काशीतील मंदिर-मशीद वादाची सुनावणी स्थगित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2020
Total Views |
High Court Alahabad _1&nb
 
 


अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रयागराज : काशीतील प्रसिद्ध विश्वनाथ मंदिर-मशीद वादाप्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली सुनावणी वाराणसी न्यायालयाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही सुनावणी पुन्हा एकदा स्थगित करण्याचा निर्णय नुकताच घेतला.
 
 
काशीतील ज्ञानवापी मशीद ही विश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त करून बांधण्यात आली, असा दावा एका याचिकेद्वारे १९९१ साली दाखल करण्यात आला होता. त्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने १३ ऑक्टोबर, १९९८ रोजी अंतरिम स्थगिती देऊन सुनावणी रोखली होती. सर्वोच्च न्यायालयाने ’एशियन रिसरफेसिंग रोड वि. सीबीआय,’ या याचिकेवर सुनावणी करताना स्थगिती दिलेल्या सर्व याचिकांवर पुन्हा सुनावणी सहा महिन्यानंतर घेतली जावी, अशा स्वरूपाचा आदेश दिला होता.
 
 
त्यानुसार मंदिर विश्वस्तांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. ४ फेब्रुवारी, २०२० रोजी वाराणसी दिवाणी न्यायालयाने सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. अंजुमन इंतेझामिया मस्जिदीने दिवाणी न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुन्हा स्थगितीचे आदेश २६ फेब्रुवारी रोजी दिले आहेत.
 
 
मुघल बादशाह औरंगजेबाने १६६४ साली विश्वनाथाचे मंदिर पाडून तिथे मशीद बांधली होती. त्यानुषंगाने १९९१ साली मंदिर विश्वस्तांच्या वतीने हा मूळ दावा दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही अलाहाबाद उच्च न्यायालयानेच संबंधित सुनावणीवर अंतरिम स्थगिती दिली होती. अंजुमन इंतेजामिया यांच्या वतीने ’संबंधित वादाचा निर्णय दिवाणी न्यायालयाकडून केला जाऊ शकत नाही,’ असा दावा अलाहाबाद उच्च न्यायालयात केला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९९८ साली दिवाणी खटल्यावरील सुनावणीला स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशान्वये सुनावणी सुरू होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, उच्च न्यायालयाने पुन्हा स्थगिती देऊन हा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.
@@AUTHORINFO_V1@@