येस बॅंकेच्या ग्राहकांना चिंता करण्याचे कारण नाही : लवकरच सुरू होणार 'या' योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2020
Total Views |


YES BANK _1  H




प्रशासक प्रशांत कुमार यांचे स्पष्ट संकेत



मुंबई : येस बँकेवर लादण्यात आलेले आर्थिक निर्बंध याच आठवड्यात उठण्याची शक्यता आहे. या बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेले प्रशासक प्रशांतकुमार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या मंडळाने येस बँकेचे नियंत्रण घेण्याबाबत ठोस योजना तयार केली असून, ती रिझर्व्ह बँकेकडे सादर करण्यात आली आहे. तिला लवकरच मंजुरी मिळणार आहे. यानंतर येस बँकेवरील सर्व आर्थिक निर्बंध दूर झालेले असतील, असे त्यांनी सांगितले. 

 
 
येस बँकेच्या ग्राहकांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही. सर्व बँकिंग सेवा लवकरच पूर्ववत् करण्यात येणार आहेत. स्थिती सामान्य होईपर्यंत आमचे ग्राहक इतर बँकांच्या एटीएमचाही वापर करू शकणार आहेत, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. आम्ही ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे आणि त्यादिशेने प्रयत्नही सुरू झाले आहेत, असे कुमार यांनी सांगितले.

 
 
शनिवारी सायंकाळपासून आम्ही इतर बँकांची एटीएम सेवाही येस बँकेच्या ग्राहकांकरिता सुरू केली आहे. सध्या पैसे काढण्यावर जी मर्यादा आहे, ती कायम असून, तितक्याच मर्यादेपर्यंत येस बँकेचे ग्राहक इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत, असे ते म्हणाले.
 

 
ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने आवश्यक त्या सेवा उपलब्ध करण्याचे निर्देश बँकेच्या सर्व शाखांमधील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी ग्राहकांच्या समस्या जाणून, त्या सोडविण्यावर भर देत आहेत. अशा कठीण स्थितीतही प्रशासनाला योग्य ते सहकार्य करीत असलेल्या ग्राहकांचे मी मनापासून आभार मानतो. येस बँकेवरील आपला विश्वास असाच कायम ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.
 

जागतिक गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न
 
येस बँकेला पतनापासून वाचवण्यासाठी भारतीय स्टेट बँकेला आणखी २० हजार कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणुकीची गरज आहे. त्यासाठी स्टेट बँक सहापेक्षा जास्त गुंतवणूकदारांसोबत चर्चा करीत आहे, असे या घडामोडींची माहिती असलेल्या व्यक्तींनी सांगितले. यामध्ये ब्लॅकस्टोन, ब्रूकफिल्ड, कार्लाइल, टीपीजी, केकेआर आणि गोल्डमन सॅशचा समावेश आहे.
 

टिल्डन पार्क, जेसी फ्लॉवर्स अॅहण्ड सेर्बेरस कॅपिटलसोबतही स्टेट बँक चर्चा करीत आहे. यापैकी काही कंपन्यांनी यस बँकेच्या मागील व्यवस्थापनासोबत बोलणी केली असल्याचे समजते. मात्र, यातील प्रत्येक गुंतवणूकदार किती गुंतवणूक करेल, याबाबत अंदाज वर्तवणे शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.  


‘सीबीआय’ची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी
 
 
येस बँकेचा सहसंस्थापक राणा कपूर आणि त्याच्या कुटुंबाने कर्जाच्या मोबदल्यात दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि.कडून (डीएचएफएल) स्वीकारलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या कथित लाचप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) चौकशीचा ससेमिरा मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरु राहिला. याप्रकरणाच्या चौकशीसाठी सोमवारी दि. ९ मार्च रोजी मुंबईत सात ठिकाणी छापेमारी केली होती. सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पाच कंपन्या, कपूर दाम्पत्य, त्याच्या तीन मुली आणि दोन जणांचा समावेश केला आहे. डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि डीएचफएल कंपनीसोबत संबंध असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीचे संचालक धीरज राजेशकुमार वाधवान यांची नावे देखील आरोपींमध्ये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. डीएचएफएल, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रा. लि. आणि डॉल्ट अर्बन व्हेंचर्स या कंपन्यांवर कपूर कुटुंबाचे नियंत्रण आहे. त्याची मुलगी बिंदू कपूर ही आरएबी एंटरप्रायजेस (इंडिया) प्रा. लि. कंपनीची संचालक होती. मॉर्गन क्रेडिट्स प्रा. लि. कंपनीत कपूरच्या तिन्ही मुली संचालक होत्या. त्यांची नावे देखील आरोपींच्या यादीमध्ये आहेत. या आरोपींच्या मुंबईतील निवासस्थानांवर आणि कार्यालय परिसरांत सीबीआय अधिकाऱ्यांच्या पथकांनी छापेमारी केली, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. डीएचएफलचा कपिल वाधवानसोबत कट रचून राणा कपूरने डीएचएफएलला दिलेले कर्जातील रक्कम त्याच्या मुलींच्या डू इट अर्बन व्हेन्चर्स प्रा. लि. कंपनीत वळती केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@