कल्याण डोंबिवली पालिकेतील १८ गावांची स्वतंत्र नगरपरीषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2020
Total Views |
KDMC _1  H x W:
 
 
 
 
 

मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा : उर्वरित ९ गावे शहरीकरणामुळे महानगरपालिकेतच

 
 
कल्याण : कित्येक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची मागणी स्थानिकांकडून होत होती. अखेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषदेची घोषणा विधानसभेत केली. उर्वरित ९ गावे हि शहरीकरण झालेली असल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतच राहणार आहेत.
 
 
 
१४ मे २०१५ च्या अधिसुचनेन्वये २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बृहत नागरीक्षेत्रात १ जून २०१५ पासून समावेश केला होता. या २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याबाबत या २७ गावांची सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती, सर्वपक्षीय युवा मोर्चा तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती. यालाच अनुसरून कल्याण-डोंबिवली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातून २७ गावे वगळून या गावांच्या क्षेत्राकरिता नगरपरिषद घटीत करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने ७ सप्टेंबर २०१५ रोजी प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या अधिसुचनेच्या अनुषंगाने प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना कळविण्यात आले.
 
 
 
त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी त्यांच्याकडे प्राप्त सूचना व हरकतींवर ११ व १२ मार्च २०२० रोजी सुनावणी घेऊन त्यांचा अहवाल शासनास सादर केला. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचा अहवाल विचारात घेता, कल्याण-डोंबिवली महानगरपलिकेतील २७ गावांपैकी बहुतांश शीळ-कल्याण रस्त्याचे पश्चिमेस असणाच्या ९ गावांचे (आजदे, सागाव, नांदविली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा) मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले असल्यामुळे ही गावे महानगरपालिके मध्ये कायम ठेवून, उर्वरित १८ गावे (घेसर, हेद्टणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे) महानगरपालिकेमधून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली आहे.
 
 
 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर २७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेची अर्धी लढाई जिंकलो तर अर्धी लढाई हरलो असून महानगरपालिकेतून न वगळलेली ९ गावे देखील स्वतंत्र नगरपरिषदेत समाविष्ठ करण्यासाठी लढाई कायम ठेवणार असून हि गावे पालिकेतून वगळण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया २७ गाव सर्वपक्षीय युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी दिली आहे.
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@