लोकमान्य टिळकांच्या समाजसुधारणेबद्दलच्या भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2020
Total Views |


lokmanya tilak_1 &nb


वेदोक्त प्रकरणाचा वाद पूर्वीच्या छत्रपतींनी बंद केलेले विधी पुन्हा सुरु करण्याबद्दलचा वाद होता. तो महाराजांच्या क्षत्रीयत्वाबद्दलचा नव्हता आणि त्यांचे वेदोक्ताचे अधिकार कुणीही अमान्य केले नाहीत. वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांच्या विरुद्ध भूमिका घेण्याचे टिळकांना काही कारण नव्हते, टिळक या प्रकरणात महाराजांच्या बाजूचेच होते. प्रायश्चित्ताबद्दल हट्ट धरू नये असे त्यांचे मत होते. "काळ बदलला आहे, जुने हट्ट सोडा," असे टिळक म्हणत होते. त्यामुळे आजच्या काळात यावरून निरर्थक वाद उकरून काढण्यापेक्षा स्वतःला 'जाणते' समजणार्‍यांनी तरी पूर्वग्रह मोडून वस्तुस्थिती समजून घ्यायला काय हरकत आहे?


लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती यांच्या संबंधात कडवटपणा आला, त्यासाठी 'वेदोक्त प्रकरण' विशेष चर्चिले जाते. यात लोकमान्यांनी शाहू छत्रपतींचा वेदोक्ताचा अधिकार नाकारणार्या ब्राह्मणांची बाजू घेतली असे म्हटले जाते आणि टिळकांवर आक्षेप घेतला जातो. प्रस्तुत प्रकरणाचे विवेचन करताना या 'वेदोक्त प्रकरणा'चे साक्षीदार खुद्द बाळशास्त्री खुपेरकर यांनी केलेल्या लेखनाचा आधार घेतला आहे. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरात जी १६ शास्त्री घराणी होती, त्यांच्यापैकी एका घराण्यात या बाळशास्त्री खुपेरकर यांचा जन्म झाला होता. 'वेदोक्ता'च्या वादाच्या वेळी त्यांचे वय २२-२३ वर्षांचे असावे. शाहू महाराज खुद्द त्यांच्याहून अवघ्या चार-पाच वर्षांनी मोठे होते. या प्रकरणाची विस्तृत चर्चा ग. रं. भिडे यांनीही केली आहे. त्यांच्या एका ग्रंथावरूनही यातील नेमके सत्य काय हे जाणून घेता येते. आता या प्रकरणातील प्रत्यक्ष घटनाक्रम पाहूया. शाहू महाराजांच्या बहुतांश चरित्रकारांनी असेच लिहून ठेवले आहे की, शाहू महाराज कार्तिकस्नानासाठी नदीवर गेले आणि तेव्हा एका ब्राह्मणाने त्यांच्यावर वेदोक्त मंत्रपूर्वक संस्कार करण्यास नकार दिला. बाळाचार्य यांनी मात्र यांनी आठवणीत लिहिले आहे, "शाहू महाराजांचे कार्तिकस्नान या वादाच्या वेळी नव्या राजवाड्यावरच होत असे. स्नानासाठी ते पंचगंगा नदीवर गेले होते वगैरे सर्वच खोटे आहे. ज्या ब्राह्मणाने 'शुद्राला मंत्र सांगायला अंघोळ कशाला करायला पाहिजे?' हे सांगितले ते चुकीचे होते." पण, तो भटजी स्वतः असे महाराजांना म्हणाला का? याचे नकारार्थी उत्तर सापडते. हुजर्‍या त्याला शोधण्यासाठी गेल्यानंतर त्याला भटजी म्हणाला, 'शुद्राला मंत्र सांगायला अंघोळ कशाला करायला लागते' आणि नंतर हुजर्‍याने महाराजांना ही गोष्ट येऊन सांगितली. महाराजांना हे समजल्यावर त्यांनी त्या भटजीला चाबकाने फोडून काढले. दुर्दैवाने हे सत्य सांगितले जात नाही. 'तो भटजी बाहेरख्याली होता,' असे सांगून त्याची यथेच्छ निंदा केलेली आहे. "पुढे झाल्या प्रकाराबद्दल महाराजांनी त्याला शिक्षा केली आणि त्याबद्दल आम्हाला सर्वांना बरे वाटले," असेही खुपरेकर म्हणतात. महाराज म्हणाले, "आम्ही श्रद्धेने तुम्हाला नमस्कार करतो आणि तुम्ही असले आचरण ठेवून वर गाढवासारखे बडबडता..." हे अगदी योग्यच आहे, असे सांगून खुपरेकर यांनी समस्त ब्राह्मण वर्गाबद्दल काय सांगितले ते फार मोलाचे हे, ते लिहितात, "ब्राह्मणांनी आपले चारित्र्य निर्मळ ठेवलेच पाहिजे, धर्मकृत्य करणार्‍यांनी तर निष्कलंकच राहिले पाहिजे. राजोपाध्यांना हे कळल्यावर त्यांनी त्या भटजीची नेमणूक लगेचेच रद्द केली." यावरून ब्राह्मणांची त्यांच्या चुकीची पाठराखण कुणीही करत नव्हते असेच स्पष्ट होते.

