सामाजिक परिवर्तनासाठी १५ लाख स्वयंसेवकांना संघ सक्रिय करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2020
Total Views |


RSS_1  H x W: 0




बंगळुरू : "गेल्या काही काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वेळेची उपलब्धता, आवड व क्षमता या अनुषंगाने स्वयंसेवकांचे सर्वेक्षण केले आहे. याबाबत तीसहून अधिक वयाच्या १५ लाख स्वयंसेवकांशी चर्चा झाली आहे. या सर्व स्वयंसेवकांनी समाजात सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी आणि समाजाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, याबाबत संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत चर्चा होणार आहे," अशी माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी येथे दिली. संघाची अ. भा. प्रतिनिधी सभा येत्या १५ ते १७ मार्च या काळात चेन्ननहळ्ळी येथील जनसेवा विद्या केंद्र येथे संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अ. भा. सह प्रचार प्रमुख नरेंद्रकुमार आणि दक्षिण-मध्य क्षेत्र कार्यवाह तिप्पेस्वामी हेही उपस्थित होते.

 
 

अखिल भारतीय प्रतिनिधी सभा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षभरातील उपक्रमांतील महत्त्वाचा भाग आहे. ही बैठक वर्षातून एकदा होते. या बैठकीत समकालीन विषयांवर चर्चा केली जाते. त्याचप्रमाणे प्रतिनिधी या बैठकीत विविध विषय उपस्थित करू शकतात. यावेळी ‘सीएए’वर तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते, असेही अरुणकुमार म्हणाले. या प्रतिनिधी सभेचे उद्घाटन येत्या १५ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. अरुणकुमार म्हणाले की, या बैठकीत मागील वर्षात झालेल्या सर्व कार्याची समीक्षा आणि आगामी वर्षातील सर्व योजनांवर चर्चा केली जाईल. यांसह विविध प्रांतांचे, संघटनांचे प्रतिनिधी आपले कार्य आणि अनुभव मांडतील. १४ मार्च रोजी अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रतिनिधी सभेच्या बैठकीतील चर्चेचे विषय आणि प्रस्ताव निश्चित केले जातील. कार्यकारी मंडळाच्या बैठकीस प्रांत आणि क्षेत्र स्तरावरील मा. संघचालक, कार्यवाह, प्रचारक आणि अखिल भारतीय कार्यकारिणीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. बैठकीत आगामी वर्षात आयोजित केले जाणारे संघ शिक्षा वर्ग, कार्यक्रम यावर चर्चा केली जाईल. अखिल भारतीय अधिकाऱ्यांचे वर्षभरातील प्रवास निश्चित केले जातील.

 
 

या प्रतिनिधी सभेत १५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यात संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य, देशातील ४४ प्रांतांचे प्रतिनिधी, विशेष निमंत्रित सदस्य, राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्या आदींचा समावेश आहे. यासह अन्य संबंधित ३५ संघटनांचे अध्यक्ष आणि महासचिव, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष न्या. कोकजे, विहिंप कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अध्यक्ष सुबय्या शण्मुगम, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष साजी नारायण, विद्याभारतीचे अध्यक्ष रामकृष्ण राव, वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष जगदेव उरांव, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, सक्षमचे अध्यक्ष दयालसिंह पवार आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या अखेरच्या दिवशी अर्थात १७ मार्च रोजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील निर्णय आणि संमत झालेल्या प्रस्तावांबाबत विस्तृत माहिती देणार असल्याचेही अरुणकुमार यांनी सांगितले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@