नवी दिल्ली : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करणाऱ्या केंद्र सरकारने आज मोठी घोषणा केली. कोरोना विषाणूची लागण झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत देण्याचे पाऊल आज केंद्र सरकारने उचलले आहे. या बरोबरच कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या तसेच कोरोनाविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्यांनाही ही मदत दिली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे.
करोना राष्ट्रीय आपत्ती
याबरोबरच, केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या भारतातील उद्रेकाला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. या मुळे देशातील सर्व राज्यांमधील सरकारे आता करोनाशी लढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषातून (एसडीआरएफ) मदत मिळवू शकतात असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांमधून प्रवास केलेल्यांना विलग करण्यात यावे, अशी सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. या सूचनेनुसार, या सात देशांतून आलेल्या व येणाऱ्या प्रवाशांचे १०० टक्के विलगीकरण करण्यात येत आहे. या देशातून १५ फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहेत, त्यांना सक्तीने १४ दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.