स्त्रीशक्तीचा सन्मान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2020
Total Views |


vedamrut _1  H



पौराणिक युगात वैदिक शास्त्रात बऱ्याच प्रमाणात प्रक्षेप झाल्याने तेव्हापासून आजातागायत स्त्रीला केवळ भोगविलासाची सुखवस्तू म्हणूनच गणले गेले, तर तिला तिच्या अधिकारापासूनही वंचित ठेवण्यात आले. याच कारणाने वैदिकशास्त्र नाहक बदनाम झाले. पण, वरील मंत्रात आलेली विशेषणे स्त्रियांचा खऱ्या अर्थाने सर्वोच्च आदर व सन्मान करणारी आहेत.

 
 

इडे रन्ते हव्ये काम्ये चन्द्रे,

ज्योते अदिते सरस्वति महि विश्रुति।

एता ते अघ्न्ये नामानि,

देवेभ्यो मा सुकृतं ब्रूतात्।

(यजु.-८/४३)

 
 

अन्वयार्थ

 
 

(अघ्न्ये!) हे अहिंसनीय, प्रताडना न करण्यायोग्य देवी! (एता: ते) पुढीलप्रमाणे ही तुझी संबोधने, नावे आहेत- (इडे) तू स्तुतियोग्य, प्रशंसनीय आहेस. (रन्ते) तू रम्य आहेस. (हव्ये) तू स्वीकार करण्यायोग्य आहेस. (काम्ये) कामना करण्यायोग्य आहेस. (ज्योते) तू आपल्या उत्तम चारित्र्याने प्रकाशमान आहेस. (अदिते) श्रेष्ठ गुणांनी तू अखंडित आहेस. (सरस्वति) ज्ञानरसाने परिपूर्ण आहेस. (महि) महान गुणवैशिष्ट्यांनी पूजनीय आहेस. (विश्रुति) अनेक गुणांनी तू प्रसिद्ध आहेस. (नामानि) अशा या सर्व नामविशेषांनी युक्त असलेल्या हे देवी! (देवेभ्यो) तू दिव्य-श्रेष्ठ गुण व कार्यांसाठी (मा) माझ्याशी (पती किंवा कुटुंबातील सदस्यांशी) (सुकृतं) चांगले उत्तम कृतियुक्त विचार-उपदेश (ब्रूतात्) बोलत राहा.

 
 

विवेचन

 
 

