सुप्रजा (भाग २८)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2020
Total Views |
supraja_1  H x



हल्लीच्या 'Multi-cuisine'च्या जमान्यात आयुर्वेदिक पथ्य सांगितले की, लोकांची/रुग्णांची भिन्नच प्रश्नावली समोर येते. तळलेलं खायचं नाही? तर सॅलडवर व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल चालेल का? पित्त होताना आंबट फळं नको म्हटली की, किवी चालेल का? असा प्रश्न येतो. तसेच मिरची-मसालेदार नको म्हटल्यावर Jalapeno/Capsicum इ. चालेल का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. आयुर्वेदात याच्यावर काय सांगितले आहे, ते आज आपण जाणून घेऊया.



भारताचा भौगोलिक विस्तार बघता कुठे बर्फाच्छादित प्रदेश आहे, तर कुठे वाळवंट. काही जागी सपाट जमीन, तर अन्य ठिकाणी डोंगर-दर्‍या. भौगोलिक प्रदेशानुसार तेथील ऋतुमान असते आणि त्यानुरूप धान्य, आहार इ. प्रत्येक व्यक्ती जिथे जन्माला येते, तो त्या व्यक्तीचा उत्पत्ती देश असतो. म्हणजे Conception जिथे झाले, जन्म जिथे झाला, आई-वडिलांचा उत्पत्ती देश या गोष्टींचा विचार करून त्याचा आहार (पथ्य) निश्चित करावे लागते. समुद्र किनार्‍याजवळील लोकांचे भात हे प्रमुख अन्न आहे. म्हणजे किनार्‍यालगत राहणार्‍यांना तो सहज पचतो. सहसा बाधत नाही. बंगालमध्ये तेथील स्थानिक रहिवाशांनी रोज भात आणि मासे खाल्ले तर ते त्यांना बाधत नाही. तसेच पंजाबमध्ये गव्हापासून बनवलेले विविध पराठे, लस्सी व राजस्थानमध्ये तुपात तळून केलेल्या पाककृती इ. सर्व त्या त्या प्रदेशात वास्तव्य करणार्‍या व्यक्तींना बाधत नाही. किंबहुना, त्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी त्या समान आहाराचीच गरज असते. दक्षिण भारतात इडली, डोसा, सांबार गरजेचा आहे. मध्य महाराष्ट्रात अतितेल व तिखट बाधत नाही. या सर्व उदाहरणांवरून दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात (१) जे जिथे पिकतं, ते तिथे सहज फक्त, तेच 'Staple Diet' आहे आणि (२) विविधता (अन्नातील, पोषाखातील शरीरयष्टीतील इ.) ही नैसर्गिकरित्या घडते. त्यात आपण खूप बदल करू नये.


पण, नोकरी-शिक्षण-व्यवसायासाठी आपला जन्म देश (उत्पत्ती झालेला प्रांत) सोडून इतर गावी जाऊन राहावे लागते. तिकडचे वातावरण, अन्नपदार्थ सगळेच भिन्न असतात. अशा वेळेस जन्म देशातील अन्न इतर प्रदेशी पचेलच असे नाही. ते बाधू शकते. जसा प्रदेश बदलतो, शरीरातील दोषांची स्थितीही बदलते. समुद्र किनारपट्टीवरील प्रदेशात खूप प्रखर थंडी वा बर्फ कधीच पडत नाही. तसेच खूप उकडतही नाही. पण, या प्रदेशात वातावरणातील आर्द्रता अधिक असल्याने घाम प्रचंड येतो. स्थानिक रहिवाशांनाही येतो आणि अन्य पर्यटक, अन्य प्रांतीय व्यक्तींनाही येतो. फरक एवढाच, स्थानिक व्यक्तींना त्याची सवय झाली असल्यामुळे त्रास वाटत नाही. अशा दमट वातावरणात ठराविक रोगही अधिक बळावतात. उदा. त्वचारोग (विशेषतः ज्यात खाज अधिक येते, लस वाहते, चिघळते अशा प्रकारचे त्वचारोग), दमा व अन्य श्वसनाचे त्रास इ. आम्लपित्त या प्रकारचे त्रास अधिक होतात.


पथ्य म्हणजे त्या व्यक्तीची प्रकृती, वातावरणाचा विचार, निरोगी/रोगी असल्यास व्याधीचा विचार- असे सगळे बघून, अभ्यासून तो रोग लवकर समूळ नष्ट व्हावा, यासाठी सांगितले गेलेले आहारीय तसेच विहारीय नियम निरोगी व्यक्तीमध्येही त्याच्या प्रकृतीनुरूप उत्तम आरोग्य टिकविण्यासाठी आहारीय व विहारीय नियम पाळल्यास रोग लगेच होत नाही. झाल्यास बळावत नाही. लवकर आटोक्यात येतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले, तर पथ्य पालनाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनशक्ती सुधारते. आपण ताजेतवाने बनतो आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे सुरू होते.


