श्रीवर्धन किनाऱ्यावर रायगड जिल्ह्यातील पहिले 'इन-सेटू' कासव संवर्धन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2020   
Total Views |

sea turtle_1  H

 
 
 

रायगड जिल्ह्यात सागरी कासवाची १३ घरटी 

 
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर सागरी कासवांच्या अंड्याचे 'इन-सेटू' पद्धतीने संवर्धन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच या पद्धतीव्दारे कासवाची अंडी संवर्धित करण्यात आली आहेत. सध्या कोकण किनारपट्टीवर समुद्री कासवांचा विणीचा हंगाम सुरू असून 'इन-सेटू' पद्धतीमध्ये मादी कासवाने किनाऱ्यावर अंडी दिलेल्या जागेवरच त्यांचे संवर्धन करण्यात येते.
 
 
 

sea turtle_1  H 
 
 
 
 
कोकण किनारपट्टीवर नोव्हेंबर महिन्यापासून सागरी कासवांच्या विणीचा हंगाम सुरू झाला आहे. वन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत कासवांच्या अंड्यांचे दोन प्रकारे संवर्धन करण्यात येते. यामध्ये 'एक्स-सेटू' आणि 'इन-सेटू' पद्धतींचा समावेश आहे. मादी कासवाने भरती रेषेच्या आतमध्ये अंडी दिल्यास त्यांना भरतीच्या पाण्याबरोबरच शिकारी प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे अशावेळी कासवमित्रांकडून ही अंडी भरती रेषेपासून दूर तयार केलेल्या हॅचरीतील कृत्रिम घरट्यामध्ये संरक्षित केली जातात. याला संवर्धनाची 'एक्स-सेटू' पद्धत म्हणतात. भरती रेषेपासून दूर कासवाने अंडी दिल्यास त्याचठिकाणी जाळी लावून त्यांना 'इन-सेटू' पद्धतीव्दारे संरक्षित करण्यात येते. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन किनाऱ्यावर प्रथमच 'इन-सेटू' पद्धतीने कासवाच्या अंड्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.
 
 
 
 
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर 'इन-सेटू' पद्धतीव्दारे कासवाच्या घरट्याचे संवर्धन करण्यात येते. मात्र, यापूर्वी रायगड जिल्ह्यात 'इन-सेटू' पद्धतीने कासवांच्या घरट्यांचे संवर्धन झाले नव्हते. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी सागरी कासवांची विण होते. गेल्या पाच महिन्यांमध्ये हे चार किनारे मिळून कासवाची १३ घरटी आढळून आली आहेत. त्यामध्ये १,२५४ अंडी सापडली आहेत. श्रीवर्धन किनाऱ्यावर कासवाच्या तीन घरट्यांचे संरक्षण करण्यात आले आहे. त्यामधील एका घरट्यामधून बाहेर पडलेल्या कासवाच्या ८३ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले असून प्रथमच एका घरट्याचे 'इन-सेटू' पद्धतीने संवर्धन करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. १४ मार्च रोजी हे घरटे किनाऱ्यावर भरती रेषेपासून दूर आढळ्याने त्याच ठिकाणी जाळीचे कुंपन लावून ते संरक्षित केल्याचे त्यांनी सांगितले. याच घरट्याच्या शेजारी एक्स-सेटू पद्धतीने १२८ अंडी असलेले घरटे संवर्धित केल्याचे कासवमित्र देवेन मयेकर यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@