 

बाळशास्त्री यांनी लिहिले आहे, "महाराजांबरोबर भटजीने वाद घातला वगैरे लिहितात ते सर्व खोटे. महाराजांसमोर वाह्यातपणे बोलण्याची कुणाचीही ताकद नव्हती." शाहू हे साधेसुधे नव्हते, ते महाराज होते, त्यांच्यासमोर असे बोलण्याची कुणाची हिंमत होईल का? एक साधा ब्राह्मण खुद्द शाहू महाराजांना त्यांच्या तोंडावर वेडेवाकडे बोलतो हे चित्र रंगवून इतर चरित्रकार काय साध्य करतात कोण जाणे? याने उलट शाहूंच्या कर्तृत्वाला आपण कमीपणा आणतो, हे लक्षात येत नाही का? झाल्या प्रकारानंतर १९०१ साली पुन्हा एकदा आपले सर्व विधी वेदोक्त पद्धतीने व्हावे, असे शाहूंना वाटले आणि मुख्य राजोपाध्यांना पुन्हा एकदा वेदोक्त पद्धतीने विधी सुरू करण्याचे सांगितले. त्यावर राजोपाध्यांनी वेळ मागून घेतला आणि इतर ब्राह्मणांशी चर्चा करून कळवतो असे सांगितले, तेवढ्यात कोल्हापुरात बाहेर कुजबुज सुरू झाली आणि बाहेरच्या ब्रह्मवृंदांनी याला विरोध सुरू केला. "तरी मी इतर ठिकाणच्या पंडितांकडून तसा निर्णय घेऊन येतो, त्यानंतर आपण निर्णय करू," असे राजोपाध्यांनी कळवले. महाराजांना ते नको होते. उलट काही दिवसांनी राजोपाध्यांना त्यांच्या कामावरून काढून टाकण्यात आले. राजोपाध्ये वेदोक्त विधी करण्यास तयार असताना त्यांना काढून टाकण्याचे काहीच कारण नव्हते. मध्यंतरीच्या काळात कुणीतरी महाराजांचे याबद्दल कान फुंकले हे मात्र नक्की. विधी बंद पडले असल्याने प्रायश्चित घेऊन ते पुन्हा सुरू करावेत, असा त्यांचा आग्रह इतर ब्राह्मणांचा होता. शाहू महाराजांनी जर ते घेतले असते तर पुढे वाद वाढलाच नसता. दरम्यानच्या काळात महाराज लंडनला गेल्यावर भास्करराव जाधव यांनी महाराजांच्या अपरोक्ष न घेता ब्राह्मणांची वतने, त्यांच्या जमिनी जप्त केल्या, त्यांच्या दक्षिणा बंद केल्या, सुमारे एक हजार ब्राह्मणांची उत्पन्ने जप्त केली आणि यामुळे वाद आणखीन वाढला आणि न्यायालयापर्यंत गेला. शाहू महाराजांच्या संस्थानचा अंतर्गत वाद ब्रिटिशांना सोडवण्याची वेळ येते हे पाहून त्यानंतर टिळक या वादात पडले, तोवर याबद्दल टिळकांनी काहीही लिहिलेले नाही, याची नोंद घ्यायला हवी आणि आता तर शाहू सोडून इतर सर्व मराठ्यांना वेदोक्ताचे अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी खासेराव जाधव आणि इतर सत्यशोधकांनी सुरू केलेली होती आणि हे टिळकांच्या कानावर आल्यानंतर टिळकांनी यावर लेखन सुरू केले. शाहूंच्या वेदोक्त अधिकाराबद्दल टिळकांना कधीही विरोध दाखवण्याचे कारण नव्हते. टिळकांना तोवर या वादाची फारशी कल्पनाही नव्हती.