संबंध जगात मानाचे सर्वोच्च स्थान कोणते असेल, तर ते स्त्री देवतेचे! आपल्या सर्वश्रेष्ठ गुणांमुळे व सत्कर्मांमुळे स्त्री ही खऱ्या अर्थाने वंदनीय आहे. विविध रूपांमध्ये तिची भूमिका अत्यंत मोलाची आहे. कुटुंब, समाज, राष्ट्र व विश्वनिर्मितीचे सामर्थ्य स्त्रीदेवतेच्या त्यागपूर्ण जीवनात दडलेले आहे. म्हणूनच उपनिषदांनी 'मातृ देवो भव।' असा उल्लेख करून तिला सर्वात अगोदर गौरविले आहे. केवळ पुरुषांनाच नव्हे, तर स्त्रियांनादेखील वेद ब्रह्मत्त्व प्रदान करतात. ऋग्वेदाने या संदर्भात 'स्त्री हि ब्रह्मा बभूविथ।' असा उल्लेख करून महत्त्वपूर्ण ब्रह्माधिकार प्रदान केला. हा तिला ब्रह्मापदी विराजमान करण्याचा सन्मान सर्वात अगोदर वेदांनी दिला. पण, जगाच्या व्यवस्थेला मात्र या वैदिक उदात्त भावनेचा विसर पडला आहे. साऱ्या जगाची निर्मिती करण्याचे सामर्थ्य स्त्रियांच्या ठायी विद्यमान असल्याने 'माता' या शब्दाचे निर्वचन करताना निरुक्तकार महर्षी यास्काचार्य म्हणतात- 'माता निर्माता भवति।' म्हणजेच माता ही साऱ्या जगाचे सृजन करणारी दिव्य शक्ती आहे. महर्षी मनूदेखील तिचा गौरव करताना किती उदात्तपणे म्हणतात - "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।" म्हणजेच जिथे स्त्रियांचा सन्मान, सत्कार व आदर केला जातो, तिथे सरस्वती, लक्ष्मी, सुखैश्वर्य, शांतता, आनंद इत्यादी दिव्य तत्त्वे रममाण होतात. इतका गौरव वैदिक शास्त्रांनी केला असतानाही आजपर्यंत स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र हीन दर्जाचा झाला आहे. मधल्या काळात मत-संप्रदायांनी, त्यांच्या प्रवर्तकांनी व तसेच तथाकथित समाजधुरिणांनीही स्त्रियांविषयी अन्यायकारक अपशब्द काढून तिचा फार मोठा अवमानच केला आहे. पौराणिक युगात वैदिक शास्त्रात बऱ्याच प्रमाणात प्रक्षेप झाल्याने तेव्हापासून आजातागायत स्त्रीला केवळ भोगविलासाची सुखवस्तू म्हणूनच गणले गेले, तर तिला तिच्या अधिकारापासूनही वंचित ठेवण्यात आले. याच कारणाने वैदिकशास्त्र नाहक बदनाम झाले. पण, वरील मंत्रात आलेली विशेषणे स्त्रियांचा खऱ्या अर्थाने सर्वोच्च आदर व सन्मान करणारी आहेत. सदर वेदमंत्रात उल्लेखिली गेलेली सर्व संबोधने स्त्री जातीला प्रगतीच्या उच्च शिखराकडे घेऊन जाणारी आहेत. पहिल्याच 'अघ्न्ये।' या संबोधनातून आपल्याला लक्षात येईल की, स्त्री ही शारीरिक, मानसिक व वाचिकदृष्ट्या अहिंसनीय असल्याचे दिसून येते. म्हणजेच कोणाकडूनही तिचा वाणीने, मनाने व प्रत्यक्ष क्रियेतून कसलाच छळ होता नये. 'अघ्न्या' हा शब्द वेदांनी गाईला पण प्रदान केला आहे. गाय हा सर्वदृष्टीने उपकारक पशू! ती दुग्धामृताने मानवमात्राचे कल्याण साधते, ऐश्वर्य वाढविते. सर्वांना आरोग्य, बुद्धिबळ व सुख प्रदान करते. म्हणूनच ती 'अघ्न्या' अर्थात अहिंसनीय आहे. तिची कदापिही हत्या होता कामा नये. जशी गाय तशीच मायदेखील 'अघ्न्या' आहे. म्हणून मंत्रोक्त पहिले 'अघ्न्ये' हे संबोधन सार्थक ठरते.

 

