'पॉवरलिफ्टिंग'चा नवतारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2020
Total Views |


nilesh garate_1 &nbs


जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पॉवरलिफ्टिंगमध्ये नाव कमविणाऱ्या निलेश गराटेला नुकतेच 'शिवछत्रपती पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने निलेशच्या यशाच्या या खडतर आणि संघर्षमय प्रवासाची ही कहाणी...


'प्रयत्ने वाळूचे, कण रगडीता तेलही गळे' या उक्तीप्रमाणे जिद्द मनाशी बाळगणाऱ्या कोणाही माणसाला कोणतीही कठीण परिस्थिती हरवू शकत नाही. आपले ध्येय साध्य करताना माणूस पडेल ते कष्ट उपसतो, मात्र आपले ध्येय पूर्ण करतो. असाच जिद्द आणि परिस्थितीशी दोन हात करत क्रीडाजगतात आपले नाव कोरणारा निलेश गराटे. काही वर्षांपूर्वी कोणी निलेशच्या आजच्या यशाविषयी विचारही केला नसेल. कारण, त्याने अगदी 'अशक्यातून शक्य' असे यश साध्य केले आहे. निलेश बालपणापासूनच भांडूपमध्ये राहणारा. घरी वडील आणि मोठा भाऊ. आई काही वर्षांपूर्वीच वारल्याने घरातील सर्व कामे या तिघांनी वाटून घेतलेली. घरी सामान्य परिस्थिती. यात निलेशला पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात करिअर करायचे होते. निलेशला याची अगदी लहानपणापासूनच आवड असल्याने या क्रीडा प्रकारात आपल्या देशाचे नाव मोठे करण्याचे त्याने ठरविले होते. तसे पाहाता, त्याच्यासाठी ही गोष्ट मिळविणे फारच अवघड होते. कारण, या खेळासाठी खेळाडूंना आपले शरीर व्यायामातून तंदुरुस्त ठेवावे लागते. या खेळाच्या तयारीसाठी लागणारा सर्व खर्च कसा भागवायचा, हा निलेशसमोर मोठा प्रश्न होता. पण, यासाठी निलेशने स्वत:च मेहनत करण्याचे ठरविले. निलेशने नोकरी करून आपले करिअर बनविले आहे. यासाठी त्याने खूप कष्ट केले. आपली मेहनत सुरूच ठेवली.

 

२०१०च्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तो सहभागी झाला होता. यात त्याचा चौथा क्रमांक आला. ही स्पर्धाच त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरली. या स्पर्धेतील यशाने त्याने आणखी मेहनत करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक पदकांची कमाई केली. यानंतर २०१९ मध्ये निलेशची जयपूर येथील आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निलेश प्रथमच भाग घेत होता. यासाठी त्याच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हते. मात्र, स्पर्धेत सहभाग घेऊन त्याला भारताचे नाव मोठे करायचे होते. यासाठी त्याला मोठी रक्कम जमा करायची होती. या रकमेसाठी निलेशला खूप कष्ट करावे लागले. यासाठी त्याची मित्रमंडळी आणि भांडूपमधील काही राजकीय नेत्यांनी मदत केली. या स्पर्धेत निलेशने कांस्यपदक मिळवून भांडूपचे नाव मोठे केले. या यशामुळे भांडूपकरांना निलेशची नव्याने ओळख झाली. यानंतर मात्र निलेशने मागे वळून पाहिले नाही. २०१८ मध्ये हाँगकाँग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्याला नववे स्थान मिळाले. २०१९ मध्ये दुबईला जाऊन आल्यानंतर २०२० मध्ये तो इंडोनेशिया येथे स्पर्धेसाठी जाणार आहे. तो यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असून त्याला देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे आहे.

 

या सर्वांमध्ये निलेशला त्याच्या परिवाराकडून खूप आधार मिळाला. त्याने नोकरी करून या खेळातही मिळविलेल्या यशाचे सगळ्यांनाच कौतुक आहे. आज निलेश भांडूपमधील अनेक तरुणांचा आदर्श असून त्याच्या या कामगिरीमुळे अनेक तरुण क्रीडाक्षेत्राकडे वळले आहेत. या तरुणांना निलेश आपल्या अनुभवातून प्रेरणा देत असतो. शिवाय तो या मुलांना आपल्या मार्गदर्शनातून चांगली कामगिरी करण्याविषयी प्रोत्साहनही देतो. यामुळे भांडूपमध्ये निलेशचे सर्वत्रच कौतुक केले जाते. "ज्यांना आपल्या आयुष्यात काही ध्येय साध्य करायचे असते, तो माणूस नेहमीच त्यासाठी मेहनत घेतो. या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही, जी माणूस मेहनतीने साध्य करू शकत नाही. अनेक तरुणांनी यात आपले करिअर करून देशाचे नाव मोठे करावे," असे निलेश म्हणतो. विशेष म्हणजे यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा क्रीडाक्षेत्रातील 'शिवछत्रपती पुरस्कार' निलेशला मिळाला आहे. हा पुरस्कार निलेशच्या कष्टाचे चीज आहे. या पुरस्कारामुळे निलेशने आपल्या परिवाराचे नाव मोठे केले आहे. या पुरस्कारानंतर इतरही अनेक ठिकाणी निलेशचा सन्मान करण्यात आला. या अभूतपूर्व यशानंतरही निलेश आपले पाय जमिनीवर रोवून आहे. त्याला कोणताही गर्व नाही. कारण, निलेशला आपण कोणत्या प्रतिकूल परिस्थितीतून हे यश मिळविले आहे, याची जाणीव आहे. आज निलेश भांडूपमधील अनेक सर्वसामान्य मुलांसाठी 'रोल मॉडेल' आहे. त्याच्याकडे बघून अनेकांना आपणही हे सर्व मिळवू शकतो, असा आत्मविश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांत अजून निलेश नक्की तयार होतील, यात शंकाच नाही. निलेशला त्याच्या पुढील कामगिरीसाठी दै. 'मुंबई तरुण भारत'कडून अनेक शुभेच्छा!

 
 

- कविता भोसले

 
@@AUTHORINFO_V1@@