‘रणजी’मधील शहेनशाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2020
Total Views |


waseem jafar_1  


एक सर्वसामान्य क्रिकेटर ते ‘रणजीमधील शहेनशाह’ असा प्रवास करणार्‍या जाफरचा आजवरचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. जाफरच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...


क्रिकेट या खेळाला भारतात अन्यन्यसाधारण महत्त्व. क्रिकेटला भारतात जे वलय प्राप्त झाले, ते अन्य कोणत्याही खेळाला नाही. क्रिकेट विश्वात भारतीय संघ सध्या अव्वल स्थानी आहे. भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर असे विक्रम आपल्या नावावर रचले आहेत की, सहजासहजी ते मोडणे कोणालाही शक्य नाही. केवळ आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीच नव्हे, तर घरगुती क्रिकेट खेळणार्‍या रणजी क्रिकेट स्पर्धेतही अनेक भारतीय खेळाडूंनी विविध विक्रमांची नोंद आपल्या नावावर केली आहे. रणजी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारणारा विदर्भ संघाचा खेळाडू वासिम जाफर हा त्यांपैकीच एक, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वयाच्या ४२ व्या वर्षी वासिम जाफरने रणजी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आपल्या दोन दशकांच्या क्रिकेट करिअरमध्ये त्याने घरगुती रणजी क्रिकेट स्पर्धांमध्ये ५७ शतके आणि ९१ अर्धशतके ठोकण्याचा विक्रम केला असून २६० सामन्यांमध्ये ५७.५४च्या सरासरीने १९,१४४ धावाही साकारल्या आहेत. रणजी विश्वात जाफरने त्रिशतकही ठोकल्याचा इतिहास असून विविध विक्रम नावावर असणार्‍या जाफरला ‘रणजीमधील शहेनशाह’ किंवा ‘सचिन’ म्हणूनही संबोधले जाते. ‘एक सर्वसामान्य क्रिकेटपटू ते रणजीमधील शहेनशाह’ असा प्रवास करणार्‍या जाफरचा आजवरचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. वासिम जाफर तसा मूळचा मुंबईच्या क्रिकेट संघातील खेळाडू म्हणून ओळखला जातो.



१६ फेब्रुवारी
, १९७८ साली त्याचा जन्म झाला. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये लहानपणापासून क्रिकेट खेळणार्‍या या जाफरला अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्येच अधिक रस. शाळेत जाऊन उच्च शिक्षित होण्याऐवजी नामवंत क्रिकेटपटू होण्याकडेच त्याचा कल होता. त्यामुळे क्रिकेटमध्येच करिअर घडविण्याचा निर्धार त्याने केला. यासाठी वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्याने कसून सराव करण्यास सुरुवात केली. दररोज सकाळी उठून तो मैदानावर क्रिकेटच्या सरावासाठी जाई. पाऊस, थंडी, ऊन, वारा आदी कसलीही तमा न बाळगता तो आवर्जून क्रिकेटच्या सरावासाठी दररोज न चुकता मैदानावर जात असे. सर्वसामान्य मुंबईकर असणार्‍या या वासिम जाफरला महागड्या क्लबमध्ये जाऊन क्रिकेटचे प्रशिक्षण घेणे शक्य नव्हते. मात्र, जाफरने स्वतः मुंबईतील नामांकित मैदानांवर जाऊन क्रिकेटचे प्रशिक्षण घेत स्वतःला घडवले. त्यामुळे त्याच्या जिद्दीचे आणि कष्टाचे कौतुक करावे तितके कमीच! त्याची ही जिद्द पाहूनच मुंबईतील नामांकित प्रशिक्षकांनी जाफरला मुंबईच्या रणजी संघातून क्रिकेट खेळण्याची संधी दिली. वासिमने मुंबईच्या संघातूनच आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली. तंत्रशुद्ध सलामीवीर फलंदाज म्हणून वासिम जाफरची ओळख होती. भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या शैलीप्रमाणे खेळणारा फलंदाज म्हणून वासिम जाफरची ओळख होती. मुंबईकडून रणजी करंडक खेळताना वासिमने धावांची टांकसाळ उघडली होती. त्याचा हा कारनामा पाहून भारतीय संघातही त्याची निवड करण्यात आली. भारताकडून वासिमने ३१ कसोटी सामन्यांमध्ये १९४४ धावा केल्या होत्या. एक उत्तम सलामीवीर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतकांसह एकूण ११ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध २०१६ साली वासिमने २१२ धावांची सर्वोत्तम खेळी साकारली होती.



भारताकडून दोन एकदिवसीय सामनेही वासिम खेळला होता
. रणजी क्रिकेटमध्ये वासिम हा संघाच्या फलंदाजीचा कणा मानला जायचा. प्रत्येक संघासाठी सलामी महत्त्वाची असते आणि वासिम हा बहुतांशीवेळा संघाला दमदार सलामी करून द्यायचा. त्यामुळे मुंबईच्या संघाला प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठी धावसंख्या उभारणे सोपे जायचे. मुंबईच्या अनेक विजयांमध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच त्याला ‘रणजीमधील शहेनशाह’ म्हणून ओळखले जाते. नुकत्याच चार दिवसांपूर्वी जाफरने आपली निवृत्ती जाहीर केली. आपली निवृत्ती करताना तो म्हणाला की, “आतापर्यंत मी जे काही क्रिकेटमध्ये कमावले त्यामध्ये माझ्या कुटुंबीयांचा महत्त्वाचा वाटा आहे. आई-बाबांबरोबर माझ्या भावांनी मला क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. मला व्यावयासिक क्रिकेट खेळण्याची नॅशनल क्रिकेट क्लबमधून संधी देणार्‍या सुधार नाईक यांचेही मी आभार मानू इच्छितो. बीसीसीआय, मुंबई क्रिकेट संघटना, विदर्भ क्रिकेट संघटना यांचाही माझ्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे,” असे जाफरने यावेळी सांगितले. निवृत्त झाल्यानंतरही जाफरने क्रिकेटशी आपले नाते तोडलेले नाही. आगामी ‘आयपीएल’ सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाकडून तो प्रशिक्षकांच्या भूमिकेत सर्वांना पाहायला मिळणार आहे.


- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@