पहिल्या मंत्र चरणात स्त्रियांसाठी अभिव्यक्त दहा संबोधने ही स्त्रीशक्तीचा गौरव वाढविणारी आहेत. प्रारंभी तिला 'इडे' असे म्हटले आहे. मूळ शब्द 'इडा' किंवा 'इला.' म्हणजेच याचा अर्थ स्तुती किंवा प्रशंसा होय. स्त्रियांच्या महनीय कार्याची व तिच्या सद्गुणांची नेहमीच स्तुती किंवा प्रशंसा झाली पाहिजे. यामुळे ती आपली सर्व कामे उत्साहाने करू शकते. तिने केलेला त्याग, समर्पण आणि कष्ट हे अवर्णनीय आहेत. बाळाच्या जन्मापासून ते त्याचे पालनपोषण आणि कुटुंबाचे संवर्धन याबाबतीत ती सतत आघाडीवर असते. म्हणूनच अशी ही स्त्रीशक्ती प्रशंसेस पात्र का म्हणून नसणार? तिच्या कार्याची व सद्गुणांची अर्पण निर्मातृशक्तीची नेहमी प्रशंसा झालीच पाहिजे. दुसरे संबोधन म्हणजे 'रन्ते' होय. ती सर्वांशी आपल्या पवित्र वाणी व कार्यव्यवहाराने रमविते, सुख प्रदान करते. ती कन्या, बहीण, पत्नी, आई, आजी, मैत्रीण इत्यादी भूमिकांमधून सर्वांना रमविणारी आहे. तिसरे संबोधन म्हणजे 'हव्ये' अर्थात स्वीकरणीय होय. तिच्या विचारांचा नेहमीच अंगिकार व्हावयास हवा. कारण, ती योग्य ती सल्ला देणारी असते. पुढील संबोधनात 'काम्ये' म्हटले आहे. म्हणजेच सर्वांच्या इच्छा-आकांक्षांना व कामनांना पूर्णत्व प्रदान करणारी स्त्री होय. आपल्या सुखाचा व इच्छांचा त्याग करून मुले, पती व इतर कुटुंबीयांच्या इच्छांना ती सतत अग्रक्रम देते. याकरिता दु:खांचे व कष्टांचे ओझे सहन करते. तसेच स्त्री ही 'चन्द्रे' म्हणजेच आंतरिक वेदना न व्यक्त करता केवळ मौन राहून ती चंद्राप्रमाणे शीतलता प्रदान करते.

 

स्त्री ही सतत अंतर्बाह्य चमकणारीआहे. म्हणूनच तिला 'ज्योते' हे संबोधन अतिशय सार्थक ठरते. ती आपल्या उत्तम चारित्र्याने तेजोमय आहे. आपल्या ज्ञानरूप ज्योतीने इतरांना प्रकाश देण्याचे कार्य ती अगदी प्रयत्नपूर्वक करणारी आहे. स्त्री ही 'अदिति' आहे, म्हणजेच खंडित न होणारी आहे. संकटे कितीही येवोत, ती कधीही धैर्य सोडणार नाही की खचून जाणार नाही! अखंडपणे श्रेष्ठ गुण व कार्यांनी पुढेच जात राहणार! थांबणार नाही. 'सरस्वति' हे तिचे विशेष संबोधन आपणा सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे. कारण, स्त्री ही ज्ञानरसाने सदैव परिपूर्ण असते. ती विद्येच्या रसाने युक्त म्हणजेच सरस असते. आजही शिक्षण क्षेत्रात मुलींचे प्रमाण मुलांपेक्षाही पुढे जाण्याचे आहे, त्याचे हेच कारण! असे एक नव्हे, अनेक महान गुण तिच्यामध्ये वास्तव्य करतात. म्हणूनच तिला 'महि' (महान स्तुतियोग्य) हे संबोधन तिची महानता वाढविणारे आहे. इतके सद्गुणांचे वैभव असल्यावर स्त्री ही प्रसिद्ध का होणार नाही. याचकरिता 'विश्रुति' हे शेवटचे संबोधन अत्यंत प्रभावी आहे. विश्रुतीलाच 'यश' व 'कीर्तिसंपन्नता' असेही म्हणतात. स्त्रियांनी आपल्या श्रेष्ठतम गुण कर्मामुळे आपले नाव इतिहासाच्या पानापानावर झळकविले आहे. म्हणूनच तिच्या नावाचा आजही चहुकडे जयघोष होतोय. स्त्रियांविषयी इतका विशाल दृष्टिकोन वेदांसारखा इतरत्र कुठेच आढळत नाही. म्हणूनच वेदोक्त स्त्री सन्मान हा आधुनिक युगासाठी अतिशय आचरणीय, स्तुत्य व प्रेरक असा आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त विश्वातील सर्व विचारवंतांनी वैदिक स्त्रीविषयक महान दृष्टिकोन लक्षात घ्यावयास हवा...!

 
 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 
 
@@AUTHORINFO_V1@@