पडद्यावरच्या ‘दोस्ता’ची जीवनपटावरून एक्झिट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020
Total Views |

raviraj_1  H x  
 
 
 
 
ज्येष्ठ अभिनेते रविराज काळाच्या पडद्याआड

मुंबई : मराठी, हिंदी, गुजराती चित्रपट आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीवर तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ काम केलेले अभिनेते रविराज यांचे निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी मुंबईतील विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी उषा, मुलगा प्रितेश व मुलगी पूजश्री असा परिवार आहे.


रविराज यांचे खरे नाव रवींद्र अनंद कृष्णा राव. चित्रपटासाठी त्यांचे ‘रविराज’ असे नामकरण झाले आणि आज ते याच नावाने ओळखले जातात. रविराज यांचा जन्म मंगलोरचा. ते नऊ महिन्यांचे असताना त्यांचे वडील अनंत कृष्णा राव हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आले आणि रविराज मुंबईकरच झाले. कानडी भाषिक असलेल्या रविराज यांचे शालेय शिक्षण मुंबईतच ‘डीजीटी’ अर्थात ‘धरमसी गोविंदजी ठाकरसी’ या मराठी शाळेत तर इंटरपर्यंतचे शिक्षण के. सी. महाविद्यालयात, विज्ञान शाखेतील ‘बीएस्सी’पर्यंतचे पुढील शिक्षण रुपारेल महाविद्यालयात झाले.


उमेदीच्या काळात काही वर्षे नोकरी केल्यानंतर अचानक त्यांनी अचानक नोकरीचा राजीनामा दिला आणि अभिनेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने मेहनत घेतली. ‘आहट’ हा हिंदीतील त्यांचा पहिला चित्रपट. राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जावई विकत घेणे आहे’ हा त्यांचा मराठी चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने रविराज यांना नाव आणि प्रसिद्धी मिळाली. नंतर रविराज यांनी ‘ओवाळिते भाऊराया’, ‘तूच माझी राणी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘देवापुढे माणूस’, ‘अजातशत्रू’, ‘दोस्त असावा तर असा’, ‘जावयाची जात’, ‘नणंद भावजय’, ‘भन्नाट भानू’ आदी मराठी चित्रपट केले. ‘अन्यायाचा प्रतिकार’ हा त्यांनी काम केलेला शेवटचा मराठी चित्रपट. रविराज यांनी ‘अचानक’, तीन चेहरे’, ‘एक चिठ्ठी प्यार भरी’, ‘चांद का टुकडा’ आणि गाजलेल्या ‘खट्टा मिठा’ या हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. यातील ‘थोडा है थोडे की जरुरत है’ आणि ‘रोल गोल माकुनिसा’ ही गाणी गाजली. ‘मेघनी रात’, ‘गाजर नी पिपुडी’, जे पीड परायी जानी रे’ आदी गुजराती चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका साकारल्या.


देखणे व्यक्तिमत्त्व, प्रसन्न आणि हसरा चेहरा असलेले रविराज नंतर रुपेरी दुनिया आणि मायावी झगमगाटापासून पूर्णपणे दूर गेले. इतकी वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात काम करूनही ते भाड्याच्या घरात राहत होते.
@@AUTHORINFO_V1@@