नवी दिल्ली : राज्यसभेसाठी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे नामांकन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून दाखल करण्यात आले आहे. माजी सीजेआय गोगोई यांचा अयोध्या राम मंदिर सहीत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीत सहभाग होता. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित अशा अनेक खटल्यांना रंजन गोगोई यांनी निकालात काढले आहे.
सरकारने काढलेल्या अधिसूचनेत केलेल्या उल्लेखानुसार, 'भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ८० च्या खंड (३) सोबत पठित खंड (१) च्या उपखंड (क) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत राष्ट्रपती, एका नामित सदस्याच्या सेवानिवृत्तीच्या कारणानं रिक्त झालेली जागा भरण्यासाठी, राज्यसभेत श्री रंजन गोगोई यांना नामांकीत करत आहेत'.
३ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे ४६ वे सरन्यायाधीश पदाची जबाबदारी रंजन गोगोई यांनी स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ जवळपास १३ महिन्यांचा राहिला. गेल्या वर्षी ९ नोव्हेंबर रोजी त्यांनी राम मंदिरावर ऐतिहासिक निर्णय सुनावला होता. १६१ वर्षांपासून ज्यावर वाद सुरू होता त्या अयोध्येच्या रामजन्मभूमी वादावर सलग सुनावणी करत हे प्रकरण न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने निकालात काढले. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी रंजन गोगोई सेवेतून निवृत्त झाले होते.