गरीबांना मदत करावीच लागते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2020   
Total Views |

Uddhav-Ajit _1  




उद्धव सरकार आता आमदारांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी ३० लाखांचे कर्ज देणार आहे. हे कर्ज मिळाले की, मग आमदार गाड्या घेतील. त्या गाड्या घेतल्या की, मगच आमदार त्यांच्या मतदारसंघात काम करू शकतात. त्याशिवाय का कुठे काम होते? काय म्हणता? महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा आणि एकंदर गरीबांचा प्रश्न बिकट झाला आहे? अहो, मग त्यासाठी तर आमदारांना गाडी हवी. अशी लाखाची गाडी घेऊन ते उभं पीक जळालेल्या शेतकर्‍याला भेटायला जातील, भाकरीसाठी आसुसलेल्या गरीबाच्या झोपडीसमोर गाडी उभी करतील. आता हे विचारू नका की, उभं पीक जळून आयुष्य वैराण झालेल्या शेतकर्‍याला आणि दोनवेळच्या भाकरीची चिंता असणार्‍या गरीबाला आमदाराच्या गाडीचा उपयोग काय? हा प्रश्न अजिबात उपस्थित करू नका. महाविकास आघाडीचे सरकार एकत्र आले, तेच मुळी सगळ्यांचा विकास करण्यासाठी. शेतकर्‍यांना, गरीबांना आधीच्या सरकारने म्हणजे त्या भाजपवाल्यांनी खूप काही दिले. बिचार्‍या आमदारांचा कुणी विचार केला का? आमदार खुश राहिले तर ते जनतेला खुश ठेवतील ना? त्यामुळे असा साधकबाधक विचार करून आमदारांचा हा जीवनमरणाचा प्रश्न सरकारने सोडवला आहे. काय म्हणता, बहुतेक आमदार श्रीमंत आहेत, गाडी घेण्याची ऐपत नाही असे होऊच शकत नाही. कारण गेली कित्येक दशके भावी पंतप्रधान आणि थोडे भावी राष्ट्रपती असलेले बारामतीचे काका किती वर्षे राजकारणात आहेत सांगा? राजकारणाच्या सगळ्या पायर्‍या काकांनी यशस्वीपणे पार केल्या. मुख्यमंत्री पण झाले, पण इतके वर्षे राजकारण करून त्यांच्याकडे फक्त २९ हजार रुपयांची मालमत्ता आहे. लोक उगीच त्यांच्या नावावर लवासा, बीसीसीआयचे अध्यक्षपद आणि काय काय नाव घेऊन आरोप करतात. ती सगळी पदे ती सगळी मालमत्ता त्यांची नाही. ते तर मोहमयी दुनियापासून अलिप्त असलेले अवलिया आहेत. मौलवी नाही काही. नाही तर तुम्हाला मौलवी ऐकायला यायचे. तर असो, मुद्दा असा होता की, काकांसारख्या व्यक्तींची संपत्ती इतकी कमी असेल, तर बाकीच्या आमदारांची संपत्तीही अशीच थातुरमातुर असेल. यामुळेच तर गरीब आमदारांसाठी हे सगळे केले. करावेच लागते.

 

धिक्कार आणि तीव्र निषेध

 
 

हिंदू धर्माला, त्यातील श्रद्धास्थानांना, त्यातही देवादिकांना, सणांना आणि विशेषतः जातीने ब्राह्मण असणार्‍यांना शिव्या दिल्या की, आपण ब्राह्मणेतर समाजाचे नेते झालो, अशी घाणेरडी मानसिकता असलेले लोक आहेत. याचे सगळ्यात घाणेरडे उदाहरण म्हणजे काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत. नितीन राऊत म्हणाले की, "जे स्वतः परदेशातून आले ते बामण आम्हाला अक्कल शिकवतील काय?" आता यामध्ये ब्राह्मण काय किंवा कुणीही कुणाला उगीच अक्कल शिकवू नये, ही गोष्ट मान्यच आहे. पण ब्राह्मण परदेशातून आले, ते बाहेरून आले हे सांगताना नितीन राऊत यांची मानसिकता, वैचारिकता कोणता फुटीरतावाद पेरत आहेत? नितीन राऊत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन सत्तेच्या पायर्‍या चढले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसंपदा राऊत यांना माहिती आहे का? त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हू व्हेअर शुद्राज’ पुस्तक वाचले आहे का? या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी, "भारत देशात कुणीही बाहेरून आलेले नाही. सर्व या भारतमातेचेच वंशज आहेत," असे ठामपणे प्रतिपादित केले आहे. बाबासाहेब म्हणतात, "आर्य भारतात बाहेरून आले, हा सिद्धांत सापाला ठेचल्याप्रमाणे ठेचून मारला पाहिजे. बाहेरून आर्यांनी भारतावर आक्रमण केल्याचा कणाइतकाही पुरावा ऋग्वेदामध्ये सापडत नाही. पाश्चिमात्यांनी उभा केलेला हा आर्य वंश सिद्धांत प्रत्येक पातळीवर पराभूत होतो, हे निर्विवाद सत्य आहे." थोडक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी देशाची एकात्मता अबाधित राहण्यासाठी कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भारतातील सर्वच समाजगट मूलतः भारतीय आहेत. परदेशी नाहीत. मग, नितीन राऊत यांना ही माहिती कुठून मिळाली की, ब्राह्मण परदेशी आहेत? अर्थात इथे ब्राह्मणांऐवजी इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त, विशेष वर्ग यांसाठी जरी नितीन राऊत यांनी हे समाजगट भारतीय नसून परदेशातून आले आहेत, असे उद्गार काढले असते तरी त्यांना हाच प्रश्न विचारला असता की, हा शोध कुठून काढला? उचलली जीभ लावली टाळ्याला, हा सत्ता स्वार्थाचा बिनअकलेचा धंदा असला तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना हरताळ फासून देशात, समाजाला गटातटात विभागणार्‍या नितीन राऊत यांचा निषेध...!




@@AUTHORINFO_V1@@