 

टिळकांनी आपण या वादात का पडत आहोत याबद्दल सुरुवातीच्या लेखातच भूमिका स्पष्ट केली आहे, ते लिहितात, "...कोल्हापूरच्या संस्थानचे अधिपती राजा या नात्याने आपणाकडे असलेल्या धर्माच्या बाबतीत तिर्हाइटपणाचा अधिकार विसरून जाऊन जेव्हा एका विवक्षित ज्ञातीचे पुरस्कर्ते बनतात, इतकेच नव्हे तर त्यांच्या खुलास पाठबळ देऊन परधर्मी सार्वभौम राजाकडे आपल्या संस्थानातील प्रजेस धाव घेण्यास लावतात तेव्हा या संबंधाने दोन शब्द लिहिणे जरूर होते." त्यानुसार टिळकांनी या वादात दोन लेख लिहिले आणि दरम्यानच्या काळात 'केसरी'त या प्रकरणाबद्दल काही आक्षेपांना उत्तरे दिली. शेवटच्या लेखात तर टिळकांनी स्पष्टच लिहिले आहे, "मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे. त्यांचा हात धरणारा या काळात कुणीही राहिला नाही. पण, अमक्या ब्राह्मणाने तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणार नाही... निरनिराळ्या ज्ञातीतील लोकांचा सलोखा कसा व्हावा हे आम्हास पाहणे आहे व तसा दृष्टीनेच या विषयावरील लेख आम्ही लिहिले आहेत." इथेही स्पष्ट होते की सगळ्याचं जातींना मग ते मराठे असोत किंवा इतर माळी, मांग, सुतार अगदी ख्रिश्चन आणि मुसलमानांनाही वेदोक्ताचे अधिकार द्या ना? त्याने धर्माचे काय बिघडते? अशी मागणी जाधव आणि इतर सत्यशोधकांकडून केली जात होती. त्याला टिळकांचा सौम्य विरोध होता, जो की त्यांच्या समाजसुधारणेच्या धोरणाला अनुसरूनच होता. तरीही "मराठा जातीला वेदोक्त संस्कार करायचे असतील तर खुशाल करावेत," असे टिळकांनी म्हटले आहेच. टिळकांनी शाहूंना किंवा शाहूंच्या वेदोक्ताबद्दल कुठेही विरोध केलेला नाही. राजोपाध्यांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्याला कधीही विरोध केला नाही, याचेही अनेक पुरावे आहेत. महाराज स्वतः गायत्री मंत्र म्हणत, त्यांना 'श्रावणी' करण्याचा अधिकार होता, ('श्रावणी' म्हणजे नवे यज्ञोपवित धारण करणे) म्हणजे आपले वेदोक्ताचे अधिकार कुणीही नाकारले नाहीत हे शाहू महाराजांना चांगलेच माहीत होते. खुपरेकर लिहितात, "महाराज श्रावणी करीत. मी त्यांच्या समोरच्या रांगेत पाच-सहा फुटांवर बसत असे. वेदोक्ताचा अधिकार असलेलेच 'श्रावणी' करतात. काही वेदोक्त विधी पूर्वीच्या छत्रपतींनी बंद केले होते. ते पुन्हा सुरू करण्याबद्दलचा हा वाद होता. महाराजांच्या क्षत्रियत्वाबद्दलचा नव्हता. त्यांच्या वेदोक्ताच्या अधिकाराबद्दलचा नव्हता. ब्राह्मण-क्षत्रियादी वर्णाची वर्णातील व्यक्तीची औरस मुले त्या त्या वर्णाचीच मानली जात आणि त्या त्या वर्णाची विहित धार्मिक कृत्ये करण्याचे अधिकार धर्मशास्त्राने त्यांना दिलेले आहेत." तत्कालीन ब्राह्मणांनी सगळे विधी वैदिक पद्धतीने करण्याला नकार दिला, असे कुठेही लिहिलेले नाही. चिरोलच्या पुस्तकातसुद्धा काही काहीसे विधी (at certain religious ceremonies) असाच उल्लेख आहे, सगळे नाही. बाळाशस्त्री यांनी सांगितलेला पुढील अभिप्राय फार महत्त्वाचा वाटतो. वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांच्या विरुद्ध भूमिका घेण्याचे टिळकांना काही कारण नव्हते आणि माझ्या आठवणीप्रमाणे टिळक या प्रकरणात महाराजांच्या बाजूचेच होते. प्रायश्चित्ताबद्दल हट्ट धरू नये, असे त्यांचे मत होते. "काळ बदलला आहे, जुने हट्ट सोडा," असे टिळक म्हणत. मात्र, त्याबद्दल उघडपणे जोरात भांडत नसत. तसे त्यांनी केले असते तर जुन्या प्रवृत्तीत वाढलेला समाज त्यांच्या विरुद्ध गेला असता व त्यांना काहीच कार्य करता आले नसते. शाहूमहाराज राजे असल्याने त्यांचे कोण काय वाकडे करणार होते, हेही खरेच नाही का.

