आपण कोण आहोत, याची जाणीव संविधानामुळे होत असते : रमेश पतंगे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2020
Total Views |
Ramesh-Patange _1 &n
 

नाशिक : मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या भोसला सैनिकी महाविद्यालयातर्फे नुकतेच डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे आयोजिलेल्या भारतीय संविधान अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते आणि संविधान अभ्यासक रमेश पतंगे म्हणाले की, “व्यास, वाल्मिकी आणि आंबेडकर यांच्या त्रिसूत्रीतून देश घडला आहे. आम्ही भारताचे लोक देशाची सार्वभौम प्रजा आहे. संविधान साक्षरतेची गरज आहे. त्याविषयी जागरूकता होण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण कोण आहोत, याची जाणीव संविधानामुळे होत असते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे, संघाचे नाशिक शहर जिल्हा संघचालक विजय कदम, भोसला सैनिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी उपस्थित होते.
 
 
प्रास्ताविकात संस्थेचे नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे म्हणाले की, 'नेमकं संविधान काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. मी भारतीय ही सर्वसमावेशक गोष्ट समोर ठेवून बाबासाहेबांनी संविधान बनवले. संविधान हा संशोधनाचा विषय बनावा,' या हेतूने संस्थेने हा अभ्यासवर्ग आपल्यासाठी आयोजित केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी रमेश पतंगे यांचा सत्कार संस्थेचे नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला, तर संघाचे नाशिक शहर जिल्हा संघचालक विजय कदम यांचा सत्कार प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
 
 
पतंगे म्हणाले, “भारत ही अविभाज्य संकल्पना आहे. तिची व्यापकता सर्वसमावेशक आहे. आणीबाणीच्या काळात का अटक करण्यात आली आणि मिसा कायदा का लावण्यात आला, याबाबतच्या खटल्याचा प्रत्येकाने एकदा अभ्यास करावा,” असे त्यांनी नमूद केले. “भारतीय संविधान हे सामाजिक दस्तऐवज असून राजकीय घटना नाही. भारतीय संविधान हे केवळ भारतीय लोकच बनवू शकतात,” असे उद्गार ऑस्टिन या विचारवंताने संविधानाप्रती काढल्याचे वक्त्यांनी आवर्जून नमूद करायला ते विसरले नाही.
 
 
”राष्ट्राची एकता बळकट करायची आहे. संविधानामुळेच ती मजबूत होण्यास हातभार लागेल. सामाजिक एकजूट होणे, ही काळाची गरज आहे,” असेही ते म्हणाले. अभ्यासवर्गाला जिल्हाभरातून निमंत्रित मान्यवरांसह संस्थेच्या विविध विभागांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची उपस्थिती लाभली होती. सुमारे दीडशे जणांचा समावेश होता. वर्गाचा समारोप संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार-प्रसारप्रमुख दिलीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. समारोपकर्ते दिलीप क्षीरसागर यांनीही आपले विचार मांडलेत. व्याख्यान संपल्यावर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला. वक्त्यांशी उपस्थितांनी संवाद साधला. सूत्रसंचालन स्नेहा कुलकर्णी यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@