क्षितिजाच्या व्याप्तीची पदचिन्हे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2020
Total Views |


Jyotiraditya Scindia_1&nb

 


ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये कसे आले, त्यापेक्षा महत्त्वाचे आहे, ते का आले?


क्षितिज म्हणजे काय आणि त्याची व्याप्ती नेमकी किती, असा प्रश्न कुणालाही सहज पडू शकतो. मात्र, क्षितिजापर्यंत पोहोचण्याची अदम्य आकांक्षा कुठल्याही कर्तृत्ववान माणसाला सतत अस्वस्थ करीत असते आणि अगदी राजकारणही याला अपवाद नाही. खरं तर ते असूही शकत नाही. कारण, जय-पराजयाच्या लढाईतले 'राजकारण' हे एक महत्त्वाचे माध्यम. हा सारा तपशील मांडण्याचे कारण म्हणजे, मध्य प्रदेशात रंगलेले सत्तानाट्य आणि देशभर त्याचे उमटणारे तरंग. दोन खासदारांवरून देशाचा पंतप्रधान संपूर्ण बहुमताच्या आधारावर प्रस्थापित करणारा राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. आज देशाच्या राजकारणाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जाते. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राचे स्वत:चे म्हणून एक पर्यावरण असते, पर्यावरणीय अन्नसाखळ्या जशा परस्परांवर अवलंबून असतात, तशाच प्रत्येक क्षेत्राचे स्वत:चे म्हणून एक वर्तुळ असते. या वर्तुळातल्या अवकाशाचे हिस्सेदार जर तुम्हाला त्या वतुर्र्ळात मानत असतील, तरच तुम्ही त्या वर्तुळाचे सर्वमान्य घटक होता. आज भारतीय जनता पक्ष या स्थितीला जाऊन पोहोचला आहे. 'संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेला पक्ष' ते 'समाजाच्या केंद्रस्थानी येऊन पोहोचलेला पक्ष' असा हा प्रवास. ज्योतिरादित्य शिंदे हे नाव गेली सात आठ वर्षे काहीसे झाकोळलेले. मात्र, आता अचानक ते चर्चेत आले आहेत, ते भारतीय जनता पक्षातल्या त्यांच्या प्रवेशामुळे आणि मध्य प्रदेशातले सरकार पडण्याच्या प्रक्रियेला झालेल्या सुरुवातीमुळे. राजकारणात असे पक्षप्रवेश आणि त्यातून घडणाऱ्या राजकीय घडामोडी या देशाला तशा नव्या नाहीत. काँग्रेसच्या पन्नास वर्षांहून अधिक काळातल्या राजवटीत अशा अनेक गोष्टी घडतच आलेल्या आहेत.

 
 

भाजपलाही अन्य पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्या लोकांच्या पक्षप्रवेशाची नवता राहिलेली नाही. किंबहुना, भाजपवर वर्षानुवर्षे प्रेम करणाऱ्यांमधल्या एका वर्गात तर याबाबत चिंताही आहे. राजकारण हा रजोगुणांचा खेळ. ते असेच चालत राहाते. अनेक नगरसेवक, आमदार, खासदार आज भाजपच्या छत्राखाली येऊन स्थिरावले आहेत. त्यात लढायला उभे राहिलेले 'मावळे' कोण आणि उडून जाणारे 'कावळे' कोण, हा येणाऱ्या काळातला प्रश्न आहे. त्यांच्या निष्ठांचे पोलाद परिस्थितीच्या ऐरणीवरच सिद्ध होईल. आता मुद्दा असा की, मग ज्योतिरादित्यांचा पक्षप्रवेश वेगळा कसा ठरतो? माधवरावांचे चिरंजीव, राजमातांचे नातू ही त्यांची ओळख. काँग्रेसच्या तिकिटावर आपल्या वडिलांचा वारसा चालविणारे पुत्र आणि शिंदे परिवाराचे वंशज. महाराष्ट्रात छत्रपतींच्या वंशजांचे जे स्थान, तेच स्थान शिंदेंच्या वंशजांना मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये आहे. इंदौर, ग्वाल्हेर यांसारख्या शहरांमध्ये लोकसेवेसाठी या कुटुंबाने उभ्या केलेल्या वास्तू आजही त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. आणीबाणीनंतर आणि त्याच काळात या दोन कुटुंबीयांमध्ये दोन पाती तयार झाल्या. राजमाता शिंदे या भाजपमध्ये आणि माधवराव शिंदे काँग्रेसमध्ये असे चित्र अनेक वर्षे या राज्यामध्ये पाहायला मिळाले. मध्य प्रदेशच्या जनतेने हे चित्र जसे आहे तसे स्वीकारले आणि दोन्ही पक्षांचे अस्तित्व, त्यांच्या क्षमता आणि कुवतीनुसार कायम ठेवले. ज्योतिरादित्यांचा भाजपप्रवेश यासाठी महत्त्वाचा आहे. सत्तेचे वाटे पडतात, तेव्हा 'संख्याबळ' हा वाटा मिळविण्यातला महत्त्वाचा घटक असतो. यात शिंदे काय मिळवितात आणि कसे मिळवितात, हा मुद्दा गौण आहे. 'शिंद्यांच्या जमिनी किती, तर त्या खुद्द शिंद्यांनाही माहीत नाहीत,' अशी एक खेडवळ दंतकथा महाराष्ट्रात सांगितली जाते. जमिनींच्या बाबतीत अजून एका नेत्याचे नाव महाराष्ट्रात तितक्याच चवीने घेतले जाते, पण तो आजच्या अग्रलेखाचा विषय नाही. त्यामुळे ज्योतिरादित्य या सगळ्यासाठी भाजपमध्ये नक्कीच आलेले नाही. दोन्ही पक्षांना पुनित करणारा हा वंशवृक्ष आज पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकला आहे, याची कारणमीमांसा झालीच पाहिजे.

