एक असेही आवाहन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2020   
Total Views |
ganpati idol_1  




सध्या जगभरात कोरोना विषाणूचे ओढवलेले संकट आणि त्यापासून बचावाचे मार्ग याबाबतच चर्चा सुरू आहे. यात नाशिक नगरी तरी मागे कशी राहील? विविध मंदिरे ही नाशिकच्या अनेकविध ओळखीपैकी एक महत्त्वाची ओळख. नाशिक नगरीत असलेल्या विविध मंदिरात रोज अनेक भाविक दर्शनार्थ येत असतात. त्यातील गंगापूर रोडवरील नवश्या गणपती व रविवार कारंजा परिसरातील चांदीचा गणपती हे तर भाविकांचे अढळ श्रद्धास्थान. त्यामुळे या मंदिरांच्या माध्यमातून होणारे आवाहन हे एकाच वेळी अनेक नागरिकापर्यंत पोहोचण्यास साहाय्यभूत ठरत असते. कोरोना विषाणूची दाहकता लक्षात घेता, या दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून करण्यात आलेले आगळेवेगळे आवाहन सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. येथील चांदीचा गणपती व नवश्या गणपती येथील विघ्नहर गणेशमूर्तीला व मूषकाला मास्क परिधान करण्यात आला आहे. त्यामुळे भाविक वर्गात व नागरिकांत कोरोना विषाणूपासून बचावासाठी योग्य आणि सकारात्मक संदेश पोहोचण्यास नक्कीच मदत होणार आहे. एखादे सर्वमान्य देवस्थान जेव्हा असा संदेश देते, तेव्हा त्यांचे आवाहन समाजात जागरुकता निर्माण करण्यास नक्कीच फायदेशीर ठरत असते. येथे अंधश्रद्धा हा विषयदेखील समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, हा श्रद्धा किंवा अंधश्रद्धा याच्याशी निगडित विषय नसून सामाजिक भान आणि जागरुकता याच्याशी निगडित विषय आहे, हे येथे आपण सर्वांनीच लक्षात घेणे आवश्यक आहे. येथे दर्शनार्थ दाखल होणार्‍या भाविकाच्या हातावर हॅण्ड सॅनिटायझर लावूनच त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. थंडीत गणपती आणि अन्य देवांना स्वेटर घालण्याचे प्रकार अनेक शहरात किंवा जिल्ह्यात आढळतात. परंतु, नाशिकमध्ये ‘कोरोना’ पासून बचाव करण्यासाठी चक्क विघ्नहर्त्या गणरायाच्या मुखाला मास्क लावण्यात आला असल्याने देवातील माणूस आणि माणसातील देव यांची प्रचिती येत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, तसेच वैयक्तिक स्वच्छता यावर भर द्यावा, यासाठीदेखील देवस्थाने प्रयत्नशील आहेत.


माणुसकी लोप पावू नये
कोणताही संसर्गजन्य आजार दाखल झाला की, त्यापासून बचावाचे विविध पर्याय बाजारात दाखल होत असतात. यात आपले हात धुवून घेण्यासाठी काही लोक हे संधी साधत बनावट मालाची विक्री करण्यास प्राधान्य देत आपल्यातील विकृत प्रवृत्तीचे दर्शन घडवित असतात. त्यामुळे अशा संकटकाळी तरी माणुसकी लोप पावली जाऊ नये, हीच अपेक्षा नागरिकांची असते. नाशिक शहरात सुदैवाने अद्याप तरी एकही करोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, नाशिकमध्ये नागरिक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देताना दिसून येत आहेत. त्यामुळे शहरात मास्क आणि निर्जंतुक द्रव्य (सॅनिटायझर) च्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. अशावेळी काही विक्रेते हे आपले हात ओले करण्यासठी बनावट सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देत असल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. औषध प्रशासनाकडून केमिस्ट- ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून केवळ परवानाधारक उच्च प्रतीच्या सॅनिटायझरची विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात अद्याप तीन ठिकाणांहून अशा प्रकारच्या निकृष्ट बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात भरारी पथकांना यश आले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील ग्राहक हा सजग आणि शिक्षित असतो. त्यामुळे या नराधमांनी आपले जाळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विस्तारणे सुरू केल्याचे दिसून येत आहे. यासाठी दलालांची टोळी कार्यरत असल्याची माहितीदेखील समोर येत आहे. हे दलाल औषधविक्रेत्यांना कमी किमतीत अधिक नफ्याचे आमिष दाखवत निकृष्ट दर्जाचे सॅनिटायझर विक्रीस उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे काही मेडिकल दुकानात उच्च प्रतीऐवजी निम्नप्रतीचे सॅनिटायझर विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न नक्कीच ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारची विक्री करू नये, तसेच यावर उपाययोजना केली जावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष घालून आहेतच. मात्र, आपण माणूस म्हणून आपल्याच बांधवांच्या जीवाशी खेळत आहोत, तेही काही तुटपुंज्या रकमेसाठी, याची जाणीव या महाभागांनी ठेवणे आवश्यक आहे. असा प्रकार करणे म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्या प्रकारापेक्षा काही वेगळा आहे काय? याचे भान या निमित्ताने बाळगणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकांनीदेखील सजगता बाळगत बिल घेऊनच सॅनिटायझरची खरेदी करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.

@@AUTHORINFO_V1@@