अभ्यासक्रमाच्या तपशिलाची वेळेत पडताळणी करणे जरूरी असते
. उदाहरणार्थ, संबंधित अभ्यासक्रमाला कुठल्या प्रकारची मान्यता आहे, हे संबंधित विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. सर्वसाधारणपणे व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळ, संबंधित विद्यापीठ वा अभिमत विद्यापीठ यापैकी अथवा यासारख्या एखाद्या प्रथितयश शैक्षणिक संस्थेच्या मान्यतेचा पडताळा अवश्य व वेळेत घ्यावा; अन्यथा मान्यताप्राप्त नसणार्‍या संस्थेतील अभ्यासक्रम केल्यास प्रसंगी फसगत होऊ शकते. प्रवेश पात्रता परीक्षा देण्यासाठी पदवी परीक्षा विशिष्ट गुणांच्या टक्केवारीसह उत्तीर्ण होणे अनिवार्य असले तरी पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थीसुद्धा विविध संस्थांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा देण्यास पात्र असतात. मात्र, त्यांनी प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी निर्धारित गुणांकांसह पदवी पात्रता पूर्ण करणे आवश्यक असते, हे या संदर्भात उल्लेखनीय असते.



अर्जदार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अभ्यासक्रमात प्रवेश देताना विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता परीक्षेेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकांचे संयुक्तपणे मूल्यांकन करून त्याआधारे संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येतो
. त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेतील प्राप्त गुणांच्या टक्केवारीशिवाय प्रवेश पात्रता परीक्षेेतील गुणांकावर लक्ष केंद्रित करणे त्यांना लाभदायी ठरते. व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश पात्रता परीक्षेतील पुढचा टप्पा म्हणजे समूह चर्चा (ग्रुप डिस्कशन.) प्रवेश पात्रता परीक्षेेत निर्धारित गुणांक प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांना संबंधित संस्थांतर्फे समूह चर्चेसाठी बोलाविण्यात येते. समूह चर्चेचा मुख्य उद्देश प्रवेश पात्रता परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संवादक्षमता व विविध विषयांमधील शैक्षणिक-व्यावसायिक कौशल्यांची प्रवेशपूर्व पडताळणी करणे हा असतो. समूह चर्चेतील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनानंतरच त्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येत असल्याने समूह चर्चेकडेदेखील गांभीर्याने पाहणे नितांत आवश्यक असते.



‘व्यवस्थापन’ विषयात पदव्युत्तर पात्रता पूर्ण करून करिअर करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक तपशीलाचा पूर्णपणे व विचारपूर्वक अभ्यास करणे गरजेचे ठरते. ‘व्यवस्थापन’ क्षेत्रातील ‘एमबीए’ ही पदव्युत्तर पदवी अथवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम हे सर्वसाधारणपणे दोन वर्षांचे असतात, तर काही संस्थांमध्ये हा कालावधी एक वर्षाचादेखील असू शकतो. अभ्यासक्रमाचा कालावधी महत्त्वपूर्ण असला तरी त्याहून महत्त्वाचे असते, ते या अभ्यासक्रमात समाविष्ट असणारे मुख्य विषय. बहुतांश व्यवस्थापन संस्थांमध्ये फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस, सिस्टिम्स यांसारख्या विशेष विषयांसह हे अभ्यासक्रम उपलब्ध असतात. यापैकी प्रत्येक विषयातील अभ्यासक्रम पात्रतेचे महत्त्व असले तरी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो, तो संबंधित विद्यार्थ्यांचा शैक्षणिक-आवडविषयक कला. आपल्या आवडीच्या विषयात प्रत्येक जण यशस्वी अवश्य होतो, हे साधे तत्त्व या अभ्यासक्रमांच्या निवडीच्या संदर्भात पण अवश्य लागू होत असल्याने एमबीए अभ्यासक्रम, अभ्यासक्रमासाठी संस्था वा विद्यापीठ यांच्या विचाराइतकेच आपल्याला व्यवस्थापन पात्रतेनंतर कुठल्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याचा सविस्तर व सांगोपांग विचार करणदेखील नितांत आवश्यक ठरते.



‘व्यवस्थापन’ अभ्यासक्रम प्रयोग पात्रता परीक्षांमध्ये अर्जदार विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक, त्यांचा भावनिक कल, आकलन क्षमता, वैचारिक स्तर आणि दिशा, निर्णयक्षमता, चोखंदळ वृत्ती, प्रयोगशीलता, नेतृत्वक्षमता, सृजनशीलता इ. विषयांवर आधारित मुद्दे आणि विषयांवर भर देण्यात येऊन त्यानुसार ढोबळमानाने प्रवेश पात्रता परीक्षेचे स्वरूप आणि रचना निश्चित करण्यात येते व त्यामुळे या प्रवेश पात्रता परीक्षेचे स्वरूप अशा प्रकारचे असते. वर नमूद केलेले मुद्दे व्यावहारिक जीवनात प्रत्येक व्यवस्थापकासाठी पण आवश्यक असतात. व्यवस्थापन क्षेत्रात आज शैक्षणिक अभ्यासक्रम म्हणजेच ‘एमबीए’ वा समकक्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश पात्रता परीक्षा देणारे, हेच या अभ्यासक्रमांचे उद्याचे विद्यार्थी व नजीकच्या काळातील व्यवस्थापक ठरणार असल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक-मार्गदर्शक या प्रत्येकाने व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया-पात्रता परीक्षा या मुद्द्यांपासूनच त्याकडे अधिक गांभीर्याने व वस्तुनिष्ठ स्वरूपात पाहणे, हे त्या सार्‍यांच्या दृष्टीने लाभदायक ठरते.



-दत्तात्रय आंबुलकर
@@AUTHORINFO_V1@@