
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चे अध्यक्ष परवेझ आणि सचिव इलियास यांना अटक केली आहे. शाहीन बागेत सुरू असलेल्या निदर्शनांचा आणि पीएफआयच्या संबंधांचा तपास सध्या दिल्ली पोलिसांचे विशेष पथक करत आहे. या पथकाने दोघांना अटक केली आहे. इलियास हा दिल्लीतील शिव विहार परिसरातील आहे.निदर्शनांदरम्यान आंदोलकांना पैसे दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) परवेझ अहमदवरची ही विचारपूस करत आहे. हे दोन्ही अटक पीएफआय सदस्य दानिशच्या अटकेनंतर आणि दिल्ली दंगलीतील तपासादरम्यान प्राप्त निवेदनानंतर ताब्यात घेण्यात आले आहेत. पीएफआय आणि शाहिन बाग यांच्यात पोलिसांना एक समान धागा सापडला असून यावर दिल्ली पोलिस पत्रकार परिषद घेणार आहेत.
पीएफआयच्या ७३ बँक खात्यात १२० कोटी जमा
मिळालेल्या माहितीनुसार पीएफआयद्वारे संचालित ७३ बँक खात्यांमध्ये १२० .५ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी बरीच रोख रक्कम आहे. परवेझ अहमद हे भीम आर्मी टॉप-१०० , युनिफिकेशन ऑफ मुस्लिम लीडरशिप अशा अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपचा भाग असल्याचेही समजते.
पीएफआयवर आधीच शंका होती
पोलिसांना आधीपासूनच पीएफआयवर संशय आहे. परंतु पोलिस काही भक्कम पुरावे जमा करत होते. आता, पोलिस या प्रकरणात नेमके काय धागे मिळाले आहेत हे लोकांना सांगू शकतात.तसेच पीएफआयने शाहिन बागेचा पीएफआयशी संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे. दिल्ली हिंसाचारानंतरच इंटेलिजन्स एजन्सीने पीएफआयसह तीन संस्थांवर शंका उपस्थित केली होती.