‘सर सलामत तो पगडी पचास...’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2020
Total Views |

mental health_1 &nbs



जे आरोग्याचे विशेषतः मानसिक आरोग्याचे रोग टाळता येतील ते टाळावे. मेंदू आपल्या शरीरातील सर्वात मोठा महत्त्वाचा अवयव आहे. कोरोनासारख्या अनेक जंतूंमुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष का करायचे?



आपण मृत्यूला कधी कधी खूप घाबरतो
. तसे मृत्यूला कोण घाबरत नाही बरे! मृत्यूची अंधुकशी चाहूलसुद्धा मृत्यूहून भयंकर असावी. आपल्यापैकी बहुतेक जणांना मृत्यूविषयी बोलायलासुद्धा आवडत नाही. आपल्या जन्मानंतर एकमेव गोष्ट आपल्यात आयुष्यात खात्रीलायक घडणार असते ती म्हणजे मृत्यू. मृत्यू हा आपला ‘दी एन्ड’ आहे आणि त्यानंतर 'They lived happily everafter' म्हणजे चित्रपटातील शेवटानंतर ते आनंदात आणि सुखात राहिले, असे आपल्या आयुष्यातील ‘दी एन्ड’नंतर होत नाही. ‘मृत्यू’ या शब्दाभोवती एक विचित्र वलय आहे. त्यात भीतीचे वलय हे खूप थरारक आहे. आपण ‘मृत्यू’ या शब्दाचा साधा सहज म्हणून विचार करू शकत नाही. ज्यांनी मृत्यूविषयी भाष्य केले, ते अभ्यासक तरी होते किंवा अध्यात्मवादी होते. त्यांची चिंतनशीलता अगाध होती. मृत्यूचा सारासार किवा प्रगल्भ विचार करणे हे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. मृत्यूविषयी असे भयाण वा विदारक भीतीचे विचार मनात येणे साहजिक आहे, ते ‘नॉर्मल’ आहे. काहींना जरी मृत्यूनंतर काय होणार, याची भीती वाटली नाही तरी मृत्यूच्या अनुभवातून जाण्याची त्यांची तयारी नसते.


पण, मृत्यूबद्दल आपल्याला जी भीती वाटते ती जास्त काल्पनिक आणि अवास्तववादी असते. कारण, मृत्यूचा प्रत्यक्ष अनुभव तसा कुणालाच नाही. आधुनिक वैद्यकीय शास्त्रात ‘कोमा’तून बाहेर यशस्वीरित्या पडलेल्या लोकांना मृत्यूचा स्पर्श झाला होता, असे म्हणता येईल. धडधडीत व ठणठणीत असताना अचानक जीवावर बेतलेल्या अपघाताला सामोरे गेलेल्या लोकांना काही भयानक अशा मृत्युसदृश्य आठवणी असतात. त्यामुळेच भूकंपातून, जीवघेण्या पुरातून, कोसळलेल्या इमारतीमधून, वाहतूक अपघातातून बाहेर येणा
र्‍या व्यक्तींचा अनुभव मरणप्राय असतो. आपल्या समाजात आपण मृतव्यक्तीचे शरीर काही खूप प्रेमाने हाताळतो असे नाही. त्या मृतांच्या जीवलगांना शोक अनावर झालेला असतो, पण इतरांना त्यांना वैकुंठाला पोहोचवण्याची घाई झालेली असते. म्हणून सगळे कसे पटापट उरकले जाते. असो. मरणाची अनेक नैसर्गिक कारणे आहेत. त्यांची दफ्तरी नोंद झाल्यामुळे आपल्याला व्यवस्थित माहिती मिळते. यात मृत्यूचे, मृत्यूहून नावडते कारण म्हणजे आत्महत्या. मृत्यू जर उंबरठ्याबाहेर म्हटले, तर आत्महत्या गावच्या वेशीवर असते. इतका मोठा फरक मृत्यू आणि आत्महत्येत आहे.


आपण जगातली मृत्यूची कारणे पाहिली तर असे दिसून येते की, हृदयविकार आणि लकवा किंवा स्ट्रोक ही पहिली दोन कारणे आहेत. गेली १५ वर्षे ती त्याच क्रमवारीत आहेत. १७. दशलक्ष लोक या कारणांमुळे मरतात. दीर्घकालीन फुप्फुसाचे विकार व छातीतील जंतूचा प्रादुर्भाव त्याखालोखाल आहे. जगात ‘एचआयव्ही’ आता पहिल्या दहा कारणांमध्ये येत नाही, तर कॅन्सरने होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण वाढू लागले आहे. खरेतर जगात असंसर्गजन्य रोगांमुळे मरणार्‍यांची संख्या जवळजवळ ७३ टक्के आहे. संसर्गजन्य आजारांमुळे मरणार्‍यांची संख्या ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे. असंसर्गजन्य आजारात हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कॅन्सर या दीर्घकालीन आजारांचा समावेश केला जातो. भारतातसुद्धा असाच कल दिसतो. जसजसे जगण्याचे आयुर्मान वाढत गेले, तसतसे जीवनशैलीशी निगडित असंसर्गिक रोगांची संख्या व त्यामुळे होणारी वैद्यकीय गुंतागुंत वाढत गेली आहे.


आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशात संसर्गजन्य आजारानेआजही लोकांच्या मृत्यूला एक कारण दिले आहे, पण जागतिक आरोग्यात आता खूप फरक पडला आहे. संसर्गजन्य आजारांवर काबू मिळवला आहे, पण त्याचवेळी असंसर्गजन्य आजारांनी जोम धरला आहे, हीसुद्धा चिंतेची बाबच आहे. तंबाखू आणि धुम्रपान हेसुद्धा जगात अकाली मृत्यूचे अप्रत्यक्ष कारण आहे. कारण, ते असंसर्गजन्य विशेषत: कॅन्सर आणि हृदयरोगाचे महत्त्वाचे कारण आहे. आत्महत्या हे जगातले महत्त्वाचे मृत्यूचे कारण आहे. आठ दशलक्ष लोक दरवर्षी आत्महत्येने मरतात. ४० सेकंदाला एक आत्महत्या होत असते. जगातील आत्महत्येमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण खुनामुळे होणार्‍या मृत्यूच्या दुप्पट आहे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे जेवढे मृत्यू आत्महत्येमुळे होतात, त्याच्या आठ ते दहा टक्के लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. मानसिक आरोग्याच्या समस्येने आज जग भयग्रस्त झाले आहे. विकसनशील देशात याचे प्रमाण वाढते आहे. अमेरिकेत १९३. अब्ज डॉलर्स ( अब्ज म्हणजे १०० कोटी) गंभीर मानसिक आजारांवर खर्च होतात. त्यांचे २० टक्के लोक मानसिक आजारांमुळे बेघर आहेत. ७० टक्के टक्के बालगुन्हेगारांमध्ये मानसिक रोग दिसून आला आहे. तिकडे शाळेत जाणार्‍या मुलांमध्ये उदासीनतेची गंभीर लक्षणे दिसून आली आहेत, ज्यांना मानसिक रोगाने ग्रासले आहे. असे कित्येक तरुण बेकार आहेत. जवळजवळ २० टक्के प्रौढ लोकांना एखादे तरी महत्त्वाचे व्यसन आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य विखुरलेले आहे. ज्यांना उदासिनतेची लक्षणे आहेत. अशा ४० टक्के लोकांना हृदयरोग वा मधुमेहासारख्या गंभीर रोगांचा तडाखा बसलेला दिसतो.


अमेरिकेत त्यांच्या रुग्णालयात आठ रुग्णांतला एक रुग्ण ‘इमरजन्सी’ विभागात येतो. ‘डिप्रेशन’च्या आजारांमुळे ४७ वयाच्या खालील लोकांना रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागते. आणखी महत्त्वाची आकडेवारी सांगायची म्हटली तर इतर ‘स्पेशालिस्ट’कडे जाणार्‍या रुग्णांमध्ये ४० ते ८० टक्के रुग्णांना मानसिक आरोग्याची समस्या आढळली आहे. अमेरिका शास्त्रीयदृष्ट्या अतिशय प्रगत आहे म्हणून ही आकडेवारी व्यवस्थित आढळते. आपण आशिया खंडात त्याच मार्गावर कधीचेच चालू लागलो आहेत. पण, सध्या ‘कोरोना’ आपल्या मेंदूत शिरला आहे. अनारोग्याची घंटा खरेतर कधीपासून वाजत आहे, पण तिचा नाद आपल्याला कळत नाही. आरोग्याचा खरा शत्रू ओळखता आला तर आपण युद्ध पुकारू, पण आज थोडे ‘कोरोना’च्या नादाला जास्त लागलो आहोत का?


आज तीन दशकांमध्ये देशात वाढलेले आत्महत्येचे प्रमाण मला ‘कोरोना’पेक्षा कृपा करून ‘मरोना’ म्हणून सांगण्याचा सल्ला देते. आताच्या जीवनशैलीमुळे बिघडत जाणार्‍या आरोग्याला काहीबाही फास्ट फूड ‘खाओना’ म्हणून सांगण्यास उद्युक्त करते. थोडा व्यायाम आणि फिटनेसचे धडे ‘लेलोना’चा उपदेश घ्यायला भाग पाडते. रात्र रात्र जागून इंटरनेटच्या जगात जगून आपल्या तब्येतीचे बारा वाजविणार्‍यांना थोडा ‘सोजाना’ म्हणून कानमंत्र घ्यावयास सांगते. ‘मारो गोली ‘करोना’को.’ किती साथी आल्या आणि गेल्या आणि भविष्यातही येतील. काही ‘हायजीन’ पाळावे. डॉक्टरांचे ऐकावे. पण जे आरोग्याचे विशेषतः मानसिक आरोग्याचे रोग टाळता येतील ते टाळावे. मेंदू आपल्या शरीरातील सर्वात मोठा महत्त्वाचा अवयव आहे. कोरोनासारख्या अनेक जंतूंमुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष का करायचे? शेवटी सुंदर आयुष्य जगायचे म्हटले, तर कोरोनापेक्षा लक्षात ठेवा, ‘सर सलामत तो पगडी पचास...’

- डॉ. शुभांगी पारकर 

@@AUTHORINFO_V1@@