जेव्हा भारतातील विविध प्रांतातील आहार सर्व ठिकाणी, सगळ्या व्यक्तींना सात्म्य होत नाही, बांधू शकतात. तेथे 'Multi-cuisine'चे काय म्हणावे? त्या-त्या देशातील हवामान, अन्नधान्याची उपलब्धता, आहार तयार करण्याची पद्धत सर्वच भिन्न असते. ते तसेच्या तसे इतर प्रांतांत पचणार नाही. आहारातील प्रत्येक घटकाचे स्वत:चे असे गुणधर्म असतात. काही ’कॉम्बिनेशन्स’ एकत्र खाल्ल्यास ‘पूरक’ ठरतात, तर काही 'कॉम्बिनेशन्स’ ‘मारक’ ठरतात. ‘मारक’ म्हणजे केवळ मृत्यू ओढवणारे, असा अर्थ घेऊ नये. ‘मारक’ म्हणजे स्वास्थ्याचे हनन करणारे, निरोगी व्यक्तीला रोगी करणारे. उदाहरण बघूया. सर्दी-खोकला-दमा असलेल्या व्यक्तींनी केळी, सीताफळ, थंड पदार्थ खाणे, धुळीत फिरणे इ. आम्लपित्त होणार्‍या व्यक्तींनी चमचमीत तळलेल्या गोष्टी खाणे, मूळव्याधीचा त्रास होणार्‍या व्यक्तींनी मैद्याचे पदार्थ खाणे, शौचाचा वेग धरुन ठेवणे इ.


लहानपणापासूनच जर या सर्व गोष्टींचा विचार करून शिशूला आहार दिला गेला, तर त्याचे आरोग्य तर उत्तम राहीलच, पण त्याची बुद्धिमत्ताही तल्लख होईल. आहारातूनच शरीरघटक बनतात. आचार-विचार बनतात आणि प्रतिकारशक्तीही बनते. तेव्हा योग्य आहारनियमांचा दैनंदिन जीवनात पालन होणे अत्यावश्यक आहे.


विविध संसर्गजन्य आजारांपासून बचाव होण्यासाठी शारीरिक स्वच्छता, परिसर स्वच्छता तर गरजेचे आहेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती! केवळ हात सतत धुतल्याने आणि मास्क बांधल्याने (जसे हल्ली ‘कोरोना’पासून बचावासाठी करताना आढळतात) आजारापासून बचाव होणार नाही. या चांगल्या सवयींबरोबरच शरीर निरोगी आणि रोगप्रतिकारक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत घरचे ताजे जेवण खाणे हेच पथ्यकारक ठरेल. कच्चे खाणे टाळावे. केवळ शिजवलेले, वाफावलेले न खाता, जिरे-हिंग-हळद फोडणी साहित्य घालून तयार केलेली भाजी/कोशिंबीर/आमटी खावी. आलं-लसूण-सुंठ-मिरी-लवंग-दालचिनी इ. मसाल्यांचा वापर करावा. सर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. वापरलेले रुमाल (शेंबडाचे) किंवा टिश्यू यांची विल्हेवाट नीट लावावी. इथे-तिथेे टाकून देऊ नये. गरम पाण्याच्या (हळद आणि मीठ घालून) गुळण्या कराव्यात. हात गरम पाण्याने धुवावेत. तुरटीच्या पाण्याने हात धुतल्यासही निर्जंतुकीकरण उत्तम होते. तुळस, गवतीचहा, आलं, ज्येष्ठमध इ. चा वापर करून काढा घ्यावा. सर्दी पडसं असल्यास लवकर बरे वाटेल. नस्य (नाकात थेंब) करावे. घरात धूप करावा. (राळ-कपूर-गुळगुळ इ. घालून) शरीर-मन-परिसर स्वच्छ ठेवावे. सर्दी असल्यास निलगिरीचे थेंब रुमालावर घ्यावेत, पण हे सर्व उपचार करून आराम पडला नाही, तर तपासणी करून घ्यावी. दुर्लक्ष करू नये.


लहान मुले (वय वर्षे १२ पर्यंत) आधीच्या लेखांमधून सांगितल्याप्रमाणे अधिक नाजूक असतात. त्यामुळे ती लवकर आजारी पडू शकतात. त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते, तसेच वृद्धापकाळी गर्भवती अवस्थेतही रोगप्रतिकारशक्ती थोडी कमी होते. अशा सर्व व्यक्तींनी काळजी अवश्य घ्यावी. आयुर्वेदाने नेहमी ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्।’ म्हणजे स्वस्थ व्यक्तींच्या स्वास्थ्याचे रक्षण, जतन करणे, याला अधिक प्राधान्य दिले आहे.


पुढील लेखापासून आहारनियम, विविध पाककृती आणि त्यांचे गुणधर्म याबद्दल बघूया.
(क्रमश:)


- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@