उद्योगक्षेत्रातील 'सावित्रीच्या लेकी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2020   
Total Views |


ssd_1  H x W: 0


कोमलचे वडील ती आठवीत शिकत असतानाच गेले. मात्र, ती खचली नाही. जिद्दीने शिकली. दर्शनाचं जगच वेगळं. सर्जनशीलता जणू तिच्या रक्तात म्हणून कोणत्याही संस्थेला ती चेहरा देते. कोमल बदलापूरची, दर्शना विक्रोळीची. या दोघी एकमेकींना कधीही भेटल्या नाहीत. दुरान्वयेही एकमेकींचा संबंध नाही. तरीपण त्या दोघींमधला समान दुवा म्हणजे त्या दोघी युवा उद्योजिका आहेत. त्यांनी आपल्या पालकांना मुलाच्या कर्तृत्वाचे किंबहुना त्यापेक्षा जास्त सुख दिले आहे. नव्या भारतातील नव्या विचारसरणीला अनुसरून त्यांनी नोकरीचा पारंपरिक विचार झुगारून आज स्वत:च्या पायावर त्या उभ्या आहेत. खऱ्या अर्थाने त्या उद्योगक्षेत्रातील सावित्रीच्या लेकी आहेत.


मधुकर सुर्वे पुण्याहून मुंबईला आले. खिशात होते फक्त ५ रुपये. पडेल ती कामे केली. पण त्यांच्यातील चांगुलपणामुळे त्यांना महानगरपालिकेत नोकरी मिळाली. पत्नी माधुरी, कोमल आणि हेमलता या दोन मुली. छान संसार चालू होता. कोमल आठवीत असतानाच मधुकर यांना मूत्रपिंडविकाराचं निदान झालं आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. कोमलच्या आईला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. कोमल दहावीपर्यंत गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये शिकली. त्यानंतर आई आणि बहिणीसह ती बदलापूरला आली. तिथल्याच एका महाविद्यालयात बी.कॉम. झाली. शिकत असताना घराला आर्थिक हातभार लागावा म्हणून एका वृत्तसंस्थेत ती कामाला लागली. भाषेवरची पकड आणि सादरीकरण पाहून तिला थेट वृत्तनिवेदनाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, अभ्यासामुळे काही दिवसांतच तिला ती नोकरी सोडावी लागली. कोमलला खरंतर स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय अधिकारी व्हायचं होतं. स्पर्धा परीक्षेसोबत कोमलने बँकिंगच्या परीक्षा द्याव्यात, जेणेकरून तिला एखाद्या बँकेत पटकन नोकरी मिळेल आणि तिचा आर्थिक भार काहीसा सैल होईल, या विचाराने एका क्लाससंचालकाने तिला सायंकाळच्या वेळेत विनामूल्य बँकिंग परीक्षेच्या शिकवणीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यामुळे संध्याकाळच्या कामाचा बोजा आईवरच येईल, या काळजीने ती शिकवणीला गेली नाही. परंतु, आपण असं काहीतरी काम करावं, जेणेकरून घरी चार पैसे पण देता येईल आणि आईच्या कामाचा भार पण हलका होईल, या विचाराने तिने महिलांचे तयार कपडे विकण्यास सुरुवात केली. पाच हजार रुपयांचं सामान आणलं. कोणीच ओळखीचं नसल्याने विकणार कोणाला हा मोठाच प्रश्न होता. मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये तिने हे कपडे विकणे सुरू केले.

 

तब्बल चार महिन्यांनंतर तिने सर्व कपडे विकले. दरम्यान, ती एका बँकेत नोकरीस लागली. याच कालावधीत सकाळी लोकलच्या प्रचंड गर्दीच्या वेळेस बदलापूरला एका खांबाला कोमल घासली गेली. दैव बलवत्तर म्हणून ती अगदी थोडक्यात बचावली. मात्र मुका मार विलक्षण लागला होता. जीव तर अर्धमेलाच झाला होता. प्रचंड वेदना होत होत्या. पण, स्वस्थ बसून चालणार नव्हतं. जरा बरी झाल्यावर तिने परत कामाला सुरुवात केली. कोमलच्या काकांचा म्हणजे मावशीच्या पतींचा येवल्यात साड्यांचा कारखाना आहे. त्यांनी त्या साड्या विक्रीसाठी कोमलला विचारणा केली. गेल्यावर्षीपासून 'मधू क्रिएशन' नावाने कोमल साडीविक्रीचा व्यवसाय करत आहे. अवघ्या आठ महिन्यांत तिने ३०० हून अधिक साड्या विकल्या आहेत. निव्वळ महाराष्ट्रच नव्हे, तर अगदी कर्नाटक ते थेट अमेरिकेत कोमलच्या साड्या पोहोचल्या आहेत. कोमलने तिच्या माध्यमातून आणखी १० महिलांना रोजगार दिला आहे. या महिला त्यांच्या वर्तुळात कोमलच्या माध्यमातून साड्यांचा व्यवसाय करत आहेत. अल्पावधीतच कोमलने साडीच्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविलेला आहे. आपल्या पित्याच्या, मधुकर यांच्या नावाने सुरू झालेल्या, 'मधू क्रिएशन'ची ही तर सुरुवात आहे. येत्या काही वर्षांत मुंबईतील दादर परिसरात तीन मजली 'मधू क्रिएशन'चं शोरूम उभारण्याचा कोमलचा मानस आहे.