 

या प्रकरणात टिळक प्रचंड सावध होते, असे दिसते. आपल्या वक्तव्यांचा विपर्यास केला जाईल, या संभाव्य धोक्याची त्यानाही पुरेपूर कल्पना होती. त्यांनी ५ नोव्हेंबर १९०१च्या 'केसरी'त आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. टिळक लिहितात, "कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा. उगाच ज्ञातीज्ञातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयांवरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारून भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही. एखाद्या ज्ञातीस आपला गृह्यव्यवहार बदलणे असल्यास तो ज्ञातीच्या अनुषंगाने खुशाल बदलावा. परंतु, त्याकरिता दुसर्‍या जातीवर जुलूम करणे अथवा ज्या धार्मिक संस्था आज हजारो वर्षे चालत आलेल्या आहेत, त्यात अधिकाराच्या जोरावर बिघाड करणे अन्यायाचे आहे." याचा अर्थ असाच की, टिळक स्वतः कुठल्याही जातीला वेदोक्त संस्कारापासून रोखून धरत नाहीत. त्यांचा इतकाच आहे की, कुठलाही राजा आपल्या सत्तेच्या जोरावर आपल्या प्रजेतील एका जातीच्या जमिनी जप्त करून त्यांच्यावर जुलूम करू शकत नाही. दुर्दैवाने सत्यशोधकांनी या प्रकरणाला जातीय रंग दिल्याने वाद न्यायालयात गेला आणि ब्रिटिश हस्तक्षेप वाढला. कोल्हापुरातील ब्राह्मण ज्या क्रांतिकारकांच्या चळवळीत जास्तीत जास्त प्रमाणात होते, त्यांचा बिमोड ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे ब्रिटिशांनी शाहू महाराजांच्या हातून करून घेतला आणि नावारूपाला आलेला क्रांतिकारकांचा शिवाजी क्लब बंद करावा लागला. त्यामुळे उगाच विनाराकरण मराठे-ब्राह्मण वाद वाढला, दरी आणखीन रुंदावली. जाता जाता या प्रकरणावर कायमचा पडदा पडेल असा पुरावा सांगतो. चिरोलच्या पुस्तकाबद्दल जेव्हा टिळकांनी त्याच्या विरुद्ध खटला भरला, त्यावेळी चिरोलचे साक्षीदार म्हणून या सगळ्या वादात कळीचे नारद असलेले, ज्यांनी अनाठायी हा वाद वाढवला ते शाहू महाराजांचे रेव्हिन्यू ऑफिसर भास्करराव जाधव आणि त्या पुस्तकाचे भाषांतरकार डोंगरे यांच्या साक्षी झाल्या. तेव्हा त्या दोघांनीही न्यायालयात कबूल केले की टिळकांनी वेदोक्त संबंधात शाहू महराजांना कधीही विरोध केला नाही. डोंगरे यांनी आपल्या साक्षीत सांगितले, "वेदोक्त प्रकरणात व्यक्तिशः छत्रपती सरकारविरुद्ध टिळकांनी लिहिल्याचे मला दाखवता येणार नाही. किंबहुना शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकार आहे असेच टिळक म्हणत होते असे मला वाटते!" सुधारणेच्या बाबतीत त्यांचे धोरण 'आस्ते कदम' होते हे सर्वांनाच ठाऊक आहे. 'विध्वंसक सुधारणावादी' होण्यापेक्षा 'विधायक सुधारणावादी' होण्याकडे टिळकांचा कल होता, हे पटवून घ्यायला हवे.(क्रमश:)


- पार्थ बावस्कर

 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@