 
 

देशात आणि पर्यायाने महाराष्ट्रात असा एक काळ होता, जेव्हा काँग्रेस हाच सर्व प्रकारच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचा पक्ष होता. समाजासाठी काही करायचे असेल, तर लोक काँग्रेसचाच पर्याय निवडत असत. ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात कितीतरी नावे आज अशी आहेत, ज्यांच्या मागच्या पिढीतले कोणी ना कोणी काँग्रेसशी संबंधित होते. बिर्ला, बजाज हीदेखील अशीच काही नावे. मात्र, आज त्याच काँग्रेसचा र्‍हास का झाला आहे? 'न फिरविल्यामुळे'ची थिअरी सांगणारे शरद पवार स्वत:च्या पक्षाचे नेतृत्व काही केल्या कुटुंबीयांच्या पलीकडे अन्य कुणाच्याही हातात द्यायला तयार नाहीत. पुन्हा तेच करणाऱ्या काँग्रेसच्या आधारावर सरकारे बनविण्याच्या त्यांच्या उचापतीही थांबलेल्या नाहीत. ज्योतिरादित्यांना आज भाजपमध्ये यावेसे वाटते, ते अशा लोकांमुळेच. राहुल गांधींशिवाय पर्याय नाही, भले काँग्र्रेसचे बारा वाजोत. खरं तर दिल्लीतला काँग्रेसचा प्रभाव हा काही असा तसा नाही. शीला दीक्षितांच्या रूपाने काँग्रेसने सलग दहा वर्षे दिल्लीवर राज्य केले आणि दिल्लीत त्यांचे जे काही पानिपत झाले, ते पाहाता आपल्याला आता या पक्षात भविष्य नाही, याची खात्री ज्योतिरादित्यच नव्हे, तर काँग्रेसमधील अनेकांना झाली आहे. मध्य प्रदेशानंतर राजस्थानचा क्रमांक आहे, अशी जी काही चर्चा आता सर्वत्र सुरू आहे, ते त्याचेच प्रतीक आहे. राजस्थानमध्ये मध्य प्रदेशासारखे सत्तानाट्य घडेल का, या प्रश्नाला सध्या तरी 'होय' किंवा 'नाही' असे काहीच उत्तर नाही. मात्र, काँग्रेसचे अध:पतन झपाट्याने होत आहे का? या प्रश्नाचे उत्तर मात्र हमखास 'होय' असेच आहे. तिथे आता या प्रश्नांची कारणमीमांसा प्रामाणिकपणे करणारे कोणीच नाही. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे भाजपमध्ये बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ती वाढत राहील, कारण भाजप हा आता देशाचा मूळ पक्ष झाला आहे. राजकारणात स्वत:चे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी अनेकांना आता याच राजकीय पक्षाचा आधार घ्यावा लागणार आहे. भाजपला ही वाटचाल आपल्या मूल्यांचा विसर न पडू देता करावी लागेल, हे त्यातले वास्तवही ध्यानात ठेवले पाहिजे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@