 

सर्जनशीलतेच्या क्षेत्रात वावरणारी अशीच एक अवलिया म्हणजे दर्शना धनवडे. 'देवजी मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्स'ची संचालिका. तिचे वडील दीपक धनवडे उत्तम वादक आहेत. वाद्यवृंद समूहाला ते साथ देतात. ज्योती धनवडे आणि दीपक धनवडे या दाम्पत्याची दर्शना एकुलती एक कन्या. मात्र, मुलाप्रमाणे त्यांनी तिला वाढविले. शालेय शिक्षण सेंट जोसेफ विद्यालयातून झाल्यावर एका संस्थेतून तिने अॅनिमेशन आणि ग्राफिक्सचा तीन वर्षांचा डिप्लोमा केला. यानंतर एका जाहिरात कंपनीत तब्बल आठ वर्षे तिने नोकरी केली. मुळातच सर्जनशील असल्याने विविध कलाप्रकार दर्शनाने हाताळले. त्यातला 'दिग्दर्शन' हा तिचा आवडता कलाप्रकार. अनेक लघुपटांचे दिग्दर्शन तिने केले. 'फ्लेम इन दी डार्क' या लघुपटाला 'एम अ‍ॅव्हेन्यूज ऑफ इंटरनॅशनल मीडिया' हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला. कवी चंद्रहास रहाटे यांच्या स्वरचित कवितेवरील 'समबडी कुणीतरी प्रेम करावं' या गाण्याला 'बेस्ट पिक्चरायझेशन' हा नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार मिळाला.

  

दर्शनाच्या आईचे वडील, देवजी गणपत मालगुंडकर त्या काळातील एक प्रथितयश उद्योजक. कास्टिंगचा त्यांचा व्यवसाय होता. आपल्या आजोबांना उद्योगातला आदर्श मानून दर्शनाने त्यांच्याच नावाने 'देवजी मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन' ही संस्था सुरू केली. डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ, व्हीएफएफ, ग्राफिक डिझायनिंग, वेबसाईट डेव्हलपिंग यासारख्या सेवा 'देवजी' देते. होम डेकोरेशन, रिअल इस्टेट, फूड इंडस्ट्री, सौंदर्यप्रसाधने क्षेत्रातील अनेक संस्थांना 'देवजी' उत्तम सेवा देत आहे. 'देवजी' उभी करण्यासाठी दर्शनाला तिचे वडील दीपक, आई ज्योती आणि स्वत: उद्योजक असलेला भावी पती योगेश त्र्यंबक म्हात्रे यांनी भरघोस पाठिंबा दिला. याच पाठिंब्याच्या जोरावर दर्शनाची 'देवजी' भरधाव वेगाने दौडत आहे. नवीन काळातील उत्तम जाहिरात संस्था म्हणून अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दर्शनाला नुकताच 'मेड इन इंडिया आयकॉन' पुरस्कार मिळाला आहे. कोमल आणि दर्शना या उद्योगक्षेत्रातील खऱ्या अर्थाने आजच्या काळातील सावित्रीच्या लेकी आहेत. 'मुलगी शिकली, प्रगती झाली' यामध्ये आता 'मुलगी शिकली, प्रगती झाली, उद्योजिका बनली' असा विस्तार करावा लागेल. कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे, 'पाठीवर फक्त हात ठेऊन लढ' म्हटल्यास त्या नक्की दशदिशा गाजवतील, यांत शंका नाही.

 
 
@@AUTHORINFO_V1@@