गर्दी ओसरली सवयींचे काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2020   
Total Views |



Covid_1  H x W:



सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सवयींकडे अजूनही सर्रास कानाडोळा केला जातोय. कारण, काही नागरिकांच्या अंगी या वाईट सवयी इतक्या भिनल्या आहेत की, ‘कोरोना’चा प्रादुर्भाव लक्षात आल्यानंतरही यांच्या तोंडावरच यांचे नियंत्रण नाही.


'कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे सध्या सर्व स्तरावर आवाहन केले जात आहे. पण, या विषाणूच्या फैलावाची भीषण परिस्थिती लक्षात आल्यानंतरही काही लोकांच्या सार्वजनिक अनारोग्य पसरविणार्‍या सवयी मात्र बदललेल्या नाहीत. रस्त्यावरची गर्दी ओसरली असली तरी वाईट सवयी ‘जैसे थे’च आहेत. शिंकताना रुमाल वापरा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका यांसारख्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सवयींकडे अजूनही सर्रास कानाडोळा केला जातोय. कारण, काही नागरिकांच्या अंगी या वाईट सवयी इतक्या भिनल्या आहेत की, ‘कोरोना’चा प्रादुर्भाव लक्षात आल्यानंतरही यांच्या तोंडावरच यांचे नियंत्रण नाही. सध्या अनावश्यक प्रवास टाळण्याचे कानीकपाळी आवाहन केले जात असले तरी आम्हा पत्रकारांची यातून सुटका नाहीच. त्यामुळे प्रवास हा अनिवार्य. अशाच एक व्यक्तीला परवा रेल्वे स्थानकावर थुंकल्यानंतर हटकले असता, जणू काही झालेच नाही, या आविर्भावात तो पुढे निघून गेला. अशा लोकांना स्वतःच्या आरोग्याची धड काळजी तर घेता येत नाहीच, उलट प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ते इतरांचेही आरोग्य धोक्यात आणतात. पण, ना त्याची खंत ना खेद. ‘आपल्या पचापचा थुंकण्याने, इतरांच्या तोंडासमोर रुमाल न धरता शिंकण्याने काय ‘कोरोना’ पसरणार आहे का,’ अशीच यांची बेजबाबदार, बेशिस्त वागणूक... 


सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणार्‍यांवर कित्येक पालिका क्षेत्रात दंडात्मक कारवाई केली जाते. पण, पालिकाही प्रत्येक कानाकोपर्‍यात, दिवसरात्र अशा बेशिस्तांवर नजर ठेवू शकत नाही, हे समजून घ्यायला हवे. त्यामुळे केवळ दंडाच्या रकमेत वाढ करून चालणार नाही, तर अशांना सार्वजनिक स्वच्छतेचीच शिक्षा द्यायला हवी. दुसरीकडे शालेय स्तरावर आणि कौटुंबिक पातळीवरही स्वच्छतेचे केवळ पुस्तकी संस्कार न गिरवता, त्याची अंमलबजावणी विद्यार्थी त्यांच्या दैनंदिन जीवनात करत आहेत की नाही, याची खातरजमा करावी. जपानचेच उदाहरण घ्या. तेथील शाळांमध्ये स्वच्छता कर्मचारीच नाहीत. कारण, संपूर्ण शाळा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांची. त्यामुळे स्वच्छतेचे संस्कार नुसते सांगून, ऐकून अमलात येत नसतात, तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडच द्यावी लागते.
आरोग्यक्षेत्रात आपत्तीव्यवस्थापन


भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सरकारतर्फे ‘एनडीआरएफ’ची पथकं त्वरित तैनात केली जातात. मदतकार्यालाही सुरुवात होते. पण, ‘कोरोना’सारख्या वैद्यकीय आणीबाणीच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्या देशात एक स्वतंत्र, सुसज्ज आणि ‘एनडीआरएफ’च्या धर्तीवर एक सक्षम यंत्रणेची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. साथीचे आजार, महामारी वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच, त्या रोगाची चाचणी करण्यापासून ते प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यासाठी सरकारकडून निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. आजही केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीचा वेगवान पद्धतीने सामनाही करते आहे. परंतु, या उपाययोजना महामारीसारख्या महाफैलावाला रोखण्यासाठी पुरेशा नाहीत, हे किमान ‘कोरोना’च्या निमित्ताने समजून घ्यायला हवे.
साथीचे आजार समाजात पसरल्यानंतर रुग्णालयांमध्ये स्पेशल वॉर्डची तात्पुरती उभारणी न करता, किमान मूलभूत सोयीसुविधांनी युक्त वॉर्डसाठी एक स्वतंत्र, राखीव जागा ठेवता येईल का, याचा विचार आता करायला हवा. जेणेकरून महामारीसारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अधिकाधिक रुग्णांवर अशा मोठ्या वॉर्डमध्ये वेळीच उपचार करणे शक्य होईल आणि महामारी नसताना त्या स्पेशल वॉर्डचा उपयोग रुग्णालये त्यांच्या गरजेनुसारही करू शकतील. त्याचबरोबर ‘एनडीआरएफ’च्या धर्तीवर महामारीसारख्या वैद्यकीय संकटाशी सर्वार्थाने लढा देऊ शकेल, अशी प्रशिक्षित, कुशल डॉक्टर, परिचारिकांची एक मोठी फौजच देशभरात सज्ज ठेवायला हवी. जेणेकरून अशा आपत्कालीन परिस्थितीवर वेळीच नियंत्रण प्रस्थापित करणे सोयीचे ठरेल. तसेच नागरिकांचीही अशा आपत्कालीन परिस्थितीत भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहेच. स्वच्छता हा त्यापैकीच एक पैलू. तेव्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाची खिल्ली उडवणार्‍यांना किमान या ‘कोरोना’च्या निमित्ताने का होईना, आतातरी स्वच्छतेचे महत्त्व पटले असावे, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
@@AUTHORINFO_V1@@