श्रीराम जन्मभूमीवर मंदिराची निर्मिती : राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2020
Total Views |
Ram mandir _1  

 

रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचा अभिनंदनपर प्रस्ताव

 
बंगळुरू : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण राष्ट्राच्या आकांक्षेनुसार, श्रीराम जन्मस्थान, अयोध्या येथे भव्य मंदिर उभारण्याच्या मार्गातील सर्व अडसर दूर झाले आहेत, असे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळास वाटते. सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मस्थानासंदर्भात ९ नोव्हेंबर २०१९ रोजी जो निर्णय दिला तो न्यायालयाच्या इतिहासातील अत्यंत महान निर्णयापैकी एक आहे. सुनावणीच्या काळात अनेक प्रकारचे व्यत्यय आणले गेले असतानाही अतुलनीय धैर्य आणि संयम यांचे दर्शन घडवून माननीय न्यायाधीशांनी अत्यंत समतोल निर्णय दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाने सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन केले.
 
 
 
"श्रीराम जन्मस्थानाच्या बाजूने विद्वान वकिलांनी समर्पित भावनेने, निष्ठेने आणि विद्वत्तापूर्ण तर्कसंगत युक्तिवाद केला, साक्षी, पुरावे सादर केले त्याबद्दल ते सर्व कौतुकास पात्र आहेत. समाजातील कोणत्याही घटकाने या निकालाकडे जय वा पराजय या भावनेने न पाहता देश, न्याय आणि घटनेचा हा विजय असल्याचे मानून त्या निर्णयाचा स्वीकार केला. या परिपक्वतापूर्ण कृतीबद्दल अखिल भारतीय कार्यकारी मंडळ संपूर्ण देशातील नागरिकांचे अभिनंदन करीत आहे.", असा प्रस्ताव अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बंगळुरूतील बैठकीत मांडण्यात आला.
 
 
 
रामभक्तांचे पुण्यस्मरण
 
 
श्रीराम जन्मस्थान मंदिरासाठीचा संघर्ष जागतिक इतिहासात प्रदीर्घ काळ चाललेल्या अनोख्या संघर्षातील आहे. सन १५२८ पासून सातत्याने सुरु असलेल्या या संघर्षात लाखो रामभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. हा संघर्ष कधी काही महापुरुषांच्या प्रेरणेने, तर कधी स्वयंस्फूर्तपणे होत राहिला. जागतिक इतिहासातील या महानतम आंदोलनास अनेक महापुरुषांनी आपले अथक परिश्रम आणि समर्पण यामुळे यशाच्या शिखरावर पोहोचविले. बलिदान करणाऱ्या अशा सर्व ज्ञात- अज्ञाताचे पुण्यस्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणे हे अखिल भारतीय कार्यकारी मंडळ आपले पवित्र कर्तव्य मानत आहे.
 
 
 
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासावर मंडळाचा विश्वास
 
 
न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर, सर्व घटकांचा विश्वास प्राप्त करून सदभावनेने त्याचा स्वीकार करायला लावणे हे कोणत्याही सरकारसाठी एक आव्हान होते. ज्या धैर्याने आणि साहसाने सरकारने सर्वांचा विश्वास संपादित केला त्याबद्दल कार्यकारी मंडळ केंद्र सरकार आणि विद्यमान राजकीय नेतृत्वाचे हार्दिक अभिनंदन करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि रामभक्तांच्या भावनांच्या अनुरूप ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ नावाचा न्यास स्थापून आणि तो शासन नियंत्रित न ठेवता त्याचे संचालन समाजाद्वारे करणे आणि त्यामध्ये प्रशासनाने सहयोगी भूमिका घेणे यावरून सरकारचे दूरदर्शित्व दिसून येते. ज्या पूज्य संतांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालले त्यांच्या नेतृत्वाखाली मंदिर निर्माणाचे कार्य पुढे नेण्याचा निर्णयही कौतुकास्पद आहे. हा न्यास श्रीराम जन्मस्थानावर भव्य मंदिराची आणि त्या परिसरातील सर्व निर्माण कार्याची उभारणी लवकरात लवकर करील, असा अखिल भारतीय कार्यकारी मंडळास विश्वास आहे. या पवित्र कार्यामध्ये सर्व भारतीय आणि जगातील रामभक्त सहभागी होतील, असा कार्यकारी मंडळास विश्वास व्यक्त केला. या पवित्र मंदिराचे निर्माण कार्य संपन्न झाल्यानंतर समाजामध्ये समरसता, एकात्मता आणि मर्यादापुरुषोत्तम रामाच्या जीवन आदर्शानुरूप जीवन जगण्याची वृती वाढेल आणि भारत जगामध्ये शांतता, सदभाव आणि समन्वय स्थापित करण्याचे आपले दायित्व पूर्ण करील, हे निश्चित आहे, असा विश्वासही मंडळाने व्यक्त केला.



 
 
@@AUTHORINFO_V1@@