आपल्या बळे नाही मी बोलत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2020   
Total Views |
vijay rathore_1 &nbs



तांड्यावरचे उनाड आणि तितकेच उजाड आयुष्य जगणारे विजय राठोड! पण, विजय यांनी त्या जगण्याचे रडणे कधीच बनवले नाही, तर ते स्वकर्तृत्वाने समाज आणि देशहित साधण्याचे कार्य ते करीत आहेत.


यवतमाळचा दहेली बंजारा तांडा. बंजारा समाजाचे एक गावच ते. साधारण ४७ वर्षांपूर्वीची गोष्ट. तांड्यात फकिरा आणि झामरीबाई राठोड हे दाम्पत्य राहत होते. त्यांना पाच मुले. फकिरा जंगलात झाडं तोडायचे. मजुरीचे काम करायचे, तर आईही मजुरीचे काम करायची. पण, हे काम कधीतरीच मिळे. इतर वेळी मग फकिरा दारू गाळण्याचे काम करीत. तांड्यातले बहुतेक जण हे काम करत. महिना, १५ दिवसांनी पोलीस यायचे आणि घरातून फकिरांना उचलून न्यायचे, मारायचे आणि दोन-तीन दिवसांनी सोडून द्यायचे. त्यावेळी सगळे राठोड कुटुंब खोपट्यात गपचूप रडत बसे. त्या फकिरा आणि झामरीबाईंचा मुलगा विजय. याच परिस्थितीमध्ये विजय वाढत होते. दोन-दोन दिवस उपाशी राहणे, पोलिसांनी घरावर धाडी टाकणे या अशा परिस्थितीमध्येही आईवडिलांनी मुलांवर संस्कार केले. सदैव आनंदी राहा, रडतगाणे गाऊन परिस्थिती बदलणार नाही. जे आहे त्याला तोंड द्या, याची शिकवण दिली.


या सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये विजय यांना शाळेमध्ये काय तो विसावा मिळे. आपणही शिक्षक व्हावे, मुलांना शिकवावे असे त्यांना त्यावेळी वाटे. पुढे दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण झाले. दहावी उत्तीर्ण झाले आणि वडिलांनी सांगितले, “आता शिक्षण बास्स! शेळ्या-मेंढ्या चरायला न्या. तू काही टाटा-बिर्लाचा पोर नाहीस.” मात्र, विजय यांनी शिक्षणाचा हट्ट कायम ठेवला. त्यासाठी वडिलांचा खरपूस मारही खाल्ला.


असो, पुढे विजय पांढरकवडा येथे महाविद्यालयात जाऊ लागले. शनिवार-रविवार ते मजुरी करत, शेळ्या-मेंढ्या चरायला नेण्याची कामे करून पैसे साठवून ते शिकू लागले. महाविद्यालयाचे जग वेगळेच होते. विजय हे फाटक्या हाफपॅण्टमध्ये आणि अनवाणी पायाने. एकदा वर्गातील मुले महाविद्यालयात जात असताना विजय त्यांच्या बरोबर चालू लागले. मुलं म्हणाली, “अरे, तू मागून ये! आमच्यासोबत नको येऊस. तू असा फाटका.” आणि मुलं अक्षरश: त्यांच्यापासून दूर चालू लागली. रणरणतं ऊन, कोवळं वय... विजय यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. लिंबाच्या झाडाच्या सावलीत बसून ते रडले. मात्र, दु:खाच्या भरात रानाच्या वाटेने ते महाविद्यालयात गेले, तेही सगळ्यांच्या आधी!


पुढे कला शाखेचे शिक्षण ते वसतिगृहामध्ये राहून घेऊ लागले. पण, काही कारणास्तव दुसर्‍या वर्षी त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक आणि साहित्यिक रमाकांत कोलते यांनी त्यांना मदतीचा हात दिला. त्यांना राहण्याची आणि इतर दैनंदिन गरजेची सोय केली. त्याचवेळी विजय यांची भेट रा. स्व. संघाच्या सुखदेव ढवळे यांच्याशी झाली. ते महाविद्यालयामध्ये ‘साहित्यशास्त्र’ शिकवत. त्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर विजय यांना व्यक्त होण्याची संधी दिली. हेतू हाच की, विजय यांच्यातील कलागुण बाहेर यावेत. त्यांनी महाविद्यालयात, समाजात धाडसाने यश गाठावे. प्रत्येक क्षणी सुखदेव ढवळे यांनी विजय यांना पालकासारखी सोबत केली. सुखदेव ढवळे यांच्यामुळे विजय रा. स्व. संघाच्या शाखेत गेले. विजय म्हणतात, “रा. स्व. संघाची शाखा परिस आहे. मी तिथे गेलो आणि आयुष्यच बदलले. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि त्यांनी समाज आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी कार्य करणे गरजेचे आहे, जे काही करेन त्यात समाजाचे भले असलेच पाहिजे, हा मंत्र मी जगू लागलो.”


असो, रमाकांत कोलते आणि सुखदेव ढवळे यांच्याबद्दल बोलताना विजय राठोड यांचा स्वर दाटून येतो. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते महाविद्यालयामध्ये शिकवू लागले. पण, कायमस्वरूपी नोकरी नव्हती. पुढे नागपूरच्या आर. एस. मुंडले धरमपेठ, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, नागपूर येथे त्यांना कायमस्वरूपी नोकरी लागली. तेथेच तत्कालीन रा. स्व. संघाचे क्षेत्र प्रचारक रवी जोशी यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने विजय यांच्या कार्यक्षेत्राचा सामाजिक पसारा वाढला. डॉ. तुकाराम राठोड यांनी त्यांना ‘ऑल इंडिया बंजारा सेवा संघ संघटने’साठी काम करण्याची संधी दिली. याच काळात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती पुणे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. विजय यांची बोलीभाषा मराठी नसून बंजारा असली तरी मराठी भाषेचे ते प्राध्यापक असून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे ‘संत नामदेव यांच्या प्रभावळीतील इतर संतांच्या अभंगांचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधन करत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी ‘बंजारा समाज इतिहास, वास्तव, प्रश्न’ वगैरे आयाम घेऊन कित्येक प्रबंध लिहिले आहेत. ते आकाशवाणीवर नैमित्तिक उद्घोषक म्हणून कामही करतात.


तांड्यातला एक गरीब मुलगा, ज्याचे लहानपण वंचितपणाच्या काळोखातच गेले, दारू गाळणे, गुरे-मेंढ्या राखणे यापलीकडे विश्व नव्हते, ते विजय राठोड आज साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवत आहेत. मात्र, यावर विजय यांचे म्हणणे आहे की,


आपल्या बळे नाही मी बोलत
सखा भगवंत वाचा त्याची


अर्थात की, मी आयुष्यात जे काही मिळवले ती भगवंताची कृपा आहे.

विजय यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारांचा प्रभाव आहे. समाजात समरसता निर्माण व्हावी, सगळ्या समाजाने एक होऊन प्रगती करावी, हेच विजय यांचे ध्येय आहे, लक्ष्य आहे. हे लक्ष्य सिद्धीस नेण्यासाठी विजय म्हणतात,

माझिया जातीचा मज भेटो कोणी
आवडीचा धनी भेटावया ।


“इथे ‘जात’ म्हणजे तथाकथित ‘जात’ नाही, तर समाज-देशप्रेमी असणारे निष्ठावान. “असे समविचारी लोक भेटले, तर देशसेवा करण्याचे भाग्यरूपी धन नक्कीच प्राप्त होईल,” असे विजय म्हणतात.


@@AUTHORINFO_V1@@