‘नमस्ते कोरोना’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2020   
Total Views |
corona saarc_1  




सध्या जगभर मानवी आयुष्याच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानीही आहे तो केवळ ‘कोरोना’ व्हायरस! चीनमध्ये उगम पावलेल्या या विषाणूने अल्पावधीत महामारीचे स्वरूप धारण केले. आज १३५ पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाने आपले हातपाय रोवले असून चीननंतर युरोपीय राष्ट्र आणि खासकरून इटलीमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. त्यामुळे विकसित देश असो, विकनसशील अथवा अविकसित राष्ट्र, कोरोनाने सगळ्यांनाच आपल्या कवेत घेतले. आज प्रत्येक देश आपापल्या पातळीवर कोरोनाशी लढाई करताना दिसतो. काही देशांना या लढाईत यश आले, तर काही देशांनी सुरुवातीला या महामारीला फारसे गांभीर्याने न घेतल्याने आज हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठल्याही खंडातला, कुठल्याही वातावरणातला देश असो, आज प्रत्येक देशाने कोरोनाचा धसका घेतलेला दिसतो. अमेरिकेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव इतका असूनही सरकारच्या निष्काळजीपणामुळे त्यात आणखी भर पडली. ट्रम्प यांच्याप्रमाणेच कदाचित अमेरिकन सरकारही कोरोना अमेरिकेचा उंबरठा ओलांडणार नाही, या गुर्मीत राहिले आणि आज परिणाम आपल्यासमोर आहेत. न्यूयॉर्कची शाळा-महाविद्यालये कालपरवा बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला. त्यामुळे एखादा देश केवळ ‘महासत्ता’ किंवा ‘विकसित’ देशाचा एरवी टेंभा मिरवत असला तरी याचाच अर्थ आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीचा तो अगदी नेटाने सामना करू शकलेच असे नाही, हे या घटनेवरून दिसून आले. चीनलाही कोरोनाचा अटकाव करायला विलंब लागलाच आणि त्याचे परिणाम आज अख्ख्या जगाला भोगावे लागताहेत.


आंतरराष्ट्रीय वातावरणात कोरोनाचा कहर कायम असताना भारताने मात्र अतिशय संयम आणि धैर्याने या परिस्थितीचा सामना केला. चीनमध्ये अडकलेले प्रवासी असो अथवा इराणमध्ये अडकून पडलेले मुस्लीम भाविक, भारत सरकारने तत्परता दाखवत या सर्व प्रवाशांना सुखरूप मायभूमीत परत आणले. इतकेच नाही तर इराणमध्ये अडकलेल्या भाविकांची कोरोनाची चाचणी करायलाही इराण सरकारने चक्क नकार दिला. त्यानंतर भारताने कोरोना चाचणी करणाऱ्या अख्ख्या प्रयोगशाळेसह तज्ज्ञांच्या टीमला इराणमध्ये त्वरेने धाडले आणि ती प्रयोगशाळा नंतर इराणलाच दान करून टाकली. ‘सार्क’ राष्ट्रप्रमुखांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची कल्पना मांडून त्याचे नेतृत्वही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवा केले. त्यामुळे भारत केवळ आपमतलबी नसून त्याला स्वत:बरोबर इतर देशांची, जगाचीही तितकीच चिंता आहे आणि हे कोरोनाचे सावट सर्व देशांच्या सामूहिक सहकार्यातून दूर होऊ शकते, याचा विश्वास मोदींनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून सर्वांसमक्ष मांडला, ज्याचे सार्क देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी एकमुखाने स्वागतही केले. कारण, चीन, अमेरिका अथवा कुठलाही युरोपीय देश नाही, तर भारतच आपल्याला या आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करू शकतो, हा संदेश यानिमित्ताने या देशांमध्येही पोहोचला. कारण, भारताला ‘महासत्ता’ म्हणून मिरवण्यात नाही, तर ‘विश्वगुरू’ म्हणून जगाची सेवा करण्याचा ध्यास आहे आणि तोच ध्यास मोदींच्या प्रयत्नांतून पुनश्च प्रतिबिंबितही झाला.


देशांतर्गत पातळीवर आज केंद्र आणि राज्य सरकारे कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज आहेत. भारताने आपल्या सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या आहेतच, पण विमानतळांवरही प्रत्येक प्रवाशाची आवर्जून तपासणी केली जाते. त्यामुळे कोरोनासंबंधी उपाययोजनांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत भारताने नक्कीच इतर देशांवर मात केली, असे म्हणायला हरकत नाही. साहजिकच, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. पुढील १०-१५ दिवस हे या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून घाबरून न जाता, खबरदारी आणि जबाबदारीने वागणे हेच आपणा नागरिकांचे कर्तव्य आहे.


इतर देशांएवढी भारतातील परिस्थिती निश्चितच गंभीर नसली तरी ते सर्वस्वी नागरिकांच्या वर्तनावर, सवयींवरच निर्भर करते. त्यामुळे उगाच अफवांना बळी न पडता, सरकारने, डॉक्टरांनी सांगितलेल्या उपाययोजनांचा तंतोतंत अवलंब केला, तर आपण या संकटातून लवकरच बाहेर पडू. त्यासाठीच फक्त ‘गो कोरोना गो’ म्हणून भागणार नाही, तर आता जगानेही अवलंबलेल्या ‘नमस्ते’ची कास धरायला हवी.
@@AUTHORINFO_V1@@